सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - संगीताचा प्रयोग
------------------------------------
वेलींवर संगीताचा प्रयोग
------------------------------------
याच काळात मनोहररावांनी काही अद्भुत प्रयोग करून बघितले. त्यांच्या रामनगरच्या घरी वऱ्हांड्यासमोर द्राक्षाचा वेल होता. त्याचे काळे द्राक्ष होते. मनोहररावांचा नित्य शास्त्रीय संगीताचा रियाज चालत असे. काही दिवस त्यांनी या द्राक्षाच्या वेलीजवळ बसून वसंतबहार रागाचा रियाज केला. त्यांना वनस्पतींवर संगीताचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करायचा होता. आता तर त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच तेजःपुंज आणि अनेक शक्तींनी परिपूर्ण असे झाले होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीत एक अध्यात्मिक शक्ती आली होती. त्यांच्यातील या शक्तीचा परिणाम त्यांच्या या सांगितीक प्रयोगात पूर्णपणे प्रत्ययास आला. काही दिवस द्राक्षाच्या वेलीवर त्यांना वसंतबहार रागाचे संस्कार केल्यानंतर अचानक वेलीवर काळ्या द्राक्षाचे मोठमोठे घोस येऊ लागले. काळे द्राक्ष अतिशय गोड होते. ते इतक्या जास्त प्रमाणात लागले की शेवटी सर्व ओळखीच्या लोकांना ते वाटावे लागले. द्राक्षांची चव अतिशय मधुर होती. हा सर्व प्रभाव मनोहररावांनी वेलीजवळ बसून केलेल्या गायनाचा होता. त्यांचे गायन आता विधायक (creative) झाले होते. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर योग्यास अनेक प्रकारच्या शक्ती आणि सिध्दी प्राप्त होतात. मनोहररावांची ही गानसिध्दी हा त्यातीलच एक प्रकार होता. मनोहररावांचा खरा आध्यात्मिक प्रवास आता सुरू झाला होता. त्यांना अनेक दिव्य अनुभूती येऊ लागल्या. स्वर्गीय अनुभूती, देवता दर्शन, गंधर्व अप्सरांचे दर्शन, ब्रह्म अवस्था, समाधी अवस्था, संगीतातील अनेक अद्भुत अनुभूती त्यांना येऊ लागल्या. मनोहररावांना संगीताची आणि गाण्याची अतिशय आवड होती. त्यामुळे त्यांनी संगीताच्या माध्यमातून आध्यात्मिक अनुभूती घेणे सुरू केले. त्यांची ही एक दिव्य अवस्था होती.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा