वैदिक सणांचे योग रहस्य-भाग २०
वैदिक सणांचे योग रहस्य-भाग २०
शयनी एकादशी व वटसावित्री
पौर्णिमेला मूळ नक्षत्र येते म्हणून आषाढ मास. आषाढ मासाला शुचिमासही म्हणतात, 'शोचन्ति विरहिणा अस्मिन शुचिमासः' शास्त्र सांगते. कोण विरही झाले आहे आणि कोणामुळे ? या एकादशीलाच शयनी एकादशी असेही म्हणतात. भक्ताचे सर्वस्व असा भगवान श्रीविष्णु शयनी एकादशीला चातुर्मास्याच्या दीर्घ निद्रेला लागतो. चातुर्मास्य संपते आणि भगवान श्रीविष्णूंना जाग येते. तोपर्यंत भक्त भगवंताशिवाय कसा राहणार? भगवंताशिवाय भक्त विरही म्हणजे शुची बनला आहे, म्हणून या आषाढाला शुचिमास म्हणतात, भगवंताच्या विरहामुळे भक्त आषाढ शुद्ध एकादशी निर्जला करतो.
द्वादशीला सावित्रीव्रत येते. पौर्णिमेला वटसावित्री व्रत संपते. वटसावित्रीचे जीवन भारतीय नारींना सहस्त्रावधी वर्षापासून आदर्शवत राहिले आहे. तथाकथित सुखसमृध्दीला बळी न पडता आपला जीवनसाथीदार एकदा निवडल्यावर त्यावर ज्या कोणत्या आपत्ती येतील त्या आपल्या समजून सावित्रीने रानावनातसुध्दा सत्यवानाला पूर्ण साथ दिली. लाकडे तोडल्यावर साप चावून त्याला मृत्यू आल्याने सावित्री डगमगली नाही. तिने यमालाही जिंकले आणि आपल्या पतिव्रत्याच्या पुण्याईवर आपल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून सोडविले. आज सावित्री तर जवळ जवळ नामशेषच झाल्या आहेत पण त्याऐवजी सख्यात सावत्रपणा आला आहे. कुटुंब संस्थाच नामशेष होण्याची वेळ आली आहे. शुचिमास असाच विरही अवस्थेत निघून जातो आणि पौर्णिमेला श्रवण नक्षत्र येणारा श्रावण मास लागतो.
चतुर्थी पंचमीला हिरण्यकेशी आणि शुक्ल श्रावणी येते. या दिवशी द्विजांनी आपापले जीर्ण यज्ञोपवीत टाकून नवीन धारण करायची असतात. त्यादिवशी पंचगव्याचा प्रसाद ग्रहण करायचा असतो. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, मूत्र, शेण आणि लाळ एकत्र करून ते प्राशन करायचे असते. साधनामार्गातील पंचगव्य म्हणजे पंचज्ञानेंद्रियांचे सतर्क कर्म असते. पंचगव्याशिवाय दिव्यवेदाचे श्रवण नाही. दिव्य उत्पादक नादाने श्रावणी होत असते. परंतु ती न साधल्यास प्रत्येक द्विजाने श्रावणीचे धर्मकर्म अवश्य करावे. कलीचा उदय कलियुगात झाल्याकारणाने आज कल्की जयंती साजरी करतात चतुर्दशीला पुन्हा भटक श्रावणी येते.
श्रवण नक्षत्र
ज्याचे जन्मनक्षत्र श्रवण असेल त्याला आयुष्यभर धनयोग चांगला असतो आणि खर्चही तसाच असतो असे ज्योतिषशास्त्रात समजले जाते. मानवी जीवनात याचा कोणाला काय अनुभव येत असेल ते तो जाणे. पण येथे स्वर्गातील श्रवणनक्षत्र योगात मात्र असाच योग आहे. श्रावणात निर्सग भरपूर पर्जन्य मेघातुन आणतो आणि मुक्त हस्ताने तो पृथ्वीवर सिंचन करतो. धर्माची व्याख्या अशीच आहे. 'यतोऽभ्युदय निःश्रेयससिद्धिस धर्मः' हर्षराजाही असेच करीत असे. दरवर्षी सर्व पृथ्वीवरून भरपूर धन कमवायचे आणि वर्षानंतर ते सर्व धन गरिबांना दान करायचे असे हर्षराजाचे धर्म्यब्रीद होते.
श्रीकृष्ण जयंती आणि जन्माष्टमी
भाद्रपद प्रतिपदेपासून श्रीकृष्ण जन्माची घटस्थापना असते. श्रीरामांची घटस्थापना झाल्यावर रामजन्म नवमीला येतो, पण श्रीकृष्णाचे सगळे वेगळेच. त्यांचा जन्म अष्टमीला होतो. त्यांचा जन्मही आठवाच. त्यांना बायका सुध्दा आठच. म्हणून अष्टमीला या आठव्या अवताराची जयंती साजरी करतात. भगवान श्रीकृष्ण म्हणजे पूर्णावतार ! पूर्णस्यपूर्णमादाय पूर्ण मेवावशिष्यते! सर्व दिल्यावरही पूर्णच ! साजिरे गोजिरे परब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण होत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, 'तुज सगुण म्हणो की निर्गुण रे' पंचतत्वातून सर्व विश्वशक्तीचे सतत कर्षण करणारा असा पूर्ण साधक म्हणजेच भगवान श्रीकृष्ण होय. आपण भगवान श्रीकृष्णाला जाणतो त्यापेक्षा ते हजार पटींनी श्रेष्ठ, गूढ व विशाल आहेत. आता साधक नराचा नारायण झाला आहे. शास्त्र व्याख्या सांगतात 'कर्षति इति कृष्ण : समाधी अवस्थेमधे जो योगी स्वतःमध्ये विश्वाच्या सर्व शक्ती कर्षित करतो तो कृष्ण. या साधकाला कंस म्हणजे त्याचा मामाच ठार करण्याकरीता सतत प्रयत्नशील असतो. आपल्यातील वाईट वृत्ती कित्येकदा आपल्याला प्रिय व जवळच्या म्हणजे सख्या वाटतात. त्यांना ठार मारल्याशिवाय साधनेत प्रगती होत नाही. देवकीचा भाऊ म्हणजे उग्रसेनाचा मुलगा कंस ! देवत्व देणाऱ्या शक्तीला हा उग्रवृत्तीचा व नामधन्य कंस बंदिस्त करतो. इंद्रियातील दैवीशक्ती म्हणजे वसुदेवाला सुद्धा देवकीसह कंस बंदिखान्यात ठेवतो. अशा बंदिस्त जीवनातच आठव्या कृष्णाचा जन्म होतो. आकाश तत्व पूर्ण अवतार नीलश्याम वर्णीय श्याम सुंदराचा आज जन्मदिवस असतो.
गो-कुळात म्हणजे इंद्रियग्रामात त्याचा जन्म झालेला असतो. गौ म्हणजे इंद्रिय. म्हणूनच तुलसीदासांना गोस्वामी (इंद्रियांचा स्वामी) तुलसीदास म्हटले आहे. त्याचे सवंगडी म्हणजे गोप आणि गोपी. इंद्रियातील गुप्त शक्ती म्हणजेच गोप आणि गोपी व इंद्रियांचा स्वामी इंद्र. इंद्रियपरायण इंद्रियांना सोकावलेल्या सुखासीन अशा इंद्राची परंपरागत पूजा त्याला बंद करायची असते. दैवी गुप्तशक्तीच्या बहिण जावयाला बंदिस्त करणाऱ्या कंस मामाला त्याला ठार करायचे असते. चाणूर म्हणजे आपल्या अणुरेणूत भरलेल्या राक्षसी वृत्तींना ठार करायचे असते. असले अनेक राक्षस त्याला सतावीत असतात परंतू आपल्या साधनेच्या बालवयातच त्यांचा तो निप्पात करतो. आपल्या क्षेत्ररूपी कुरुक्षेत्रात युध्दाला समोरासमोर उभ्या ठाकलेल्या पंचप्राणरूपी पांडवांचा पक्ष घेऊन कामासक्त अशा अविवेकी कौरवांचा त्याला नाश करायचा असतो. शेवटी अविवेकी शक्तींनी माजलेल्या आपल्या यादवांचा संपूर्ण संहार करून त्याला महाभारत संपवायचे असते. जगाच्या इतिहासाला अभिनव कलाटणी देणारा महापुरूष पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण आज जन्माला येतो.श्रीकृष्ण जन्माष्टमी अशी आहे. पूर्णावतार श्रीकृष्णाला जन्म दिल्यावर वर्षा ऋतू आपले जीवन संपवितो. नवीन वर्ष सुरू व्हायला पाहते. 'एवम् प्रवर्तीतं चक्रं' ऋतूंचा फेरा संपला.
षडऋतूंचा हा षड्गुणहार भगवंताला अर्पण असो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘षड्गुण गोंडे रत्नजडित तुज श्यामसुंदरा शोभली रे' ज्ञानेश्वरमाऊलींच्या कृपेनेच हा षडऋतुहार लेखक भगवंताला अर्पण करू शकला. आमच्या पुराणकथेमधे शास्त्रातील गूढ सिध्दांतांचे बेमालूम वर्णनकेले आहे. त्या ऐतिहासिक घटना समजल्यास आम्ही अज्ञानात राहू आणि आपल्या उच्च संस्कृती, वैदिक म्हणजे ज्ञानमय परंपरेला व सभ्यतेला पारखे होऊ. आज सर्व जगालाच असल्या शास्त्रीय संस्कृतीची गरज आहे. त्या महान संस्कृतीचे खरे वारसदार आपण भारतीय, त्यांना आपल्या सणोत्सवातील रहस्य कळणे परम आवश्यक आहे. म्हणून हा ऋतुसणांचा प्रपंच थाटला. आपल्या सणांतील रहस्ये कळून त्या योगसाधनांच्या प्राप्तीसाठी साधक प्रवृत्त होवोत ही इच्छा प्रदर्शित करून सणांचे वर्णन पूर्ण करतो.
भद्रं नो अपिवातय मना :
हे परमेश्वरा, आम्हाला चांगल्या कार्यामध्ये रस दे
लेखमाला समाप्त
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
शब्दांकन – राजेश कोल्हापुरे – संपर्क ९७०२९३७३५७ / ९५९४७३७३५७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा