वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - गतजन्म स्मरण

प्रश्न क्र. 38 :- आपला ह्या जन्मातील भूतकाळ आपणास आठवतो, पण आपला गतजन्म आपणास का नाही स्मरणात राहत ?

आपला या जन्मातील भूतकाळ आपण जागृत अवस्थेत जगलेला असतो, म्हणून तो आपणास आठवतो. पण अगदी बाल्यावस्थेतील जीवन काळ आपणास काही आठवत नाही. तो सुद्धा आपणच जगलेला असतो ना ? तसेच मागील जन्म सुद्धा आपला जीवात्मा जगलेलाच असतो. नव्हे तर तो जीवात्मा अनंत जीवन जगलेला असतो. प्रत्येक जन्मात त्याच्या कर्मानुसार व ग्रहण केलेल्या त्या चांगल्या वाईट संस्कारानुसार पुढील जन्म घेत असतो. जन्म घेण्याकरता दोन गोष्टीची आवश्यकता असते. एक पूर्व संस्काराचे वहन करणारा जीवात्मा आणि त्या जीवात्म्याचा कर्मभार तोलून धरण्या इतकी संपूर्ण क्षमता असणारा कोणताही मातृ उदरात स्थानापन्न झालेला घट वा पेशीगर्भ होय. संत तुलसीदास म्हणतात, "तुलसी दास आश रघुवर की, थारो जन्म सफल हो जाय, घट घट में बसे है भगवान" घट म्हणजे शरीर आणि त्यात स्थित तो जीवात्मा. या स्वतंत्र शरीर अस्तित्वाला वैदिक परिभाषेत जीवात्मा म्हणतात. तो स्वतंत्र जन्म जीवन जगतांना भगवान म्हणजे त्या परम अवस्थेचे स्मरण नाही ठेवत, मग त्यास मागील जन्मजीवन स्मरणात कसे राहणार? म्हणून तुलसीदास सांगतात की जन्म सफल होण्यासाठी त्या रघुवीर परमावस्था गाठण्यासाठी साधन रुप प्रयत्न करा.

 अशी म्हण प्रचलित आहे की "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे" किंवा "प्रयत्नांती परमेश्वर". मग आपण आपल्या साधनारूपी प्रयत्नांनी आपला गतजन्म बघू शकतो, अनुभवू शकतो. त्यासाठी प्रखर साधने बरोबर ज्ञानी गुरु कृपेची सुद्धा जोड आवश्यक असते. साधना जीवनात गत जन्म बघून काय साध्य होते ? त्यापेक्षा आत्ताचे जीवन असे जगावे की ते ज्ञानी गुरू शोध घेत आपणास भेटतील. याकरिता अत्यंत कठोर साधना व अपार कष्ट झेलून समाजासाठी काही करण्यासाठी धडपड करण्याची प्रवृत्ती असावी लागते. तेव्हा कुठे प्रयत्नांना यश येऊन परमेश्वर प्राप्ती म्हणजे ती परम अवस्था प्राप्त होते. परमावस्था वैदिक परंपरेतील सत्यावस्था होय.

आपल्या शरीर स्थित आध्यत्मिक सात योगचक्रे असतात. मूलाधार, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, तालुमूल, आज्ञाचक्र व सहस्रार चक्र असतात. त्याला धरून सर्व साधना होत असतात. साधना कराव्या लागतात. एक-एक चक्र सिद्ध करत साधक प्रगतीकडे वाटचाल करीत असतो. या सात चक्रातील सहावे आज्ञाचक्र म्हणजे भ्रूमध्यांत ध्यान केंद्रित केल्यावर ते स्फुरीत झाल्यास मागील जन्म कळू शकतो. याच भ्रूमध्यातून प्राणवाहा नाडी वाहत असते. तिच्या द्वारेच जीव गर्भात ओढला जातो म्हणजे जन्म होतो. आणि याच प्राणवाहा नाडी मार्गे जीवात्मा जड शरीर सोडून बाहेर गमन करतो. मृत्यु नंतर जीव याच मार्गाने गमन करतो. पण हे एवढे सोपे नसते. जीवात्म्यावर मागील अनंत जन्मांचे झालेले संस्कार आडवे येतात. त्यामुळे गत जन्म स्मरणात राहत नाही.

संदर्भ : - जन्म मृत्यू रहस्य - योगीराज मनोहर हरकरे

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी