सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - कष्टमय आयुष्य
पुन्हा कष्टमय आयुष्य
योगी मनोहरांच्या पुन्हा एका कष्टमय आयुष्याला इथून सुरुवात झाली. राहाते मोठे घर विकल्यावर नागपूरच्याच शंकरनगर भागात एक छोटेसे घर भाड्याने घेऊन इथे ते आपल्या कुटुंबासोबत राहू लागले. परंतु पुढे घराचे भाडे देणेही जड जाऊ लागले. कारण राहाते घर विकून त्यातून मिळालेल्या रकमेच्या व्याजावर घर कसेबसे चालत होते. दुसरी मुलगी मुक्ता ही वयात आली होती. तिचेही लमाची वेळ आली होती. त्यासाठी पैशांची सोय करायची होती. नागपूरमधील महाल भागात योगी मनोहरांच्या आई-वडिलांनी (राधाबाई, श्रीकृष्णराव) बऱ्याच वर्षांपूर्वी बांधलेला हरकरे वाडा होता. तिथे मात्र इतर नातेवाईकांनीच कब्जा केला होता. त्यात त्यांचे भाऊ, पुतणे असे बरेच लोक होते. योगी मनोहरांनी आणि शालिनीताईंनी पैशाच्या अडचणीमुळे इथे राहायला जायचे ठरवले. भावडांना अनेक विनवण्या केल्यानंतर वाड्याच्या कोपऱ्यातला एक भाग राहायला मिळाला. इथे दोन खोल्या होत्या. अतिशय जुनाट अशा त्या खोल्यांमध्ये मातीच्या भिंती, जमीनही मातीची, सदैव ओलावा असणारी आणि गळणारे छप्पर होते. इतकी वर्षे स्वतःच्या मोठ्या बंगल्यात सर्व सुखसोयींनी युक्तः अशा ठिकाणी राहिल्यानंतर अचानक झोपडीवजा घरात राहाण्याची पाळी योगी मनोहर, शालिनीताई व त्यांच्या अपत्यांवर येणे म्हणजे दैवदुर्विलास होता. गरिबीतून श्रीमंती आल्यास आनंद होतो. परंतु श्रीमंतीतून गरिबीत येणे अतिशय क्लेशकारक असते. जो हे मोगतो तोच जाणतो. शालिनीताईंना पुन्हा विहिरीचे पाणी काढावे लागे. मातीच्या भिंती शेणाने सारवाव्या लागल्या. पुन्हा एक कष्टप्रद आयुष्य त्यांच्या वाट्याला आले.
इथे आल्यावरसुध्दा योगी मनोहरांची अध्यात्मसाधना नित्य नियमित सुरू होती. मात्र आप्तांपासून होणाऱ्या त्रासामुळे योगी मनोहरांनी लवकरच दुसरे घर बघितले. आपल्या मुलांवर त्यांना वाईट परिणाम होऊ द्यायचा नव्हता.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा