वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - संजीवनी
प्रश्न क्र. 14 :- रामायणात लक्ष्मण मूर्च्छित झाले नंतर हनुमंताने संजीवनी आणण्याकरिता पर्वतच उचलून आणला हे कसे काय ?
रामायणातील युद्धकांडात राम-रावण यांच्यातील घनघोर युद्धात अनेक बलशाली योद्धे मारले गेले. साधना काळात अनेक वृतींवर आपल्याला विजय मिळवून पुढे जायचे असते. राम-लक्ष्मणाशी युद्ध करण्यासाठी रावणपुत्र इंद्रजितास उतरावं लागतं. इंद्रजित म्हणजे आपण आपल्या इंद्रियावर पूर्ण विजय मिळवला असून आपण आता ब्रह्म जाणून ब्रह्म झालो आहोत असा वृथा अभिमान बाळगणारी साधकांतील नीच प्रवृत्ती होय. असली प्रवृत्ती साधकांना मारक असल्यामुळे रामायणकारांनी इंद्रजिताला रावणपुत्र राक्षस दाखवले आहे. इंद्रजिताने आपला सारा रोख लक्ष्मणावर धरला. लक्ष्मणाला मारले की राम लंगडा पडेल आणि अशा तऱ्हेने राम लक्ष्मणहीन म्हणजे विवेकहीन बनला की त्याला ठार मारणे आपल्याला सुलभ होईल, असा विचार करून आपली खास अमोघ साधनाशक्ती लक्ष्मणावर सोडली.
लक्ष्मण म्हणजे साधकांतील विवेक होय. एवढा शूरवीर लक्ष्मण परंतु इंद्रजिताने सोडलेल्या अमोघ शक्तीने लक्ष्मणाला मूर्च्छित केले. साधनेत अनेकदा निम्नवृत्ती वरचढ होतात. अशावेळी शक्तिशाली मात्रेने त्यावर मात केली जाते. एक संजीवनी वनस्पती यावर उपयुक्त ठरेल असे वैद्य सांगतात. ती आणण्याची जबाबदारी पवनपुत्र महाबली हनुमंतावर सोपवली जाते. विवेक जागृत करण्यास आत्मरामास वायुवेग उड्डाणाचे सहाय्य लागते. साधनेच्या अडचणीत योग्य निर्णय संजीवनी ठरतो. व ती जीवनदायिनी मिळवण्यासाठी भक्ताला गुरुकृपेने द्रोणागिरी उचलून आणलाच पाहिजे. हनुमान सारा पहाडच उचलून घेऊन आले. वैद्यांनी लक्ष्मणाला आवश्यक ती संजीवनी वनस्पती देऊन त्यांची वृत्तीरूप मूर्च्छा नष्ट केली. त्याकाळी सुद्धा वैद्य शरीरक्रिया व ओषधक्रिया शास्र जाणत होते. असे दिसते.
वैदिक शास्त्रांत मानवी शरीराला आद्य स्थान दिले आहे. "शरीरम् आद्यम्". शरीराशिवाय साधना असंभवनीय आहे. साधने करता आद्य उपकरण म्हणजे मानवी शरीर होय. हे उपकरण प्राकृतिक ठेवण्यासाठी पतंजलींनी अष्टांगयोग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधिचा समावेश असून मानवी जीवनाला यम नियमानुसार पालन करून त्या स्वतःस समाधिपर्यंत उन्नत करून मोक्षदायी ठरतात. वैद्यकीय शास्र वेदकालीन आहे, हे मूर्च्छित लक्ष्मणास संजीवनी देऊन पुनर्जीवन मिळणे याचे द्योतक आहे. आजचे आधुनिक वैद्यकीय उपचार पध्दत मानवासाठी संजीवनी वाटत असली तरी ती परीपूर्ण नाही. अलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक या वैद्यकीय मुख्य शाखा असून अनेक उपशाखा आहेत. तरीही त्या त्रोटक वाटतात. कोरोना सारख्या सूक्ष्मतम विषाणूने अख्या जगाला वेठीस धरले आहे. वैद्यकीय ओषधक्रिया चिकित्सक अनेक प्रयोग करीत आहेत. संशोधन करत आहे. त्यांनी याआधी देवीसारख्या आजारांचे उच्चाटन केले, तसे कोरोनाला एखादी संजीवनी बुटी, लस किंवा औषध स्वरूपात बनवण्यात यश मिळणार ही अपेक्षा.
विवेक जर नष्ट झाला तर साधक कसा जगणार ? राम साधकांतील विवेकरूप लक्ष्मण पुनरजागृत झाला. बुद्धीला एकदाच भ्रम पडेल. एकदा त्या भ्रमाचा निरास झाला की खरा साधक तसल्या भ्रमात पुन्हा सापडत नाही. म्हणून इंद्रजिताचे अमोघ मायारूप शक्तीचा लक्ष्मणावर एकदाच परिणाम झाला म्हणून लक्ष्मण (विवेक) वारंवार त्या शक्तीने बेशुद्ध पडणार नाही. आत्ता इंद्रजिताच्या सर्व कारवाया व रहस्य लक्ष्मणाने जाणले होते. लक्ष्मण आता इंद्रजीताचा पूर्ण बिमोड करण्यास सिद्ध झाला. यशस्वी झाला.
संदर्भ :- रामायण रहस्य - योगी मनोहर
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा