सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)
-------------------------------------
योगनिद्रा (अवयव ध्यान)
-------------------------------------
योगनिद्रा म्हणजे योग्यांची निद्रा. याला कोणी शवासन म्हणतात, परंतु ते चुकीचे आहे. शवासनात श्रेष्ठ योगी आपल्या शरीरातून बाहेर निघून आपलेच शव आपल्या दिव्य डोळ्यांनी स्वतःच पाहू शकतो. योगनिद्रा करताना अवयव ध्यान केले जाते. अवयव ध्यानाने साधक अशा जागृत निद्रेत जातो की, साधकाचे शरीर तर निद्रावश होते, परंतु साधकाचा जीवात्मा जागृत असतो. यालाच योगनिद्रा असे म्हणतात.
आपल्या शरीरामध्ये बरेच अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवावर ध्यान केंद्रित करून व नंतर त्यावरून ध्यान काढून दुसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रीत करणे, परत त्यावरून ध्यान काढून तिसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रित करणे. याप्रमाणे प्रथम उजव्या पायाचे सर्व अवयव, नंतर डाव्या पायाचे सर्व अवयव, त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्या पासून खांद्यापर्यंतचे सर्व अवयव, तसेच डाव्या हाताचे सर्व अवयव, त्यानंतर मुख्य शरीराचे (धडाचे) सर्व अवयवांवर एकानंतर दुसरा अवयव असे ध्यान करून शेवटी 'सहस्रार' चक्रावर म्हणजेच डोक्यावर मधोमध ध्यान केंद्रित करून त्यामध्येच ध्यानमग्न होऊन जायचे. याप्रमाणे अवयव ध्यान करून साधक अशा निद्रेत जातो की जिथे साधकाचे शरीर झोपलेले असते, परंतु साधकाचा जीवात्मा सदैव जागृत आणि सतर्क असतो.
योगनिद्रेसाठी आसन
योगनिद्रा (अवयव ध्यान) ध्यान करण्याकरता प्रथम जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर पांढरे स्वच्छ धूतवस्त्र टाकावे. पाठीवर उताणे झोपावे. पायांच्या टाचा जोडलेल्या व बोटे दूर, दोन्ही हात मांड्यांना चिकटलेले, परंतु तळहात वर वळविलेले, डोके सरळ ठेवावे किंवा डावीकडे वा उजवीकडे कलते ठेवावे. नंतर पूर्ण शरीर सैल सोडावे, शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण ठेवू नये. अशा प्रकारे शरीर सैल शिथिल सोडून जमिनीवर झोपणे हे योगनिद्रेचे आसन आहे. त्यानंतर अवयव ध्यान सुरू करावे. मनात अन्य कुठलेही विचार येणार नाहीत, असा प्रयत्न करावा.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा