वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - सीता जन्म

प्रश्न क्र. 9 :- जमिनीतून सीतेने जन्म कसा घेतला? असे मूल उत्पन्न होवू शकेल काय ? ही भगवंतांची लीला आहे तर भगवंतांना कौसल्येच्या पोटी जन्म का घ्यावा लागला ? किंवा यातील योगरहस्य काय असावे ?

 या एकाच प्रश्नात तीन-चार प्रश्न विचारले गेले आहेत. त्यातले एकेका प्रश्नाचे उत्तर आपण बघू.

जमिनीतून सीतेचा जन्म आणि अशी उत्पत्ती होऊ शकते का ? तसं बघितलं तर आजच्या या वैज्ञानिक युगात हे कुणालाही पटण्यासारखे नाही. हे सर्वांनाच मान्य आहे की या पध्दतीने उत्पत्ती होणे अशक्यप्राय आहे. सर्व सुज्ञ मंडळींना हे पटण्यासारखे आहे. मग मुनिपुंगव म्हणजे सर्व मुनींमधे श्रेष्ठ असे रामायणकार वाल्मिकींनी हे असे लिखाण केले आहे. यात नक्कीच काही गूढ योगरहस्य सांगितलेली आहेत. त्यातील एक-एक पात्र योग साधनेला धरून, अती गुह्य पद्धतीने उत्कृष्टरित्या ऋषी वाल्मीकींनी कशी गुंफली आहे ते पाहू.

मिथिला नगरीचा राजा जनक एके दिवशी आपल्या शेतात नांगर चालवीत होता. सामाजिक दृष्टीने पाहिलं तर एका नगरीचा राजा, स्वतः हातात नांगर घेऊन आपल्या शेतात काम करणं शक्य नाही. मिथिला शब्द दोन उपशब्दा पासून तयार झाला आहे. 'मिथ' इला'. मिथ पासून मिथ्या हा शब्द तयार झाला आहे. ज्याचा उपयोग दृश्यमान जगता करता आपण करतो. हे जग मिथ्या आहे, भासमान आहे असे म्हणतो. 'मिथ' म्हणजे भ्रमात्मक, भासमान किंवा असत्य, नाशवंत, जड. हाच शब्द इंग्रजी भाषेत जसाच्या तसा वापरण्यात आला आहे. आणि 'इला' म्हणजे जीव किंवा जीवात्मा. शरीर हे जीवात्म्याचे कार्य करण्याचे उपकरण आहे. म्हणून मिथिला म्हणजे आपले जडशरीर होय. हे स्पष्ट आहे. मिथिला म्हणजे राजा जनक आपल्या नगरीत म्हणजे ह्या जडशरीरात. नांगर म्हणजे सत्कर्मरूपी नांगर चालवतो. भगवंताने गीतेच्या तेराव्या अध्यायात शरीराला क्षेत्र म्हणजे शेती म्हटले आहे. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिदीयते I

राजा जनक आपल्या देहरूपी शेतात असाच नांगर चालवीत होता. अन्यथा एक राजा स्वतःच्या शेतात नांगर चालवणे शक्य नाही. राजाची माणसे शेतात नांगर चालवतात. प्रत्यक्ष राजा नव्हे. शेती नांगरता-नांगरता राजा जनकाला भूमीत एक सुंदर कन्या आढळली. आणि तिचे नाव त्यांनी सीता असे ठेवले. सीता भूमीतून म्हणजे पृथ्वीतत्त्वातून प्राप्त झाली. आपले जड शरीर सुद्धा आपल्याला पृथ्वीतत्वातूनच प्राप्त होते. यानुसार, प्रत्येकाचे जडशरीर म्हणजे भूमिकन्या सीता होय.

ही काही भगवंताची लीला नाही. हे योग साधनेतील रहस्य आहे. भगवंत गीतेत सांगतात की "योगः कर्मसु कौशलम्". योगमार्गात कौशल्याने साधना केल्यास यश हमखास मिळते. अशा साधकात कौशल्यवृत्ती असणे साधनेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. कुशलतेने साधना करणाऱ्या दशरथाची वृत्तीरूप पत्नी कौसल्या असणार! दशेन्द्रिय संयमित दशरथ पिता आणि साधना क्षेत्रातील कौशल्यावृत्ती माता कौशल्या असल्यावर रामा सारख्या आत्मानंदाची साधकाला अवश्य प्राप्ती होणार. कौसल्या पोटी प्रभू रामास जन्म घ्यावा लागला. आणि राम आत्मा काया सीता एकत्रित येणारच! एकमेकांना वरणार. सुख-दुःखात साथ देणारच.

सीता जीवन संपवितांना परत पृथ्वीतत्त्वातच गिळली जाते असे रामायणकार सांगतात. बरोबरच आहे. माती असशी मातीत मिळशी". असे हे योगरहस्य भरभर वाचून कळणार नाही. त्याला मनन-चिंतनाची जोड पाहिजे. साधनेचा अंश पाहिजे.

संदर्भ :- रामायण रहस्य - योगी मनोहर

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा. https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी