सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र -7
कृष्णविवराचे दर्शन व चंद्र-सूर्याचे दिव्य दर्शन
'बरेचवेळा रात्री बाळला निद्रावस्थेत गंधर्वलोक, पाताळलोक, स्वर्गलोक अशा निरनिराळ्या लोकांत आपण भ्रमंती करत आहोत असे दिसे. वेगवेगळ्या ग्रहांवर गेलो आहे असे दिसे. त्या ग्रहांची वेगवेगळी भूमी दिसे. ब्रह्मांडातील ग्रह, तारे, आकाशगंगा, कृष्णविवरे, काळाकुट्ट अंधार, शुभ्र प्रकाशच प्रकाश अशा अनेक अद्भुत गोष्टी दिसत. कधीकधी या दिव्य अनुभूर्तीमुळे त्याचा जीव घाबरत असे.
वरील सर्व अनुभूतींचा अर्थ बाळला अर्थात, योगी मनोहरांना त्यांच्या योगजीवनाच्या परिपक्व काळात कळला. योगी मनोहरांचा साधक वर्ग बरेचदा त्यांच्या सान्निध्यात बसत असे व योगी मनोहरांनी काही दिव्य अनुभव सांगावे असे सगळ्यांना वाटे. त्या वेळी योगी मनोहर सर्वांना आपल्या बालपणीच्या या अद्भुत अनुभूती सांगत असत. योगी मनोहर त्यांच्या बालपणीच झालेल्या दिव्य चंद्रदर्शनाचे रहस्य असेच एकदा उलगडत असता त्यांनी सांगितले की, योगसाधनेत योग्याला चंद्राचे असेच दर्शन होत असते. दिव्य दर्शन! अर्धा चंद्र मस्तकाच्या आत दिसतो आणि अर्धा चंद्र मस्तकाबाहेर. म्हणूनच भगवान शिवशंकरांच्या मस्तकावर अर्धा चंद्र नेहमी दाखविला असतो आणि त्याला 'चंद्रभाळ' असे म्हणतात. 'भाळी चंद्र असे धरीला...' असेच शिवाचे वर्णन असते. योग्याला व साधकाला योगसाधना करताना चंद्राचे दर्शन असेच होणार. चंद्राचे असे दर्शन म्हणजे योगसाधनेतील प्रगत अवस्था असते. ज्या योग्याला अशा पध्दतीचे चंद्राचे दर्शन मस्तकात होते त्याला 'चंद्र' ही उपाधी देतात, अर्थात, त्याचे नावासमोर 'चंद्र' अशी उपाधी लावतात जसे ईश्वरचंद्र, रामचंद्र, भगवतचंद्र, दिनेशचंद्र इत्यादी. 'चंद्र' उपाधी लावण्याची ही शास्त्रशुध्द अशी वैदिक परंपरा वैदिक काळात चालत होती. 'चंद्र' उपाधी त्या साधकाची वा योग्याची प्रगत योगअवस्था दर्शविणारी उपाधी होती. यातील हे दिव्य रहस्य नंतरच्या काळात साधनेअभावी मानव विसरला आणि 'चंद्र' ही उपाधी केवळ नामकरणापूर्ती मर्यादित झाली. बाळ मनोहरने अतिशय लहान वयातच चंद्राचे असे दिव्य दर्शन घेतले होते आणि या अर्थाने तो 'बाळचंद्र' लहानपणीच झाला होता. या सर्व अनुभूती म्हणजे त्याच्या जन्मीच्या साधनेचे फलित होते.
सूर्यदर्शनाविषयीसुध्दा योगी मनोहरांनी एकदा खुलासा करताना सांगितले होते की, अशा प्रकारचे विशाल सूर्यदर्शन होणे म्हणजे परमेश्वर दर्शनाच्या आधीची अवस्था होय. कोटी कोटी सूर्यांचे तेज असलेल्या सूर्याचे असे दिव्य दर्शन झाले म्हणजे तो साधक परमेश्वर दर्शनाच्या अगदी जवळ आलेला असतो. अनंत जन्मांच्या साधनेचे हे फलित असते. योगी मनोहरांना बालपणीच हे दिव्य सूर्यदर्शन झाले होते.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा