सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - कालपुरुष आणि महाशून्य
----------------------------------------
अनेक दिव्य सिध्दींची प्राप्ती
-----------------------------------------
कालपुरुष आणि महाशून्य अवस्थेचा अनुभव
याच दरम्यान योगी मनोहरांना योगसाधनेतील एका अतिशय उच्च अवस्थेचा अनुभव आला. योगी मनोहर गेल्या जन्मी सातशे वर्षांपूर्वी एक महान योगीपुरुष होते. त्यामुळे त्या जन्माचे योगसाधनेचे संस्कार त्यांचेवर आधीच घडले होते. म्हणूनच या जन्मात काही अतिदिव्य साधना अनुभवांची प्रचिती त्यांना विनासायास येत होती. असाच एक अनुभव म्हणजे त्यांना आलेली 'कालपुरुष' व 'महाशून्य' अवस्थेची प्रचिती. १९६७च्या नंतरचा हा कालावधी होता, योगी मनोहर नेहमीप्रमाणे त्यांचे ध्यानात बसले असता एक काळ्या रंगाची पुरुषाकृती त्यांचेसमोर आली. ती काळी आकृती घट्ट काळ्या रंगाची होती. योगी मनोहरांना ती काळी आकृती स्वतः कडे प्रचंड वेगाने खेचत होती. असे वाटत होते की ती काळी आकृती सर्व विश्व गिळंकृत करणार. योगी मनोहरांना असा अनुभव आला की तेसुध्दा या काळ्या आकृतीद्वारे खेचले गेले. नंतर काय झाले त्यांना कळले नाही. एक महाशून्य अवस्था होती जिथे कुठलेच अस्तित्व नव्हते, काहीही नव्हते. ती परमशून्य अवस्था होती. संपूर्ण ब्रह्मांडाला गिळंकृत करणारी महाशून्य अवस्था! या महाशून्य अवस्थेत ते किती वेळ राहिले त्यांना आठवत नाही. भगवद्गीतेमध्ये या शून्य अवस्थेचे वर्णन आले आहे-
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृध्दे
लोकान्समाहर्तुमिह प्रवृतः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
ये वस्थिताः प्रयत्नीकेषु योधाः।।
आजच्या काळात या महाशून्य अवस्थेला 'ब्लॅक होल' असे म्हणण्यात आले आहे. 'ब्लॅक होल' म्हणजे 'कृष्णविवर' हे कृष्णविवर म्हणजे एक भयानक घनदाट काळी पोकळी असून ही पोकळी विश्वाच्या दूर कुठेतरी अस्तिवात आहे. त्या पोकळीचे तापमान अतिशय जास्त (कल्पनेपलीकडचे) असून त्यातील काळाकुद अंधार अतिशय वेगाने संपूर्ण विश्वाला आपलेकडे निरंतर खेचतो. संपूर्ण ग्रह, तारे, आकाशगंगा इतकेच नव्हे तर प्रकाशालासुध्दा ही पोकळी भक्षण करते आहे. संपूर्ण विश्व कोटी कोटी वर्षांनंतर या कृष्णविवरात ओढले जाऊन नष्ट होणार आहे. हा सिध्दान्त वैज्ञानिक तथा संशोधकांनी आज प्रस्थापित केला आहे व त्याला ते Black Hole Theory म्हणतात. वेद व्यासांनी मात्र पाच-सात हजार वर्षांपूर्वीच हा सिध्दान्त (कृष्णविवर, कालपुरुष महाशून्यावस्था) गीतेत मांडला होता. योगी हा योगसाधना करून वैज्ञानिकापेक्षा किंवा संशोधकापेक्षा कितीतरी आधी कुठलाही विज्ञानाचा सिध्दान्त मांडू शकतो याचे हे साक्षात उदाहरण आहे. वेद व्यास हे महान योगी व विशालबुध्दे होते. त्यांनी त्यांच्या योगसामर्थ्यांद्वारे अनेक वैज्ञानिक सिध्दान्त शास्त्रशुध्द पध्दतीने गीते मध्ये मांडले आहेत. (योगी मनोहरांनी पुढे गीता-व्यास आशय हा अद्वितीय ग्रंथ लिहून व्यासांचे संपूर्ण ज्ञान जगापुढे मांडले. व्यासांचे महान ज्ञान जगापुढे उलगडून सांगणारी व्यक्ती म्हणजे प्रतिव्यासच होय. योगी मनोहर हे व्यासांचेच अवतार होते हे यावरून सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट होते.)
योगी मनोहरांनी ही महाशून्य अवस्था प्रत्यक्ष अनुभवली होती. या महाशून्य अवस्थत काळसुध्दा नाही. ही महाशून्य अवस्था किती काळ राहू शकेल याची कुणालाही कल्पना नाही. याच महाशून्य अवस्थेतून पुढे पुन्हा एक नवीन विश्व निर्माण होत असते. पुन्हा नवीन ग्रह, तारे, आकाशगंगा निर्माण होत असतात. पुढे पुन्हा एक नवीन जीवसृष्टी निर्माण होत असते. सृष्टीचा उत्पत्ती आणि लय हा क्रम निरंतर सुरु आहे असाच सुरू राहिल. यालाच गीतेत म्हटले आहे 'एवं प्रवर्तितं चक्रं'. याच कालपुरुषाचे वर्णन वाल्मिकींनी रामायणातही केले आहे. याचा उलगडा योगी मनोहरांनी पुढे त्यांच्या 'रामायण रहस्य' या ग्रंथात केला. योगी मनोहर म्हणतात रामायणासारख्या महान ग्रंथाला केवळ इतिहासरूपात बांधून मानव समाज एका महान ज्ञानापासून वंचित झाला आहे. रामायणातल्या प्रत्येक कथेत ज्ञानविज्ञान काठोकाठ भरले आहे. सीतेचा शोध घेण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने हनुमान जेव्हा आकाशगमनाने लंकेकडे जाऊ लागले तेव्हा समुद्राच्या पाण्यावर हनुमानाची पडणारी सावली एक छावाग्राही सिंहीका राक्षसी आपल्या हाताने पकडून ओढत होती. तिची शक्ती इतकी भयानक होती की त्या सावली कर्षणाद्वारे हनुमानही त्या राक्षसीकडे ओढले जाऊ लागले. शेवटी हनुमानाला त्या राक्षसीच्या मुखात जावे लागले. हनुमानाने ओळखले की सिंहिका राक्षसी आता आपल्याला गिळणार. हनुमानाने चतुराईने आपले शरीर सूक्ष्म केले आणि त्या राक्षसीच्या मुखात प्रवेश करून तिच्या कानाद्वारे हनुमान पुन्हा बाहेर निघाले. अशा प्रकारे हनुमानाने या छायाग्राही (सावली भक्षण करणाऱ्या) सिंहिका राक्षसीपासून स्वतःची सुटका केली आणि लंकेकडे प्रयाण केले.
रामायणकारांनी छायाग्राही सिंहिका राक्षसीच्या कथेद्वारे कालपुरुष अवस्थेचेच वर्णन केले आहे याचा उलगडा योगी मनोहर त्यांच्या 'रामायण रहस्य' या ग्रंथात करतात. योगी मनोहरांच्या मते रामायण, महाभारत हे ग्रंथ केवळ इतिहास नसून अशाच दिव्य योग अनुभवांचे रूपकात्मक वर्णन होय. महाशून्य अवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे योगी म्हणजे कोटी कोटी साधकांतून एखादे असतात. या महाशून्य अवस्थेचा अनुभव योगी मनोहरांनी प्रत्यक्ष घेतला होता. यावरून त्यांची योग क्षेत्रातील महानता सहजपणे लक्षात येऊ शकते. वरील कालपुरुष व महाशून्य अवस्थेचे प्रत्यक्ष वर्णन योगी मनोहरांनी त्यांच्या अनुभवांवरून कथन केले होते ते तसेच्या तसे येथे वर्णन मांडण्यात आले आहे. अशा अनेक दिव्य अनुभवांचे रहस्य योगी मनोहरांकडून पुढे अनेक साधकांना ऐकायला मिळाले. योगी मनोहरांचा सहवास मला बालपणापासून जास्तीत जास्त मिळाल्यामुळे ही त्यांची साधना रहस्ये त्यांनी साधकांना सांगताना मला वेळोवेळी ऐकायला मिळाली. या चरित्रामध्ये त्यांनी सांगितलेली अशी अनेक दिव्य साधना रहस्ये लिहिण्यात येणार आहेत.
त्यामुळे हे चरित्र योगसाधना करणाऱ्या योगसाधकांसाठी एक गुरूकिल्ली ठरणार असा मला पूर्ण विश्वास वाटतो.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा