सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - कृष्णविवराचा अनुभव

 कृष्णविवराचा प्रत्यक्ष अनुभव

महाशून्य अवस्थेचा अनुभव घेत असतानाच योगी मनोहरांनी कृष्णविवराचासुध्दा प्रत्यक्ष अनुभव एका दिव्य अवस्थेद्वारे घेतला. याच काळात ध्यानात बसले असता त्यांना अनेकदा असा अनुभव येई की ते ब्रह्मांडात अतिशय वेगाने भ्रमण करत आहेत. या नित्य अनुभवातून पुढे एकदा ध्यानात बसले असताना त्यांना असा अनुभव आला की ते प्रचंड वेगाने ब्रह्मांडात पुढे जात आहेत. अनेक ग्रह, तारे, आकाशगंगा पार करून विश्वाच्या दुसऱ्या कोपऱ्यात ते कल्पनातीत वेगाने जात आहेत. पुढे एका प्रचंड काळ्याकुट्ट काळोखाचे विवर त्यांना दिसले. ते त्या घट्ट काळोखात अतिशय वेगाने ओढल्या जात होते. त्या काळोखात सामावल्यानंतर काहीच नव्हते. ते स्वतः काळोखच बनले होते. संपूर्ण विश्वापासून अलिप्त तरीसुध्दा विश्वाच्या कणाकणात सामावल्याचा तो अनुभव होता. हा प्रत्यक्ष कृष्णविवरात जाण्याचा अनुभव होता. ही एक विचित्र अवस्था होती. देश, काल याचे वर असलेली शब्दांपलीकडली अवस्था होती. पुढे यातूनच मग याआधी लिहिल्याप्रमाणे महाशून्य अवस्थेचा अनुभव येत असे. कृष्णविवराचे संशोधन वैज्ञानिकांनी विसाव्या शतकात केले. योगी मनोहर, वेद व्यास, ज्ञानेश्वर माउली, आद्य शंकराचार्य, महर्षी वाल्मिकी यांसारख्या महान योग्यांनी मात्र कृष्णविवराचे महान ज्ञानविज्ञान केव्हाच जाणले होते. योगसाधना करणाऱ्या प्रत्येक योग्याला विश्वाचे हे ज्ञान आणि विज्ञान त्यांचे योगसाधनेद्वारे सोबत सोबतच प्राप्त होत असते. म्हणूनच गीतेत सांगितले आहे- 'ज्ञान विज्ञानं सहितं' अर्थात, ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी सोबत चालणाऱ्या आहेत. योगीजनांना त्या गोष्टी सोबतच मिळतात. त्यासाठी मात्र योगसाधना करणे अतिशय आवश्यक आहे. योगी मनोहरांनी पुढे त्यांच्या आयुष्यात या योगसाधनेवरच भर दिला.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी