सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - 1

 

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - 1

परमेश्वरी अंशाच्या आगमनाची देवी लक्षणे आठवे वेळी गर्भवती झाल्यापासून राधाबाईंना अनेक अद्भुत अनुभूती येऊ लागल्या होत्या. या त्यांनी काम करणाऱ्या दाईजवळ अनेकदा सांगितल्या होत्या. राधाबाईंना यंदाच्या गर्भारपणी एक वेगळे समाधान, संतोष आणि शांती मिळाल्याचा प्रत्यय येत होता. त्यांना कधीकधी स्वप्नात दिव्य प्रकाशाचे दर्शन होत असे आणि त्यानंतर तो प्रकाश त्यांच्या गर्भात शिरतो आहे असे दिसे. त्यांचा चेहरा, अंगकांती या आठव्या गर्भारपणी अतिशय तेजस्वी दिसू लागली. त्यांना कधीकधी कुठलीतरी देवता दिसल्याचा भास होत असे, तर कधी सुंदर मंजूळ स्वरांमध्ये कुणी वेद म्हणत आहेत असा भास होत असे. देवाची पूजा करताना देवघरात देवाची सजीव मूर्ती आहे असे वाटे, तर कधी देवता त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत असा भास होई. स्वप्नात अनेक संतमहात्म्यांची दर्शने होत. त्या संतमहात्म्यांची नावेही राधाबाईंना माहीत नव्हती. परंतु त्या महात्म्यांच्या तेजःपुंज दर्शनामुळे ते महान संतमहात्मे असावेत हे राधाबाईंना समजत असे. राधाबाईंच्या लक्षात आले होते की यंदाचा गर्भ हा निश्चितपणे दैवी गर्भ आहे. त्या घरच्या दाईजवळ या सगळ्या गोष्टी बोलत असत.

आठवी वेळ असल्यामुळे डोहाळे, डोहाळजेवण वगैरेचे विशेष कौतुकही नव्हते. परंतु श्रीकृष्णरावांनी राधाबाईंना हवे नको ते पूर्ण बघितले होते. दाईचेही राधाबाईंकडे विशेष लक्ष होते कारण कुणीतरी महात्मा राधाबाईंच्या पोटी जन्माला येणार याची चुणूक दाईला आली होती.

जेव्हा-जेव्हा स्त्रीला तिच्या गर्भारपणी असे दिव्य अनुभव येतात तेव्हा-तेव्हा तिच्या पोटी कुणीतरी थोर संतमहात्मा जन्माला आल्याची अनेक उदाहरणे आहेत. रामकृष्ण परमहंस यांच्या आईलाही ते पोटात असताना अनेक दिव्य अनुभूती आल्याचे त्यांच्या चरित्रात लिहिले आहे. स्वामी विवेकानंदाच्या आईलाही त्यांच्या गर्भारपणी अशाच चमत्कारिक गोष्टींची प्रचिती आली होती. भगवान गोपालकृष्णाच्या चरित्रात तर वेद व्यासांनी स्पष्टच सांगितले आहे की, प्रत्यक्ष विष्णू भगवंतच देवकीच्या पोटी जन्माला येणार होते म्हणून देवकीला

तिच्या त्या गर्भारपणात अनेक देव-देवतांनी दर्शने दिली होती. ही सर्व लक्षणे म्हणजे जगाचा उध्दारक पृथ्वीवर अवतरण्याची लक्षणे होत.राधाबाईंच्या पोटी एक महान ज्ञानी, योगीपुरुष जन्माला येणार याची चाहूल म्हणजे राधाबाईंना येणाऱ्या चमत्कारिक अनुभूती होत्या. आठवा महिना भरला होता. नववा महिना लागला होता. अशातच श्रीकृष्णरावांचे युरोपात जायचे ठरले आणि राधाबाईंना थोडी चिंता लागली. परंतु श्रीकृष्णरावांचे जाणे घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक होते. याच काळात अजून एका आपत्तीला नागपूरवासीयांना तोंड द्यावे लागले. नागपूर त्या वेळेस खूप विस्तारले नव्हते. महाल परिसर, भोसले राजांचा वाडा आणि आजूबाजूचा परिसर एवढाच नागपूरचा विस्तार असावा. त्या वेळी नागपूर हे गावासारखे लहानसे होते. अशा नागपूर गावी अचानक 'प्लेगची साथ आली. उंदीर पटापट मरू लागले. प्लेग संसर्गजन्य रोग असल्याने त्याची साथ सर्वत्र पसरू लागली.

जुन्या काळी कुठल्याही रोगाची साथ गावात आली की सर्व गाववासी गावाच्या बाहेर वनात राहायला जात असत. साथ गेल्यावर पुन्हा आपल्या घरी, गावी परतत असत. श्रीकृष्णराव - राधाबाईंनीही पटापट आवश्यक सामान गाठोड्यात बांधून गावाबाहेर जाण्याची तयारी केली आणि ते आपल्या सात अपत्यांना घेऊन गावाबाहेर अंबाझरी भागात आले. अंबाझरी हे रान होते व जवळच तलाव होता. पक्षी, हरिण, कोल्हे अशा वन्य प्राण्यांचे ते रम्य ठिकाण होते. या अंबाझरीला एका शेतात श्रीकृष्णरावांनी छोटेसे झोपडे तात्पुरते राहाण्यासाठी बांधले...


राधाबाईंच्या पोटी एक महान ज्ञानी, योगीपुरुष जन्माला येणार याची चाहूल म्हणजे राधाबाईंना येणाऱ्या चमत्कारिक अनुभूती होत्या. आठवा महिना भरला होता. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी