सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - संघकार्य 2
अटलबिहारी वाजपेयींना मार्गदर्शन
---------------------------------------------
उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, ओरिसा या भागात मनोहररावांचे बरेच भ्रमण होत असे. बंगालमध्ये राहून मनोहरराव बंगाली भाषा उत्तम शिकले व उत्तम बंगाली बोलू लागले. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच. १९४१ मध्ये लखनौला मनोहरावांनी संघाचे एक विशाल शिबिर आयोजित केले. फार मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक यात सहभागी झाले होते. याच शिविरात दिनदयाळ उपाध्याय या महान संघ कार्यकर्त्याशी मनोहररावांची भेट झाली. याच भेटीतून पुढे मनोहरराव व दिनदयाळ उपाध्याय एकमेकांचे स्नेही बनले.
याच शिबिरामध्ये अटलबिहारी वाजपेयीसुध्दा संघशिक्षा घेण्यास आले होते. मनोहररावांनी अनेक स्वयंसेवकांसोबतच अटलबिहारी बाजपेयींनासुध्दा संघतत्त्वाची, संघवैशिष्ट्यांची व संघप्रचाराची शिकवण दिली. हेच अटलबिहारी वाजपेयी पुढे भारताचे पंतप्रधान झाले. लखनौच्या शिबिरात अटलबिहारी वाजपेयी वयाने अगदीच तरुण व महाविद्यालयीन विद्यार्थी होते.
बिहार व बंगाल या प्रांतात मनोहरराव जास्त काळ राहिले. बंगालमधल्या वास्तव्यात असताना बंगाली जीवन जगले आणि बिहारमधल्या वास्तव्यात बिहारी भाषा, राहणी सर्व आत्मसात करून तिथल्या लोकांचे आवडते झाले. बिहारमधले त्यांचे वास्तव्य साडेतीन वर्षांचे होते. पाटणा येथील एका मठात ते राहात होते. आध्यात्मिक पिंड असल्यामुळे रोज सकाळी उठणे, गंगा नदीत स्नान करणे, पाचशे दंडबैठका काढणे, संध्या करणे अशी त्यांची दिनचर्या होती. मनोहररावांना व्यायामाची अतिशय आवड असल्यामुळे रोज पहाटे से पाचशे दंडबैठका मारत असत. त्यामुळे त्यांचे शरीर अतिशय प्रमाणबध्द व कमनीय झाले होते. त्यांचे पिता अतिशय देखणे असल्यामुळे पित्याचा देखणेपणा जन्मतःच मनोहररावांमध्ये आला होता, सोबतीला व्यायामातून कमावलेली देहयष्टी यामुळे मनोहररावांचे व्यक्तिमत्त्व राजकुमारासारखे वाटत होते असे प्रत्यक्षदर्शी सांगत. पोहण्याची अतिशय आवड असल्यामुळे ते रोज गंगेचे दोन्ही किनारे पार करत असत. पाच मैलाचा गंगेचा हा घाट 'कलेजा घाट' म्हणून प्रसिध्द होता. हा पूर्ण घाट मनोहरराव रोज पार करत असत. या सर्व उपक्रमांनंतर ते जनसंपर्क करून संघप्रचार कार्याला लागत असत.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा