सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - राणी सतीजी आणि शालिनीताई
-----------------------------------------------------
राणी सतीजी आणि शालिनीताई एकच असल्याचा दृष्टान्त
-----------------------------------------------------
मनोहररावांच्या पुढील आध्यात्मिक प्रवासात त्यांनी जो एक मोठा साधकपरिवार निर्माण केला त्यातील एका साधकाला एकदा असा दृष्टान्त झाला की शालिनीताई आणि राणी सतीजी या एकच आहेत. या साधकाने हा दृष्टान्त मनोहररावांना (योगी मनोहरांना) सांगितला होता. योगी मनोहरांनी या दृष्टान्ताचा अर्थ रहस्यासहित सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, जगाच्या उध्दारासाठी योगी, संत, महात्मे जेव्हा पृथ्वीतलावर अवतरतात तेव्हा त्यांना साथ देणारी जीवनसंगिनीसुध्दा तितक्याच उच्च आध्यात्मिक अवस्थेची असणे आवश्यक असते. म्हणूनच भगवान विष्णूंनी जेव्हा रामावतार घेतला तेव्हा त्यांना साथ देण्यासाठी सीतेच्या रूपात साक्षात लक्ष्मीच आली होती, कृष्णावतारात कृष्णाला साथ देण्यासाठी पुन्हा स्वर्गातल्या देव-देवताच गोपगोपींच्या रूपाने जन्मल्या होत्या. त्यांच्या सोबतीनेच रामकृष्णांनी जगाचा उध्दार केला होता. त्यामुळे शालिनीताई आणि राणी सतीजी या एकच असल्याचा दृष्टान्त सत्य होता कारण दोघींचे कार्य एकच होते. राणी सतीर्जीप्रमाणेच शालिनीताई अतिशय प्रेमळ, मायाळू, अन्नपूर्णा, सर्वांवर मुलांप्रमाणे प्रेम करणाऱ्या, दयाळू दानी, साध्वी स्वभावाच्या होत्या. मनोहररावांचा पुढील आध्यात्मिक प्रवास बघितल्यास मनोहरराव (योगी मनोहर) वेद व्यासांचेच अवतार होते याचा ठायीठायी प्रत्यय येतो. मनोहररावांच्या रूपाने वेद व्यासांसारख्या विशालबुध्दी असलेल्या योग्याचा अवतार झाल्यावर त्यांना साथ देणारी जीवनसंगिनी जर महान योगिनी राणी सतीजी शालिनीताईंच्या रूपात अवतरली असेल तर तो अगदीच योग्य योग, योग्य समागम आणि नियतीचा महान चमत्कार होता. मनोहरराव हरकरे आणि शालिनीताई हरकरे यांचा योग म्हणजे जिवा-शिवाचा योग होता, प्रकृतीपुरुषाचे मीलन होते, राधाकृष्णाचे जीवन होते, लक्ष्मीनारायणाचा योग होता, रामसीतेचे मीलन होते! रामाप्रमाणे पुढे योगी मनोहरांनीसुध्दा समाजहितासाठी आपले आयुष्य वाहिले आणि शालिनीताईंनी जीवनातील प्रत्येक कठीण खडतर प्रसंगांना शांतपणे निभावले. कदाचित शालिनीताई नसत्या तर योगी मनोहरांचे आध्यात्मिक कार्य झाले नसते. त्यांचे जीवन पूर्ण झाले नसते. योगी मनोहरांच्या महान आध्यात्मिक कार्यातील मूळ शक्ती 'शालिनीताई' होत्या याची प्रांजळ कबूली योगी मनोहरांनी पुढे अनेकदा दिली होती. म्हणूनच मनोहरराव आणि शालिनीताईचा विवाह म्हणजे नियतीचा एक अपूर्व योग होता. इथूनच पुढे एका महान आध्यात्मिक अध्यायाची आणि इतिहासाची रचना होणार होती.
-----------------------------------
आई 'राधाबाईंचा' स्वर्गवास
------------------------------------
मनोहररावांचा विवाह शालिनीताईंशी (पूर्वीच्या छबूताई उपगडे) झाला आणि लग्नानंतर नागपूरमधील महाल परिसरातील हरकरे वाड्यातील वास्तव्यात शालिनीताईंनी सासूची (राधाबाईंची) दिवसरात्र सेवा केली. राधाबाईंची अंघोळ, औषध, खाणेपिणे, अंग, हात- पाय चेपून देणे व इतर सर्व सेवा शालिनीताई सेवाभावी वृत्तीने करू लागल्या. राधाबाईंची सेवा करण्यास हरकरेंच्या इतर सुना तयार नव्हत्या. शालिनीताईंनी मात्र मनोहररावांना दिलेल्या
वचनानुसार राधाबाईंची सेवा पूर्ण मनापासून केली. सोबत हरकरेंच्या घरातील इतक्या मोठ्या परिवाराचा स्वयंपाक करणे इत्यादी कामे त्या कुठलीही तक्रार न करता करत होत्या. शालिनीताईंचे आयुष्य लहानपणापासूनच कष्टात गेले होते. त्या कष्टिक असल्यामुळे हरकरेंच्या घरी अगदी राधाबाईंच्या सेवेपासून इतर सर्व कष्ट करण्यास त्यांना विशेष काही वाटले नाही. राधाबाई शालिनीताईंच्या सेवेवर खूश होत्या.
या काळात मनोहररावांनी महाल येथील हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून नोकरी सुरू ठेवली होती. दिवस जाऊ लागले. शालिनीताईंनी आपल्या वागण्याने हरकरे वाड्यातील सर्वांची मने जिंकून घेतली. मनोहररावांचे लग्न आपल्या डोळ्यासमोर पाहिल्यामुळे राधाबाई समाधानी होत्या. राधाबाईंनी महिनाभर शालिनीताईंकडून भरपूर सेवा करून घेतली आणि महिनाभरातच त्या स्वर्गवासी झाल्या. घरी पुन्हा एकदा शोककळा पसरली. मनोहररावांना व शालिनीताईंना राधाबाईंच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांचे मन आता नागपुरात लागेनासे झाले. हायस्कूलमधील अंतर्गत राजकारणामुळे मनोहररावांना तेथील नोकरीचाही वीट आला होता. शेवटी त्यांनी पत्नीसह नागपूर सोडण्याचा निर्णय घेतला.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा