वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - कुंडलिनी

प्रश्न क्र.  41 :- कुंडलिनी म्हणजे काय ?

 कुंडलिनिबद्दल बऱ्याच चुकीच्या कल्पना असल्याचे आढळून येते. कुंडलिन एक शक्ति अवश्य आहे. तिचे वास्तव्य नेहमी मूलाधार चक्रात असते असे मानण्यात येते. जागृत झालेली कुंडलिनि शक्ति सुषुम्ना नाडीतून उर्ध्वगतिक होऊन षट्चक्रभेदन करते. परंतु कुंडलिनि शक्ति केवळ मूलाधार चक्रातच वास करते की तिचे स्वरूप आणि अस्तित्व अन्य कोण्या स्थानी आहे याचे कुंडलिनिचे शास्त्रीय स्वरुप समजून घेण्याच्या दृष्टीनी योग्य ते संशोधन होणे आवश्यक आहे. सर्वदूर असे मानण्यात आलेले आहे की कुंडलिनि मूलाधार चक्रात सुप्तावस्थेत पडलेली असते किंवा एखाद्या सर्पिणीसारखी साडेतीन चक्रात स्वत:ला गुंडाळून घेऊन व आपले तोंड मूलाधार चक्राच्या अधोभागात खुपसून निद्रितावस्थेत पडलेली असते. प्रत्यक्ष अनुभव न घेता चुकीच्या ग्रंथाचे वाचन करून, आपल्या मनात ते विचार संग्रहित करून स्वतःची व समाजाची दिशाभूल करतात. आणि कुंडलिनी बाबत इतरांच्या मनात संभ्रम तयार करून, गैरसमज व अंधश्रद्धा पसरवतात. त्यावर स्वतःची मल्लिनाथी करूनच नवीन ग्रंथलेखन करतात. यामुळे त्यात वास्तवता फारच कमी आढळते. अनुभव नसतांना केलेले लिखाण किंवा तयार केलेले स्वयंमत हे केव्हाही आध्यत्मिकतेला घातक ठरते. मग तो साधक अधोगतिकडे जातो. स्वतःचे पर्यायाने समाजाचे नुकसान करतो. हा संग्रहित गैरसमज बदलावयास पाहिजे. कुंडलिनीचे खरे ज्ञान समाजापर्यंत पोहचणे हे प्रत्येक खऱ्या साधकाचे कर्तव्य आहे. नाहीतर कुंडलिनी शक्ती जागृतीचे दुकान मांडून अमाप धन जमविणाऱ्याचा व्यवसाय जोमात चाललेला आहे. आणि समाजातील काही घटक त्याला बळी पडून आपला ढोल वाजवून घेतात. व आर्थिक, आध्यत्मिक दोन्ही प्रकारे नुकसान करून त्याचे प्रायश्चित भोगतात.

 योगशास्त्रावरील पुस्तकात अनुभवशून्य अशांचाच भरणा अधिक आहे. एक पातंजल योगसूत्र वगळल्यास इतर पुस्तके अशीच काल्पनिक स्वरुपाची आहेत. कुंडलिनि शक्तीचे स्वरुप ओळखण्याकरिता प्रत्यक्ष योगाभ्यासाने प्राप्त झालेले सूक्ष्म व गहन अनुभव, जे खऱ्या योगसाधकाकरिता सर्वमान्य आहेत, आवश्यक व पुरेसे आहेत. शरीराच्या अंतर्भागात घटाघटांत भरून राहिलेल्या अणुरेणूंचीच जुनी रचना पूर्णपणे बदलून साधनाधर्माला योग्य अशी नवीन अणूरेणू रचना बनणे हेच कुंडलिनी जागृत होणे होय. कुंडलिनीचे स्थान केवळ मूलाधार चक्रात नसून संपूर्ण शरीराच्या अणूरेणू मध्ये आहे. जो साधक नाही, त्याच्या शरीरातील अणूरचना साधनाधर्माकरता योग्य नसते, म्हणजेच  एकप्रकारे सुप्त असते. सुयोग्य साधनेमुळे ती सुप्तावस्था जाऊन शरीर साधनेला योग्य असे बनते. शरीरातील घटात नवी अणूरचना येऊन ते कार्यक्षम बनते. हेच कुंडलिनी जागरण आहे.

साधक कोणत्याही देशाचा किंवा धर्माचा व पंथाचा असला तरी योगाभ्यास सर्व मानव जातीचा अधिकार आहे. योगाभ्यास करून स्वतःला उन्नत व ज्ञानपूर्ण बनवणे सर्व मानवांचे कर्तव्य आहे. विद् म्हणजे जाणणे आणि ज्ञान मिळूवून जीवन व्यतीत करणे, या उद्देशाने सर्वच संसार पुन्हा वैदिक बनण्यात मानवजातीचे कल्याण आहे. खरे ज्ञानविज्ञान जगासमोर आणणे. चुकीच्या कल्पनांचे खंडन करून अध्यात्मिकतेमधील रहस्य उलगडून समाजाला योग्य दिशादर्शक करून उन्नत करणे हेच वैदिक विश्वाचे मुख्य कार्य आहे. चला सर्व मिळून हे कार्य हाती घेऊन जागृतीचा नवा मंत्र समाजाला देऊ.

संदर्भ :- कुंडलिनी - योगीराज मनोहर हरकरे लिखित पुस्तकातून साभार

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी