सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - संघात प्रवेश

 

संघात प्रवेश व डॉ. हेडगेवारांशी भेट

----------------------------------------------

बाळला पोहण्याची अतिशय आवड होती. उन्हाळ्याच्या दिवसांत बाळ घरापासून दूर असलेल्या तेलंगखेडी तलावावर रोज सायकलने पोहायला जात असे. असेच एकदा पोहणे आटोपून घरी परत येत असताना बाळला डॉ. हेडगेवार दिसले. डॉ. हेडगेवार संघाचे संस्थापक आणि कट्टर कार्यकर्ते होते. त्यांचेबद्दल बाळच्या मनात अतिशय आदर होता. बाळने त्यांना नम्रपणे अभिवादन केले. डॉ. हेडगेवारांना बाळचा नम्रपणा आणि साधेपणा अतिशय आवडला. डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात १९२५ मध्ये विजयादशमीच्या महर्तावर केली होती. त्यामळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जास्तीत जास्त तरुणांना संमीलित करण्याचे त्यांचे सदैव प्रयत्न असत. बाळचा स्वभाव डॉ. हेडगेवारांना आवडला आणि त्यांनी बाळला त्या पहिल्याच भेटीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विस्तृत माहिती देऊन संघाची उद्दिष्टेही समजावून सांगितली. त्यांनी बाळचे नाव वगैरे सर्व माहिती विचारून बाळला संघात येण्याविषयी सांगितले. डॉ. हेडगेवारांच्या बोलण्याचा बाळच्या मनावर अतिशय प्रभाव पडला. शेकडो वर्षे भारत आणि भारतातील हिंदू समाज परकीयांच्या गुलामगिरीत राहिला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूळ तत्त्वच हिंदुत्वाच्या रक्षणार्थ असल्यामुळे बाळला संघाची तत्त्वे मनापासून पटली आणि बाळने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील होण्याचे ठरविले. अशा रितीने बाळचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश झाला. १९२८चा हा काळ होता. डॉ. हेडगेवारांशी बाळच्या आता वारंवार भेटी होऊ लागल्या होत्या. संघाचे कार्य बाळला मनापासून पटले होते. त्यामुळे बाळने स्वतःला संघाच्या कार्यात पूर्ण झोकून दिले. सोबतच शिक्षणही सुरू ठेवले. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी शिकवण्या व छोटीमोठी कामेही सुरू ठेवली. डॉ. हेडगेवारांनी बाळला आता त्याच्या खऱ्या नावाने, 'मनोहर' या नावाने संबोधणे सुरू केले होते. संघाचा प्रसार करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी प्रमुख अशा दहा जणांना नेमले. त्या दहा जणांमध्ये बाळचा, अर्थात, मनोहराचा सर्वात तरुण कार्यकर्ता म्हणून समावेश होता. बाळला आता सर्व 'मनोहर हरकरे' म्हणून ओळखू लागले होते. इथूनच त्यांचे मनोहर हे नाव प्रचलित झाले. घरची सर्व मंडळी बाळ, बाळासाहेब या नावाने तर बाहेरची मंडळी मनोहर या नावाने संबोधू लागली.

बाळला, अर्थात, मनोहरला आता सर्व संघाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखू लागले. 'मनोहर हरकरे' हे नाव आता संघासोबत पूर्णपणे जोडले गेले होते. मनोहरांचे वय हळूहळू वाढू लागले होते. मनोहरांचे मोठे बंधू बाबूराव हरकरे हे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते. परंतु मनोहरांना संघाची तत्त्वे पटल्यामुळे ते नेहमी संघाचेच कार्यकर्ते राहिले. परंतु दोन्ही भावांमध्ये काँग्रेस आणि संघ या विषयावरून कधीही कुठलाही वाद होत नसे. बाबूराव एकदा मनोहरांना गांधीजींच्या आश्रमात घेऊन गेले. महात्मा गांधींचे त्या वेळी तेथे वास्तव्य होते. महात्मा गांधींचा अनासक्त योग मनोहरांना आवडायचा आणि म्हणून महात्मा गांधींबद्दल मनोहरांच्या मनात सुरुवातीपासूनच आदर होता. बाबूरावांनी आश्रमात गेल्यावर मनोहरांची ओळख गांधीजींशी करून दिली. गांधीजींना मनोहरांचे एकूणच व्यक्तिमत्त्व आवडले आणि त्यांनी मनोहरांना 'अधेमधे येत जा' असे सांगितले. गांधीजी मनोहरांना प्रेमाने 'मन्या' म्हणू लागले गांधीजींना माहीत होते की मनोहर संघाचा कार्यकर्ता आहे. परंतु यामुळे गांधीजींनी आपल्या मायेत कधीच कमतरता आणली नाही. त्यांच्या या वागण्यामुळे ते खरोखरच महात्मा असल्याचा प्रत्यय प्रत्येकाला येत असे.

मनोहर आता १५-१६ वर्षांचे झाले होते. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा चांगले गुण मिळवून उत्तीर्ण केली होती. मॅट्रिकनंतर एमबीबीएस करण्याची व डॉक्टर होण्याची मनोहरांची फार इच्छा होती. परंतु वडिलांचे छत्र हरवलेले, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि अजून दोन लहान बहिणींची लग्नेही व्हायची होती. या सर्व अडचर्णीमुळे मनोहरांना आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. परंतु वैद्यकशास्त्रामधे रुची असल्यामुळे त्यांनी मॅट्रिकनंतर नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयामध्ये (आजचे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज) प्रवेश घेतला. बीएससीसाठी जीवशास्त्र हाच विषय निवडला. सोबतच वनस्पतीशास्त्रही त्यांना शिकता आले. शिक्षण सुरू असतानाच संघाचे कार्यही सुरूच होते. सोबतच शिक्षणाला लागणारी पुस्तके विकत घेण्याचा भार कुटुंबावर पडू नये म्हणून रबर, पेन्सिल, शाई इत्यादी विकून व शिकवण्या करुन ते कुटुंबाला आर्थिक मदत करतच होते. तीन वर्षांतच मनोहरांनी आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. जीवशास्त्र आणि वनस्पतीशास्त्रामध्ये त्यांनी बीएस्सीची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. संघाचे कार्य त्यांनी सुरूच ठेवले. १९३३मध्ये महात्मा गांधींनी जंगल सत्याग्रह चळवळ केली त्यामध्ये मनोहर आपले थोरले बंधू बाबूराव हरकरे यांचेसोबत सहभागी झाले होते.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी