वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - संत तुकारामाचे सदेह वैकुंठ गमन
प्रश्न क्र. 28:- संत तुकारामाचे सदेह वैकुंठ गमन यातील योगिक रहस्य कोणते ॽ
अध्यात्माचा वसा घेतलेला एकच देश या जगात आहे आणि तो म्हणजे भारत होय. 'भा' म्हणजे प्रकाश अथवा ज्ञान आणि त्या ज्ञानरुपी प्रकाशात 'रत' होणारा तो भारत. अध्यात्मप्राप्तीकडे नेण्याकरता भारतात अनेक संतपुरुष झालेत. या मेळाव्यात मानवी उद्धारातील ज्ञान परंपरेतील एक मुकुटमणी म्हणजे संत तुकाराम होय. पांच हजाराहून अधिक अभंगातून अध्यात्मज्ञान सांगणारे तुकोबा जगतगुरु झाले. 'तुका आकाशा एवढा'
प्रपंचात असून परमार्थात आकाशउंची गाठणारे संत तुकारामांचे संपूर्ण जीवन संघर्षमय आहे. तसे बघितले तर सर्वंच महापुरुषांचे आयुष्य संघर्षाने भरलेले असते. तेंव्हा ते परमोच्च अवस्थेपर्यंत पोहचतात. कष्टा विना फळ नाही. अखिल मानवासाठी 'प्रेम आणि परोपकार हाच मानवधर्म आहे.'* हा विश्व संदेश देणारे पूज्य काकाजी विश्वयोगी आहेत. माऊली म्हणतात ‘विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले । अवघे चि जालें देह ब्रह्म’।। विश्वाचे कल्याण हेतू मनात प्रकटला आणि हा देहच ब्रह्म झाला. हा देह प्रपंच म्हणजे पंचमहाभूतांचे एकत्रित संच आहे. कवी म्हणतात- माती असशी, मातीत मिळशी ! पंचमहाभूतांचा हा देह सदेह वैकुंठात गेला असा भक्तिमय भाव तुकाराम भक्तात रूढ आहे. वैकुंठ म्हणजे शास्त्र सांगते. 'विगतः कुंठः अस्य वैकुण्ठः' अर्थात जिथे गती नाही ते अवस्धागम्य स्थान म्हणजेच वैकुंठ होय.
प्रत्येक काळात संतबोल समाजात सर्वमान्य होईलच असे नाही. त्यावेळीही तुकारामांना प्रचंड सामाजिक विरोधाला सामना करावा लागला होता. त्यांनी लिहलेले अभंग ज्ञानाची गाथा इंद्रायणीत बुडवण्यास भाग पाडले. परंतु भक्तीच्या बळावर ते परत मिळवले. एवढी भक्ती केवढी शक्ती. तरी सुद्धा संत समाजासाठीच कार्य करीत असतात. 'तुका म्हणे कैसे आंधळे हे जन । गेले विसरुन खऱ्या देवा॥ आंधळे जन कोण? जे हे ब्रह्मज्ञान जाणत नाही ते. मग अशा हे ज्ञानगाथा ते बुडवू पाहणारच. जन्मजात कुणी ब्रह्म जाणत नाही. वेदात उल्लेख आहे की *'ब्रह्म जानाति ब्राह्मणः'* जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. जन्माने आपण सारे शुद्र असतो. *'जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते।'* सुयोग्य संस्काराने आपण ब्रह्म जाणणारे ब्राह्मण होतो. सारे संत यामुळे ब्राह्मणच होते.
संत तुकाराम आपल्या एका अभंगात म्हणतात. 'तुका म्हणे दिले उमटूनि जगीं , घेतले ते अंगी लावूनिया ।' परमेश्वराने मला सर्व दाखवून दिले असून ती मी माझ्या जीवनाची सर्व स्तरांत लागू केले आहे. आता मी जन्ममरणाचे वर असून सर्व मोह आणि मायेच्या वर आहे. तुकाराम सदेह वैकुंठात गेले कसे यावर बरचं लिखाण झाले आहे. तुकारामाचा मृत्यू कोणाला माहित नाही असे म्हणतात की, इंद्रायणी तीरापर्यंत लोक त्यांना पोहोचवायला गेली. नंतर तुकारामांनी सर्वांना परत जायला सांगितले. तुकारामाचा दिव्य मृत्यू लोक पाहू शकत नसते, याची तुकारामाला पूर्ण कल्पना होती. इंद्रायणी पार करून गेल्यानंतर ते वनात जाऊन स्वस्थ बसले आणि आपले शरीर पुनर पंचतत्वात विलीन केले. 'आम्ही जातो आमुच्या गांवा आमुचा रामराम घ्यावा'
*संदर्भ :- संत तुकाराम मृत्यू अनुभव - योगीराज मनोहर हरकरे*
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा