वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - यम नियम
प्रश्न क्र. 24 :- योग साधनेतील यम नियम म्हणजे काय ॽ
महर्षी पतंजलींनी योग सूत्रात अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, आणि समाधी हे आठ अंग सांगितले आहेत. यात यम व नियम यांना आसनांच्या आधी स्थान दिले आहे. पण आजकाल योग म्हटलं की आपल्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी आसन प्राणायाम करायचे. अशी धारणा झालेली आहे. यम पासून सुरू झालेले हा अष्टांग योग उच्च अशा समाधी अवस्थे पर्यंत साधकाला घेऊन जाण्यास परिपूर्ण आहे. या अष्टांग योगाचे आपल्या जीवनात कटाक्षाने पालन केले तर साधकास मोक्षप्रद घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.
पतंजलींनी यम यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह तर नियम यामध्ये शौच, सन्तोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान असे प्रत्येकी पाच उप यम-नियम सांगितले आहेत. यामुळे यम व नियम हे योगशास्त्राचा आवश्यक असा पाया मानला जातो. सर्व सृष्टी ज्या आवश्यक संस्कारावर घटनाक्रमाद्वारे आपण होऊन चालते, अशा या अनुशासनयुक्त अवस्थेला यम म्हणतात. काही प्राकृतिक अवस्थांवर सततचे संस्कार होऊन ते संस्कार त्या अवस्थे करिता ग्राह्य किंवा रसपूर्ण होऊन जातात. तेच संस्कार त्या अवस्थेसाठी अटल किंवा आवश्यक होतात की त्यांच्या शिवाय ते पदार्थ किंवा अवस्था राहू शकत नाही. सृष्टीचा प्रत्येक पदार्थ किंवा अवस्था त्यावर झालेल्या योग्य संस्कार क्रमानुसार आपली जीवन यात्रा चालवतात, त्यास यम म्हणतात. कोणे एके काळी पृथ्वीने सूर्याभोवती परिभ्रमण करण्यास सुरुवात केली. जोपर्यंत पृथ्वी सूर्याशी संबंधित आहे तोपर्यंत ती सूर्याभोवती फिरतच राहणार. पृथ्वीच्या या प्रदर्शनाला यम म्हणतात.
नवीन नवीन संस्कार ग्रहण झाल्यानेच सृष्टीमध्ये विविधता येते. ह्या प्रकारचे संस्कार सुलभ व संस्कारक्षम मन अवस्था म्हणजे नियम होय. नियमांचा संबंध संस्कारक्षम मनाशी आहे. मनाची अवस्था इतकी सूक्ष्म आहे. सुसंस्कार ग्रहण करण्यास नियम म्हणतात याच कारणाने सुसभ्य आणि सुसंस्कारित मानव समाज नियमाच्या अधीन असतो.
साधकास ब्राह्ममुहूर्तावर उठणे, त्याकरिता शौचमुखमार्जन व जमल्यास स्नानादि शरीरशुद्धी करून साधना करण्यासाठी क्रिया करणे. आणि पुढे मनशुद्धीसाठी आसन प्राणायाम साधनेंकरिता जे शरीर-मनावर संस्कार करून उत्क्रांत होत जाणे म्हणजे त्या परमतत्त्वाशी संबंधित साधकाचे यम नियम होय.
संदर्भ :- पूज्य काकाजींच्या व्याखानंतील समालोचन
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा