सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - अखंड साधना

 ---------------------------

अखंड साधना

----------------------------

योगी मनोहरांनी नागपूरला रामनगर येथे घर बांधल्यानंतर अखंड साधनेत स्वतःला रमवून घेतले. पृथ्वी, आप, तेजस, वायू आणि आकाश अशा पाचही तत्त्वांच्या साधना त्यांच्या सुरू होत्या. या साधना करताना कधी खडतर जीवघेणे, तर कधी सुखद असे आध्यात्मिक अनुभव त्यांना येऊ लागले होते. कुंडलिनी जागृती झाली होतीच. त्यामुळे सगळ्या ज्ञानाची द्वारे त्यांचेसाठी मोकळी झाली होती. याच काळात अनेक देव-देवतांची दर्शनेही त्यांना झाली, असे त्यांचेकडूनच माहीत झाले. ज्ञानेश्वर माउलींचा आशीर्वाद त्यांचेसोबत होताच. याच काळात कुटुंबनिर्वाहासाठी त्यांना बराच प्रयास करावा लागला. कारण नोकरीत त्यांचे मन रमेना. म्हणून कधी त्यांनी दुधाचा व्यवसाय केला तर कधी फटाक्यांचा उद्योग करून बघितला. ट्रॅक्टरचासुध्दा व्यवसाय त्यांनी करून बघितला होताच.च्यवनप्राश करून तेसुध्दा त्यांनी लोकांना कुठलाही नफा न घेता दिले. परंतु या सगळ्या प्रयत्नांनंतरही कुटुंबाला फारशी मदत मिळत नव्हती. घरी दोन-चार भाडेकरी होते. परंतु त्या वेळच्या पाच-पन्नास रुपयांच्या भाड्यावर नेहमीसाठी संसार चालणे शक्य नव्हते. त्यातही काही भाडेकऱ्यांनी भाडे बुडवले होते. घरी पाच अपत्ये होती. दोन मुले, तीन मुली. लता, मुक्ता, ,त्र्यंबक, वनिता, दत्तात्रय अशी आम्ही पाच भावंडे होतो. आमची शिक्षणे, मुलींची पुढे लग्ने अशा बऱ्याच चिंता योगी मनोहरांपुढे होत्या.


शालीनीताईंची पदोपदी साथ

अशा अवस्थेत आमची आई शालिनीताईंनी योगी मनोहरांना सावलीसारखी साथ दिली. स्वतःसाठी कधीच काही शालिनीताईंनी मागितले नाही. हातात येणाऱ्या तुटपुंज्या रकमेतूनच त्या संसार चालवीत असत. येणाऱ्या जाणाऱ्याचे सर्व मनापासून त्या करत असत. रामनगरच्या या वास्तव्यात अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या भेटी आमच्या घराला लाभल्या. योगी मनोहरांचे संगीत क्षेत्रातील अनेक ओळखीचे गायक येऊन त्यांचे जलसे होत असत. संघाची उत्तर भारतातील बरीच मंडळी योगी मनोहरांना वरचेवर येऊन भेटत असत. अनेक संत, साधू, महात्मे, बाबा या घरी योगी मनोहरांना येऊन भेटत असत. शालिनीताईंच्या प्रेमळ वागणुकीमुळे सगळ्यांना आमचे रामनगरचे घर आपले वाटू लागले होते.

ज्योतिष्याचे ज्योतिष कथन

या रामनगरच्या घरी एकदा एक ज्योतिषी झाशीवरून आले होते. त्यांनी योगी मनोहरांना पाहिल्याबरोबरच सांगितले की योगी मनोहरांचे संपूर्ण आयुष्य अतिशय खडतर होते. जन्मभर नैराश्य आणि जवळच्याच लोकांचा विरोध या गोष्टी योगी मनोहरांना जन्मभर पुरणार होत्या. पुढे त्या ज्योतिषाचे हे कथन अक्षर अक्षर खरे ठरले. योगी मनोहरांना त्यांच्या पुढील आध्यात्मिक जीवनात नैराश्य, अपमान, फसवेगिरी, आपल्याच लोकांकडून दगा इत्यादी गोष्टींचा अनुभव जन्मभर आला. परंतु योगी मनोहर मनाने अतिशय पक्के होते. त्यांना माहीत होते की अध्यात्माचा मार्ग काटेरी मार्ग आहे. यात त्रास हा होणारच होता. सगळ्या खऱ्या संतांना हा त्रास सहन करावा लागला आहे. योगी मनोहरांनी या सगळ्या त्रासाचा विचार न करता आपले ज्ञानदानाचे आध्यात्मिक कार्य अविरत पुढे चालू ठेवले. *या सगळ्या प्रवासात ज्ञानेश्वर माउलींचा

वरदहस्त सदैव त्यांचेवर होता. माउली त्यांचे गुरू होते.* योगी मनोहरांनी पुढे एकदा त्यांच्या व्याख्यानात सांगितले होते की जेव्हा-जेव्हा त्यांना अडचणीत माउलींची गरज भासली तेव्हा-तेव्हा माउलींनी त्यांना अगदी आईप्रमाणे त्यांचे बोट पकडून कठीण परिस्थितीतून त्यांना मार्ग दाखविला होता.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी