वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - अध्यात्माची आवश्यकता

 प्रश्न क्र. 47 :- आजच्या पिढीला अध्यात्माची आवश्यकता आहे का ?

 असा प्रश्न प्रत्येक पिढीला पडतो. सर्वांनाच अध्यात्माची आवश्यकता आहे ! अध्यात्म हे आज आहे, काल होत आणि उद्या ही राहिल. आजच्या पीढीत अध्यात्मा विषयी अनास्था वाढलेली दिसून येते. या अनास्थेमुळे तसेच स्वैराचारी वृत्तीमुळे किंवा अध्यात्माची आवड नसल्याने अशा वृत्ती असलेला वर्ग असा प्रश्न उपस्थित करतात. त्याहीपुढे जाऊन ते म्हणतात की अध्यात्म वगैरे सारख्या खुळचट कल्पनांत गुंतून आपले जीवन व्यर्थ का घालवावे. त्याचे शिवाय मानवाचे सहज निभू शकते. आज जग वैज्ञानिक दृष्ट्या किती तरी पुढे जात आहे. नवीन नवीन शोध लागून मानवी जीवन अधिकाधिक सुखी होत आहे. मग आम्ही असे सुखी जीवन सोडून साचेबंद अवस्थेत का अडकावे ?

 आधी आपण अध्यात्माविषयी बघू. स्वतःत असलेले दिव्य अस्तित्व ओळखणे म्हणजे (अध्य+आत्म) अध्यात्म होय. स्वतःस जाणणे म्हणजे अध्यात्म. प्रत्येक वस्तुजाताचे अथवा अस्तित्वाचे मुळात जाऊन त्यांचा शोध घेणे बुध्दिमान मानवाचा धर्म असतो. तो ज्या मार्गे जातो तो अध्यात्म मार्ग होय. आजच्या वैज्ञानिकांचे उत्क्रांत जग हे त्यांच्या या गूढ शोधाचेच फल होय. मानवाची ही वृत्ती नसती तर इतके शोध लागून मानवी जीवन समृध्द व समाधानी झाले नसते. एखादे यंत्र वा उपकरण शोधले गेल्यावर त्यापेक्षाही अधिक उपयुक्त व सोईस्कर यंत्र शोधून काढण्याची प्रवृत्ती संशोधकात दिसून येते. त्याचा लाभ समाजातील सर्वजण घेत असतात. या उपकरणांचा उपयोग सुयोग्य तऱ्हेने व पध्दतीने करावा लागतो. रस्त्यावर नियमानेच जावे लागते. अंतराळात प्रवास करणाऱ्या अंतराळ वीरांना तर अधिक शिस्तीने व संयमाने वागावे लागते. विज्ञाना पलिकडील मूळ अवस्था जे अध्यात्म, ते जाणण्याची आवश्यकता यासाठीच आहे. साधारण जीवनाकरता जर शिस्त व संयम आवश्यक आहे, तर चिरंतन सुखदायी अध्यात्माकरता आवश्यक अशी शिस्त व संयम का असू नये ? अर्थात शिस्त व संयम बाळगणे आवश्यक आहे.

आजच्या पिढीला उत्क्रांत आणि सुसंस्कृत जीवनाला आवश्यक असे संयमपूर्ण जीवन आवडत नाही. त्यांचा कल मुक्तपणे जगण्यात असतो. स्वैर जीवनाचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने त्यांच्यासमोर असलेल्या पशु जीवनाचा हवाला देऊन, तसले स्वैर पशुजीवन सुखी असते असे ते मानतात. लग्न संस्था अथवा समाज नियमांच्या बंधनांचा त्यांचा विचार नसतो. तसल्या बंधनामुळे खरे सुख व उपभोग मिळू शकत नाही, अशी त्यांची धारणा असते. नवी पिढी स्वतःचे कष्ट व बुध्दीसामर्थ्यावर आपले उदरभरण करतात. आध्यत्मिक विचारी जीवन म्हणजे दुःखदायक व बंधनकारक आहे असे ते मानतात. म्हणून जिवंत राहण्याकरता तथाकथित सुसंस्कृत आचार-विचार व संयमित राहण्याची आवश्यकता किंवा गरज त्यांना वाटत नाही. गरज ही शोधाची जननी आहे. तसे आत्ममुलारंभ शोधणे व त्यात विलीन होणे ही अध्यात्म वाहिनी होय. सैनिक सरावात शिस्त व संयम पाळतात. तीच सवय त्यांच्या अंगवळणी पडते. संत तुकाराम म्हणतात. *पडिले वळण इंद्रिया सकळा l भाव तो निराळा नाही दुजा ll*

आपण साध्या व्यवहारात पाहतो की, एक बीज स्वतःला जमिनीत गाडून नष्ट होते, त्यापासून वृक्ष निघतो. वृक्षाला अनेक बिया वा धान्य लागते त्यापैकी अधिकांश धान्य खाण्यात जात असले तरी काही धान्य बीज म्हणून स्वतःचे आत्म समर्पण करण्याकरता अलग काढून ठेवावे लागते. म्हणजे समृद्धी व सुख सुरुवातीचे संयमात अथवा शिस्तीत असते. सर्व धान्य जर खाण्यात गेले तर अन्नधान्य उत्पन्न कसे होणार ? सर्वच स्वैराचार व बेशिस्त जीवन जगायला लागले तर समाज चालणार कसा ? असा समाज लवकरच संपुष्टात येईल. ह्या दृष्टीने विचार केल्यास स्वैराचार व बेशिस्तपणा ही समाजाला नष्ट करण्याची प्रवृत्ती होय. नदी आपलं पात्र सोडत नाही. सागर आपली मर्यादा ओलांडत नाही. पृथ्वी आपल्या नियत गतीत राहते. सूर्य प्रकाशच देणार. हे सर्व शिस्तीत आहेत म्हणूनच सुरळीत चालू आहे. तद्वव संत विचार सर्वांठाई वसलेले असावेत.

 संतांनी आपले कार्य केले. त्यांनी सांगितले की निःस्वार्थ प्रेम व परोपकार हाच एक मानव धर्म आहे. अध्यत्मिकते- कडे कल असणाऱ्यांनीच तो मानव धर्म पाळावा असे नाही. इतरांनीही पाळला पाहिजे, तो जर पाळला गेला नाही तर स्वैराचार माजतो, आणि असे निरर्थक प्रश्न उपस्थित करून स्वतःचा जन्म वाया घालवतात. अध्यात्म हे समस्त मानवासाठी आवश्यक आहे. काळाच्यावर जाण्याकरता अध्यात्ममार्ग अथवा योगमार्ग अत्यंत सुयोग्य मार्ग आहे. योगी म्हणजे स्वयंभू संपूर्ण अस्तित्व होय, असल्या परमयोग्यांना पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकताच नसते. मानवी जीवनाचे हे अंतीम आश्रयस्थान आहे. *हे परम निधाना ! आम्हाला चांगल्या कार्या मध्ये स्वारस्य दे ! भद्रं नो अपिवातय मनः ।"

संदर्भ :- सुलभ योगसाधना - योगीराज मनोहर हरकरे

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/


https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी