वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - द्रौपदीला पाच पती

प्रश्न क्र. 23 :- द्रौपदीला पाच पती असून सुद्धा ती पतिव्रता कशी ॽ

महाभारतात द्रौपदीचे पाच पती म्हणून पाच पांडव दाखवले आहेत. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची निर्मिती केली. या महाभारताच्या आदी पर्वात व्यास म्हणतात. माझ्या मनाच्या अतिउच्च अवस्थेमध्ये म्हणजे समाधि अवस्थेत मला जे ज्ञान प्राप्त झाले, त्याचे मी माझ्या मनाच्या कल्पनेने लोकांकरिता महाभारत रूपाने प्रगटीकरण करत आहे. ते लिहिण्याकरिता हे गणनायका ! तुम्ही माझे लेखक बना. यावरून हे स्पष्ट होते की व्यासांच्या मनाची संकल्पना आणि त्या संकल्पनेचे प्रगटीकरण म्हणजे महाभारत ग्रंथ होय. व्यास ती मनः संकल्पना गणरायाला लिहायला सांगतात. पण महाभारत ग्रंथ इतिहास मानून आपण त्या ज्ञानापासून वंचित राहतो.

 यावरून लक्षात आलेच असेल की महाभारतातील कथा व प्रत्येक पात्र, त्यांची नावे यात आध्यत्मिक रहस्य दडले आहे. शांत चित्ताने विचार केला तर यातील कथा ऐकल्या किंवा वाचल्या नंतर मनास पटतात का? नाहीच पटत ! विशालबुद्धी व्यास व बुद्धी देवता श्री गणेशानेच अशा कथा लिहाव्यात ! द्रौपदी व तिचे पांडव पती अशा एका रहस्यमय कथेचा भाग आहेत. ती आपण पाहू.

द्रौपदीस असलेल्या पांच पतींमुळे ती विश्वविख्यात आहे. कोणत्याही देशात अशा प्रकारे स्त्री-जीवन झाले नसेल. द्रौपदीस पाच पांडवांची पत्नी दाखविली आहे. द्रौपदी एक प्रखर स्वाभिमानी आणि बुद्धिमान स्री दाखवली आहे, जी आपल्या पांच पतींबरोबर नेहमीच राहते. समाज कार्यात, राजकारणात, वनवास आणि अज्ञातवासात, नाहीतर युद्धभूमीवर आणि युद्धभूमीवरील शिबिरांमध्ये सुद्धा ती पाच पतींबरोबर होती. पांडवांच्या इतर काही बायका दाखवल्या आहेत. परंतु त्या पांडवा बरोबर राहत नव्हत्या आणि त्या नाममात्र होत्या. परंतु त्यावेळच्या इतर स्त्रियांना अशी बहुपतीत्वाची प्रथा दाखविली नाही. हा सखोल विचार कऱण्याचा सविस्तर विषय आहे.

द्रुपद ज्या देशाचा राजा होता त्या देशाचे नाव पांचाल दाखवले आहे. पांचाल म्हणजे जेव्हां पंचतत्वावधान एकास एक लागून एकत्र आले आहे असे साधक शरीर. या पांचाल देशाचा राजा द्रुपद म्हणजे जो साधनेमध्ये द्रुत गतीने प्रगती करून उत्तम पद प्राप्त करतो तो साधक द्रुपद आहे. अशा द्रुपदाची कन्या द्रौपदी आहे, जी द्रुत गतीने उत्तम पद प्राप्त करते. यासाठी ती पंडु पुत्र पांडवांशी एकत्र विवाह केलेली दाखवली आहे. तिच्याशी विवाह करून पंचप्राणरूप पांडव द्रुत गतीने उत्तम पद प्राप्त करू शकणार होते. यासाठी द्रौपदी आपल्या पाच पतींबरोबर नेहमी एकत्र राहते, व्यवहारात, युद्धात आणि स्वर्गारोहणाच्या वेळीही !

द्रौपदी स्वयंवर ते पांच पांडवांची धर्मपत्नी होण्यापर्यंतची कथा सर्वश्रुत आहे. द्रौपदी कोणत्या पतीजवळ किती वेळ राहणार हे ठरवण्यासाठी भगवान वेदव्यासांनी एक युक्ती काढली आणि ती सर्व पांडवांनी मानली. द्रौपदी एका-एका पांडवापाशी अडीच-अडीच महिने राहील. त्यावेळी अन्य पांडवांनी त्या दोघांकडे जाऊन त्यांचा एकांत भंग करू नये. द्रौपदी अशा तऱ्हेने अडीच अडीच महिने एका पती जवळ राहिली. परंतु पाच पतींजवळ राहून सुद्धा द्रौपदी पूर्ण पतिव्रता होती. याचे कारण ती द्रुत गतीने साधनेत प्रगती करणारी वृत्ती-काया असल्याने पांडवांना साधनेत सहायक ठरणार होती. हा यौगिक व अध्यात्मिक आशय ठेवून या कथेकडे बघितले तर ती समजायला सोपी जाईल. अन्यथा पारंपरिक पद्धतीने पाहिल्यास कथा लज्जास्पद वाटेल. यावरून व्यासांनी द्रौपदीस वृत्ती-काया संबोधून तिला पतीव्रता-पण बहाल केले आहे.

संदर्भ :- श्रीमत् भगवत् गीता - योगीराज मनोहर हरकरे                             

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी