वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - मंत्र पुष्पांजली अर्थ
प्रश्न क्र. 40 :- मंत्र पुष्पांजली म्हणजे काय आणि मंत्र पुष्पांजलीचा अर्थ काय आहे ?
मंत्र पुष्पांजली
ही मंत्ररूप पुष्पाची अंजली आहे. वैदिक परंपरेनुसार देवतांची पूजा अर्चना झाल्यानंतर ही ईशचरणी अर्पण केल्या जाते. यामधे चारी वेदामधील "देवा:" उपाधि असलेले काही मंत्र एकत्रित केलेले आहेत. मंत्रपुष्पांजली मध्ये ज्या काही विशिष्ट शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे, त्यांचा ऐतिहासिक अर्थ काढला जातो. पण वेदांमधे असलेले ते शब्द ऐतिहासिक नसून साधनेत प्राप्त होणाऱ्या अवस्था आहेत. हे सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच प.पू. काकाजींनी हा मंत्र पुष्पांजलीचा अर्थ आम्हा सर्व साधकांना समजावून सांगितला. पाश्चिमात्य विद्वानांना साधनेचा अनुभव नसल्यामुळे ते यातून ऐतिहासिक आशय काढतात. पण वेदांमधे आध्यात्मिक ज्ञान व विज्ञानानुभव आलेले आहेत हे सत्य आहे.
वेदाच्या वरील अवस्थेचे महत्व लक्षात घेऊन मंत्र पुष्पांजलीचा सुयोग्य अर्थ पहावा लागेल. एक विशिष्ट शब्दरचना ज्याच्या केवळ उच्चारणाने अनेक भौतिक सुखसाधनांची प्राप्ति होते असा 'मंत्र' या शब्दाचा अर्थ घेतला जातो. केवळ शब्दांमधे शक्ति असती तर ते फक्त लिहल्यामुळे किंवा त्यांचा उच्चार करताच त्याचा परिणाम दिसायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असे घडून येताना दिसत नाही. कारण मंत्र या शब्दाचा आशय, शास्त्र सांगते त्याप्रमाणे वेगळा आहे. "मननात् त्रायते इति मन्त्रः", ज्या शब्दोच्चारणांच्या मनन व चिंतनामुळे साधकाच्या अनुभूत अवस्थेचे रक्षण होते त्याला मंत्र म्हणतात. साधकाला मन आहे, ज्याद्वारे तो मनन चिंतन करू शकतो. केवळ शब्दांच्या उच्चारणामुळे मनाची शक्ती प्राप्त होणार नाही, तर मंत्रातील शब्दांची तीव्र साधना मनाद्वारे करावी लागेल. तरच अशा तपस्वी साधकाच्या मंत्राची शक्ती व त्याचा परिणाम दिसून येईल. या तपः साधनेनेच मंत्रपुष्पांजली चा परिणाम प्राप्त होईल. सर्व वेदमंत्राचे सुध्दा हेच सत्य स्वरूप आहे, जे जाणून त्यानुसार त्याचा उपयोग करावा.
मंत्रपुष्पाजलीतील प्रारंभ ॐ या ब्रह्मवाचक शब्दाने केला आहे. यानंतर आलेला शब्द 'यज्ञ'. याबद्दल गीतेच्या ४थ्या अध्यायातील २४व्या श्लोकात आशय विदित केला आहे. यज्ञात अर्पण करायचे ते ब्रह्मच, हवन करणारा ब्रह्मच, अग्निसुध्दा ब्रह्म आणि ते कर्मसुध्दा ब्रह्मातच विलीन होईल. इंद्रियांव्दारे होणारी सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करणे यालाच यज्ञ म्हणतात. यज्ञ म्हणजे श्रेष्ठ अवस्था जाणून त्याचा अनुभव घेण्यासाठी करण्यात येणारी तपःसाधना आहे. गीता स्पष्ट सांगते की जीवन एक यज्ञ आहे. अग्नि पेटवून काही शब्दांचे उच्चारण करून अग्नित द्रव्य अर्पण करणे म्हणजे यज्ञ संपन्न झाला, असे कर्मपाखंड ज्यांना कर्मरूपी यज्ञ करता येत नाही त्यांनी उत्पन्न केले असावे.
देवांनी तशा प्रकारची तपःसाधना करून इच्छित अवस्था प्राप्त केली म्हणजे देवत्व मिळवले. देव म्हणजे देणारा, तपःसाधना करणारा साधक किंवा अवस्था, ज्याद्वारे 'धर्म अवस्था' उत्पन्न झाली. सततच्या संस्कारामुळे देवांची एक धारणा बनली, जो त्यांचा धर्म होय. आपली प्राकृतिक सुलभ धर्म्य अवस्था प्राप्त करणेच 'स्वर्ग' आहे व ती प्रत्येक अवस्थेसाठी सुखकारक आहे. सततच्या चांगल्या संस्कारांमुळे देवत्व म्हणजे श्रेष्ठ साधकांना स्वर्ग प्राप्ति होते.
शक्तिशाली कुबेर देवाचा धनपति मानल्या जातो. प्राप्तिची अभिलाषा 'कु' म्हणजे वाईट म्हणून त्याला कुबेर म्हटले आहे. ज्यांना देव बनायचे आहे ते अशा शक्तीशाली कुबेराला नमन करतात कारण तो कामेच्छा पूर्ण करणारा आहे. स्वस्ति- आपल्या संस्कारानुसार असणारी कल्याणकारक अवस्था साम्राज्य धर्माचे पालन करणारी उत्तम अवस्था. भोज्य:- भोग व समृद्धि देणारी धर्म्य अवस्था. स्वाराज्यं - आपल्या संस्काराना अनुकूल असणारी. वैराज्यं - आपल्या गुणधर्माची विशेष अवस्था. पारमेष्ठ्यं राज्यं - परम इष्ट देणारी प्रजापति ब्रह्माची सुखकारक अवस्था. समुद्र-सम उदरः -म्हणजे सर्वत्र समानतेने विस्तारित असणारे आपतत्व. वैदिक परंपरा केवळ भारतीय समुद्रापर्यंत मर्यादित नव्हती. सार्वभौम - सर्व अवस्थावर सत्ता असणारी शक्ति. सार्वायुष -सर्व स्पंदनात्मक अवस्थावर सत्ता चालवणारी श्रेष्ठ शक्ति. आन्तादापरार्थात् -अंत, प्रारंभ व विस्ताराच्या पलिकडे असणारी परमावस्था. एकराट - एक सत्ता. मरूतः - वायुतत्व अवस्था होय.
मंत्रपुष्पांजलीचा अर्थ
देवत्व प्राप्त करण्यासाठी आपण सर्व देवत्व प्राप्तिचा 'तपःसाधना' यज्ञ करू या. जीवनाचे प्रत्येक कर्म एक यज्ञ आहे. ही यज्ञ तपस्या केल्यावर प्रथम धर्माची प्राप्ति होते, जो जीवनाचा आधार आहे. धर्म म्हणजे सततच्या संस्काराची बाह्य अंगभूत अवस्था आहे, ज्यामुळे सर्व सृष्टीचे अस्तित्व आहे. त्या धर्माचा प्रादुर्भाव आपल्यामधे करू या व त्याव्दारे आपण आपली स्वतःची सुखद अवस्था प्राप्त करू या. यापूर्वी काहींनी ही उच्चावस्था प्राप्त केली होती व देवत्व मिळविले होते. शक्तिच्या परम प्राप्तीचे धन कुबेराने पूर्वी प्राप्त केले होते, ज्यामुळे कुबेर देवांचा अधिपति झाला. हा कामना पूर्ति करणारा कुबेर महान आहे. हे शक्ति धन प्राप्त करण्यासाठी देवांनी कुबेराची जशी आराधना केली होती. तशी आपण सर्व करू या. कुबेर आमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या प्रकारे आम्ही आपल्या धारणाधर्माचे पालन करून महान शक्तिशाली अधिपति बनू या. ही साऱ्या विश्वाच्या परमश्रेष्ठ अमर्यादित0 अवस्थेच्याही पलिकडील कल्याणकारक अवस्था आहे. या शक्ति सामर्थ्याने आम्ही पृथ्वी तत्वांतील जड वस्तूंची एवं सर्वप्राप्ति करून देणाऱ्या आपतत्वाची प्राप्ति करू शकतो. याच शक्तिसंचयामुळे आम्ही ज्ञानमय तेजस् तत्व व बलशाली वायु तत्वही प्राप्त करू शकतो आणि तदनंतर विश्वाचा अनुभव करून देणारी देव अवस्था प्राप्त करू शकतो.
संदर्भ :- खानापूर, पुणे निवासी शिबिरातील पूज्य काकाजींच्या व्याखानातून विश्लेषण
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://vaidik-vishwa.blogspot.com/
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा