वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - प्राणायाम
प्रश्न क्र. २७ :- प्राणायाम १.४.२ ते १:१८:२ पर्यंत जर होत असेल तर लवकर अनुभव येण्यास हा क्रम दिवसभरात किती वेळेस करावयास हवा ?
प्राण + आयाम अशी प्राणायामाची व्याख्या आहे. परमेश्वराचा साकार वा निराकार साक्षात्कार प्राप्त करून घेणे हे योगसाधनेचे मूळ ध्येय आहे. मन इष्टदेवतेकडे एकाग्र झाल्यावर दर्शने घडत असतात. त्यासाठी एकाच देवतेचे ध्यानी, मनी, जागृती, स्वप्नी सततचे संस्कार आवश्यक असतात. कुंभक प्राणायाम मन:संयमासाठी अतिशय उपयुक्त ठरते पण *प्राणायाम हे ध्येय नसून मनावर ताबा मिळविण्यास सहाय्यक अशी प्रक्रिया आहे.* त्यासाठी मन म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे.
मन
विचाराहून वेगळी मन अशी दुसरी वस्तू नाही. विचार हेच मनाचे स्वरूप आहे, ज्याप्रमाणे एखादा कोळी स्वतःमधून तंतू बाहेर काढतो आणि पुन्हा स्वतःत ओढून घेतो, त्याप्रमाणे मन स्वतःहून जग निर्माण करते आणि स्वतःतच विलीन करते. जेव्हा मनाच्या स्वरुपाचा शोध एखादा माणूस सातत्याने घेतो तेव्हा मन मरते आणि आत्मस्वरुप तेवढे उरते. एक चांगले आणि एक वाईट अशी दोन मने नाहीत. मन एकच आहे. जेव्हा मन पवित्र संस्कारांनी प्रभावित झालेले असते, तेव्हा त्याला चांगले म्हणतात आणि जेव्हा अपवित्र संस्कारांचा पगडा त्याच्यावर बसलेला असतो तेव्हा त्याला वाईट म्हणतात. मन शांत केल्यावर सर्व अवस्था आपोआप प्राप्त होतात. मन शांत करण्यास अनेक उपाय आहेत, त्यात विवेकाचा आश्रय घेतल्याशिवाय सत्य ज्ञान प्राप्त होत नाही. मन ज्या विकारांचे गुलाम बनले आहे ते कारण शोधून काढून नष्ट करावे. प्राणायामानेही मन निश्चल रहाते. पण तो पूर्ववत चालू झाला म्हणजे पुन्हा मन चंचल बनते व पूर्वसंस्कारानुसार भटकत राहते. मन आणि प्राण या दोहोंचे मूळ एकच आहे. 'मी' हा मनाचा पहिला विचार आहे,आणि तोच अहंकार होय. मनातून अहंकार निघून जेव्हा मन शांत होते तेव्हा आपोआप प्राणायाम होतो. याउलट जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा मन शांत होते. जसजसे आत्मस्वरुपाचे विचार अधिकाधिक वरच्या पातळीवर जातील, तसतसे विचार नष्ट होत जातील.
दक्षता
प्राणायाम सकाळी एकदाच करावा, अन्यथा शरीरात दाह वाढू शकतो. कुंभक प्राणायाम करताना काकाजींनी एका वेळी पाच प्राणायाम करावयास सांगितले आहेत. हा प्राणायाम अतिशय तांत्रिक असून योग्य मार्गदर्शनाखालीच सावधगिरी ने वाढवावा लागतो. त्यामुळे घाई मुळीच करू नये. रोजचा नियम चुकवू नये. पहिला व शेवटचा १.४.२ चाच असावा. गूढ गोष्टी वा सिद्धी या आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गात विष्ठेप्रमाणे त्याज्य समजाव्यात. लवकर प्रगती होण्यासाठी प्राणायामाची मात्रा कमी असली तरी चालेल पण ध्यान व चिंतन वाढवावे. पूज्य काकाजींचे सर्व ग्रंथ वाचावेत. "गुरु बिन ज्ञान न होई।"
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करावा.
राजेश कोल्हापुरे- ९७०२९३७३५७
*संदर्भ :- योगीराज मनोहर हरकरे यांचे ग्रंथ*
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा