वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १६
वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १६
कूर्म जयंती
चतुर्दशीला कूर्मजंयती येते. हिंदू मंदिरांच्या प्रवेशद्वारी कूर्माची (कासवाची ) प्रतिमा असते ती का? तर भक्ताने भगवंतासमोर जाताना कूर्माप्रमाणे सर्वांग आणि मन आत ओढायचे म्हणजे अंतर्मुख करायचे असते. भगवंत गीतेतील दुसऱ्या अध्यायात म्हणतात, ‘यदा संहरते चायं कूर्मोऽडननीव सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥ श्लोक ५८।। अ. २॥ याशिवाय कूर्माचे महत्व समुद्रमंथनाच्या प्रकरणात सांगितलेच आहे. कूर्मनाडी सिद्ध झाल्यासच मेरुदंडाच्या सहाय्याने साधकाच्या शरीरातील समुद्रमंथन होऊन देववृत्तींना अमृताचा लाभ होतो. समुद्रातून चौदा रत्नेच का निघाली ? तर साधकाच्या शरीरात सप्तचक्रे असतात. प्रत्येक चक्रातून साधकातील देव आणि दैत्य वृत्तीनुसार ७ x २ = १४ रत्ने निघणार! हीच ती समुद्रमंथनातील चौदा रत्ने होत. चौदा रत्ने निघाली म्हणून चतुर्दशीलाच कूर्मजंयती साजरी करतात. चांगल्या वृत्तींच्या सहाय्याने वाईट वृत्तींवर विजय मिळविणे व चांगल्या वृत्तींच्याही पलीकडे जाऊन मनातील कोणत्याही विचारांच्या प्रभावाखाली न राहता निर्विकल्प होणे हीच मुक्ती. अन्यथा साधकाला चांगल्या कर्माचाही अहंकार वाईटच. संयमाशिवाय आत्मज्ञान नाही.साधकागणिक ही चतुर्दशी त्याला चौदा रत्ने प्राप्त झाल्यानंतर केव्हाही येऊ शकते. सर्वसाधारणांकरीता या अतुल अवस्थेचे स्मरण असावे म्हणून दर ग्रीष्मात चतुर्दशीला कूर्मजयंती साजरी करतात. समुद्रमंथन झाल्यावर आता तूर्त कशाचीच आवश्यकता नसल्याने पौर्णिमेला वैशाख स्नान समाप्ती होते.
शनैश्वर जयंती
अमावस्येला शनै: शनै: चरणास्था शनी ग्रहाची जयंती येते. देवाची जयंती आपण समजू शकतो. पण जड अशा मानलेल्या शनीग्रहाची जयंती कशाकरीता करायची? एकदा शनैश्वराने आपल्या पृथ्वीला जीवदान दिले होते. त्याच्या त्या दयार्द्र वर्तनाबद्दल आपण पृथ्वीवरील मानव अजूनही शनैश्वर जयंती साजरी करतो. फार प्राचीन काळातील गोष्ट आहे. खगोल शास्त्रज्ञांनी यातील रहस्य संशोधन करावे. अतीप्राचीन काळी शनी ग्रह पृथ्वीकडे सरकू लागला. शनीसारखा प्रचंड ग्रह पृथ्वी निकट आल्यावर पृथ्वीचा नाश अटळ होता. त्यावेळी पृथ्वीवर दशरथ नावाचा राजा राज्य करीत होता. त्याचे गुरू वसिष्ठांना पृथ्वीचा नाश होण्याचे दुश्चिन्ह स्पष्टपणे दिसू लागले. त्यांनी दशरथाला एक दिव्य रथ आणि अस्त्र दिले; त्या रथावर बसून तो चंद्रावर गेला; आणि तेथून आपल्या अस्त्राचा मारा करून त्याने शनैश्वराचा पृथ्वीवरील हल्ला परतविला. ही कथा गणेश पुराणात आली आहे. शनी हा सूर्यपुत्र मानला जातो.
खगोल शास्त्रीय इतिहास सिद्धांत
खगोल शास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास वरील कथेत आपल्या सूर्यमालेतील अती प्राचीन काळच्या एका भयंकर घटनेचा इतिहास आहे. आज सूर्यमालेत पृथ्वीनंतर मंगळ आहे. परंतु लेखकाच्या मते हा मंगळ पृथ्वीपासूनच अलग फेकला गेलेला एक तुकडा आहे. चंद्र ज्यावेळेस गुरु ग्रहापासून सुटून पृथ्वीच्या कक्षेत घुसला त्यावेळेस काही काळ पृथ्वीचे स्वांगपरिभ्रमण बंद पडून पृथ्वीच्या एका भागावर सूर्याची प्रखर उन्हे सतत पडल्यामुळे तो भाग फुटून अवकाशात फेकला गेला असावा. पृथ्वीवर त्यामुळे जो प्रचंड खड्डा पडला त्याचे चिन्ह आजही पृथ्वीवर आहे. तो मंगळ खड्डा म्हणजे प्रशांत महासागर होय. प्रशांत महासागर आणि मंगळाचा व्यास जवळ जवळ सारखाच आहे. मंगळालाही आपल्या भाषेत भौम वा भूमिपुत्र म्हणतात. त्यावरून मंगळ हा पृथ्वीचाच अंश असावा असे अनुमान निघू शकते. मंगळावर गेल्यावर तेथील प्रस्तराचे संशोधन होऊन तेथील आणि पृथ्विवरील प्रस्तरांचे आयुष्य जर सारखेच निघाले तर व्यासकथेतील सिध्दांताचे महत्व जगाला पटेल.
पृथ्वीपासून मंगळ ग्रह बाहेर फुटून पडण्यापूर्वी ही अती प्राचीन काळातील गोष्ट आहे. त्यावेळेस पृथ्वीनंतर मंगळ ग्रह नसावा. आज रोहिणी शकटाच्या रूपाने जो असंख्य लघुग्रहाचा एक पट्टा गुरू ग्रह आणि मंगळाच्या मधे दृष्टीस पडतो तो त्या काळात पृथ्वी आणि गुरू ग्रहामधे असावा. परंतु खगोल शास्त्रज्ञांचे मते हा लघुग्रहांचा पट्टा म्हणजे रोहिणी शकट आज दिसते तसे अनेक लघुग्रहांचे नसून त्या कक्षेत पूर्वी फिरणाऱ्या एका मोठ्या ग्रहाचे काही आकाशस्थ दुर्घटनेमुळे तुकडे होऊन त्या तुकड्यांची स्वैर गती म्हणजे हा रोहिणी शकटाचा पट्टा असावा. म्हणजे एका अती प्राचीन काळी हे रोहिणी शकट नसून एखादा मोठ्ठा ग्रहच तेथे आपल्या कक्षेत फिरत असावा. शनीग्रह याच रोहिणी शकटाजवळ सरकला होता. त्यामुळे त्या स्थानी पूर्वी असलेल्या प्रचंड ग्रहाचा नाश होऊन त्याचे तुकडे झाले असावे. शनीग्रह आणखी पृथ्वीकडे सरकतच होता. पण काही कारणामुळे आदळला नाही.तेव्हापासून पृथ्वीग्रह आपले जीवन निर्वेध चालवित आहे. त्या वेळी शनैश्वराने पृथ्वीवर कृपाच केली म्हणायची. त्याचे स्मरण म्हणून अजूनही ज्येष्ठातील अमावस्येला शनैश्वर जयंती साजरी करतात.
आषाढ आणि दशहरा
आषाढ शु. १ ला दशहरारंभ होतो. दशेंद्रीयातील इंद्रीयभाव हरण करण्याचा कालावधी म्हणजे दशहरा होय. भगीरथाच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे त्याचे भगीरथ प्रयत्नाप्रीत्यर्थ दशहरा समारंभ उत्साहाने साजरा करतात. भगीरथ कथेत काय रहस्य आहे ? भगीरथ म्हणजे आटोकाट प्रयत्न करणारा साधक. कपिल महामुनिंचा शाप मिळून ते साठ सहस्र सागर दग्ध झाले. सांख्य तत्वज्ञानाचे म्हणजेच योगशास्त्राचे जनक कपिल महामुनी. त्यांचा शाप म्हणजे योगमार्गातील साधना योग्य न केल्याने उत्पन्न झालेला प्रखर शरीरदाह होय. कुंडलिनी जागृत झाल्यावर प्रत्येक साधकाच्या शरीराचा असा दाह होतो. राधेच्या अंगाचा असाच दाह होत होता. संत ज्ञानेश्वर म्हणतात 'चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी । इथे माऊली स्त्रियांच्या भाषेत बोलत आहेत.उच्च योगावस्थेत साधक स्त्रीभावात आरूढ होतो. रामकृष्ण परमहंस, संत गुलाबराव महाराज व सर्व खऱ्या संतांचा असाच स्त्रीभावाचा अनुभव आहे. मीराबाई म्हणतात, 'राणाने भेजा विषका प्याला पीबत मीरा हाँसी ॥ साधकाच्या साठसहस्त्र नाड्यात म्हणजे सगराच्या साठ सहस्त्र पुत्रांचा असाच दाह होऊन ते भस्म झाले. त्यांना पावन करण्याकरीता ज्ञानगंगेची आवश्यकता होती. त्यामुळे सगराप्रमाणे साधकाच्या शरीरस्थ साठ सहस्त्र दग्ध नाड्या शांत होतात. (अधिक माहितीसाठी लेखकाचे कुंडलिनी हे पुस्तक वाचावे) या साधनानुभवातील रहस्य भगवान वेदव्यासांनी भगीरथ कथेच्याद्वारे सुरक्षित ठेवले आहे. साधनामार्गात केवळ कल्पनांना वाव नाही. तेथे प्रखर प्रयत्न आहेत आणि प्रयत्नांती सुख देणारा फल प्रसाद आहे. असा हा दशहरा ग्रीष्माचे शेवटच्या चरणात साधक रूपी भीष्माला पावन करतो. ऋतु भीष्म ग्रीष्मांचा देहपात दशहरा समाप्तीतच होतो.
क्रमशः-
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
शब्दांकन – राजेश कोल्हापुरे – संपर्क ९७०२९३७३५७ / ९५९४७३७३५७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा