वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - योगसाधनेसाठी 'गुरु'
प्रश्न क्र. 20 :- योगसाधनेसाठी 'गुरु' आवश्यक आहेच का ? कशासाठी ?
गुरू या शब्दाचा अर्थ भारी (Heaviest) होय. किंवा इतरांपेक्षा अधिक, जास्त असणे. ग्रहमालेत गुरू ग्रह वजनाने सर्वात भारी म्हणून त्यास गुरू नाव दिले. कोणत्याही कक्षेत आपल्या पेक्षा वरच्या स्तरावरील जो ज्ञान प्राप्त करुन त्या ज्ञानाच वितरण करू शकेल तो गुरू.
सजीवांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या अस्तित्वाला जीवन किंवा आयुष्य असे म्हणतो. या आयुष्यात आपला प्रथम गुरु आपली जन्मदायी आई असते. नंतरच्या जीवनात अनेक गुरु आपणास लाभतात. जस-जसे आयुष्य आपण जगत असतो तस-तसे गुरु भेटत जातात. त्यानुसार आयुष्य घडत जाते. अनुभव हा सुद्धा बरंच शिकवून जातो. शेवटी त्यालाही आपण गुरूच मानतो. तोही आवश्यक असतो.
राजकारणापासून अध्यात्मापर्यंत गुरु-शिष्य आढळतात. गांधी-नेहरु, गोखले-टिळक-गांधी, रामकृष्ण परमहंस-विवेकानंद, निवृतीनाथ-ज्ञानदेव, रामदास स्वामी-तुकाराम महाराज-शिवाजी महाराज. अशा अनेक गुरू शिष्यांच्या जोडया सांगता येतील. केवळ वजनाने वरचढ नव्हे तर अनुभवाने, ज्ञानाने परिपूर्ण असतो तो गुरू. अध्यात्म म्हणजे प्रॅक्टीकल सायन्स. अध्यात्म म्हणजे सूक्ष्म काया-वाचा-मन बुद्धीचा व्यापार. आपल्यापेक्षा वरचढ कोण हे ओळखणे तसे कठिण असते. प्रसिद्धीच्या हव्यासा- पोटी, खोट्या प्रचाराने, चमत्काराने, भुलावणीने वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो परंतु चमत्कार हे अज्ञान आहे. भुलावणे अर्थात् भ्रम आणि सत्य यातील फरक ओळखता आला पाहिजे. साधनेने जे मोठे असतात, प्रामाणिक असतात ते खरे गुरू. तेच सद्गुरू होय.
पूर्वी ४ थी उत्तीर्ण झाल्यावर प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळू शकत होती. आपण हायस्कूलमध्ये गेल्यावर पुढे शिकून पदवी प्राप्त केली तरी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना त्यांना नमस्कार करणे, सद्भावना ठेवणे, सन्मानाने, आदराने वागवणे ही खरी आपली परंपरा. एकदा ज्याने आपल्याला जग दाखवले तो कायम गुरू, नम्रता अध्यात्मामध्ये आवश्यक असते. ती जीवनात प्रत्यक्ष येण्यासाठी गुरु आवश्यक आहे. अढळ श्रद्धा व दृढ विश्वास ठेवता आला पाहिजे.
गुरूशिवाय चालू शकते आणि नाही सुध्दा ! परंतु गुरूच्या मागे लागू नये. आपले व्यक्तिमत्त्व वाढवावे, गुरू आपोआप प्राप्त होतात. फूल काट्या कुट्यांत उमलून सुगंध दरवळते, तसे साधकाने प्रामाणिकपणे आपल्या जीवनाचा सुगंध दरवळला की आपोआप गुरू मिळतो. सतत एकच गुरू राहील असे नाही. साधनेने जशी अवस्था बदलेल तसा वरिष्ठ गुरु असावा. साधना सोडून गुरूच्या मागे लागू नये.
गुरु विषयी सांगतांना पूज्य काकाजी म्हणतात, "गुरू म्हणजे श्रेष्ठ अवस्था प्राप्त केलेले शक्ती केंद्र होय. असल्या शक्तीरुप केन्द्राशी साधनेद्वारे एकरूप झाल्या शिवाय साधकाला साधनेचा अनुभव येणार नाही. गुरू म्हणजे ती श्रेष्ठ अवस्था होय. त्या उच्च अवस्थाधारी व्यक्तीला अर्थात् गुरुला अहंकार रहित भावनेने शरण गेल्याशिवाय दिव्यअनुभव प्राप्त होणार नाहीत".
संदर्भ :- पूज्य काकाजींच्या गुरू-शिष्याच्या गोष्टीतील शंका समाधान
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा