सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - बिहारमध्ये महान योग्याशी भेट

बिहारमध्ये महान योग्याशी भेट 

विश्वाचा उध्दार करण्यासाठी जेव्हा-जेव्हा या पृथ्वीतलावर संतमहात्मे अवतार धारण करतात, तेव्हा त्यांना त्यांच्या कार्याची, कर्तव्याची आणि योग्यतेची जाणीव करून देण्यासाठी नियतीची व सृष्टीची एक विशिष्ट रचना आधीच बनलेली असते. जसे भगवान गोपालकृष्णाच्या रूपाने भगवान विष्णूंनी पृथ्वीतलावर जेव्हा अवतार घेतला. स्वर्गस्थ देवतांनीसुध्दा पृथ्वीवर गोपगोपिकांच्या रूपात अवतरण केले होते. भगवान गोपालकृष्णांना योग्य वेळी योग्य मदत करणे, पाठिंबा देणे आणि संरक्षण देणे हाच यामागील उद्देश होता. निवृत्तीनाथांनासुध्दा त्र्यंबकेश्वरला गहनीनाथांकडून ज्ञानाची दीक्षा मिळून त्यांच्या भविष्यातील कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली होती. निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेले ज्ञान ज्ञानेश्वरांना देऊन ज्ञानदेवांकडून केवढे मोठे कार्य केले होते. योगी मनोहरांनी पृथ्वीतलावर अवतार घेतल्यावर त्यांनाही वेळोवेळी विश्वोध्दाराच्या त्यांच्या कर्तव्याची व त्यांच्यातील महान आध्यात्मिक योग्यतेची जाणीव करून देणारे असेच काही प्रसंग त्यांचे जीवनात घडत होते. विधात्याने ही रचना बरोबर घडवून आणली होती. म्हणूनच योगी मनोहरांना अगदी लहानपणासूनच दिव्य अनुभूतींसोबत दिव्य महात्म्यांची दर्शन होऊन त्यांचेकडून दिव्य ज्ञानाची प्राप्ती होत असे. हे प्रसंग म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक मार्गाकडे होणारा विधात्याचा एक इशाराच होता. बिहारमध्ये झालेल्या एका महान योग्याच्या भेटीने योगी मनोहरांना रामायण कसे समजावे याचा दिव्य संकेत मिळाला होता.

अध्यात्माची तहान मनोहरांना कायमचीच होती. म्हणून ते जिथे जात तिथे संतमहात्म्यांची भेट घेत असत, पवित्र ठिकाणांची दर्शने घेत असत. मनोहरराव असेच एकदा बिहारमधील आश्रमात राहाणाऱ्या एका महान योगीपुरुषाचे दर्शनाला गेले. हे योगीपुरुष एक खरे योगीपुरुष होते. कदाचित मनोहररावांना पाहिल्याबरोबर त्यांचे लक्षात आले असावे की मनोहररावांच्या हातून पुढे महान आध्यात्मिक कार्य होणार! त्या योगीपुरुषाने मनोहररावांना जवळ बोलाविले आणि त्यांचेकडे आपली पाठ करून मनोहररावांना पाठीच्या कण्यावर, मेरुदंडावर बोटाने दाबण्यास सांगितले. मनोहररावांनी त्या योग्याच्या मेरुदंडावर बोटाने दाबले असता बोट कण्यामध्ये दोन ठिकाणी पूर्ण आतपर्यंत घुसले. मनोहररावांना याचे आश्चर्य वाटले. मानवाच्या पाठीच्या कण्यात अशी बोटे खुपसली जाणे अशक्य होते. मनोहरराव जीवशास्त्राचे पदवीधर असल्याने त्यांना मानवी शरीराचे ज्ञान होते. त्यामुळे त्यांना योग्याच्या पाठीच्या कण्याचे आश्चर्य वाटले. योग्याने त्यांना विचारले,

"बेटा उंगली कितनी जगह अंदर गई?" मनोहररावांनी उत्तर दिले, “दो”. योगी पुन्हा विचारतात, “बेटा याने मेरुदंड के कितने टुकडे हुए? " मनोहररावांनी विचार करून उत्तर दिले, “तीन". एका काडीला दोन ठिकाणी तोडल्यास तिचे तीनच तुकडे होणार. याच हिशोबाने मनोहररावांनी वरील उत्तर दिले. योगीजी यावर बोलतात, "बेटा रामायण में रामने जो शिवधनुष तोडा था, उसके भी तीन तुकडे हुए थे।" वास्तविक पाहाता मनोहररावांच्या आतापर्यंतच्या वाचनात त्यांना एवढे माहीत झाले होते की रामायणातील शिवधनुष्याचे रामाने दोन तुकडे केले होते. परंतु हे योगी पुरुष तीन तुकडे का सांगतात ? योगीपुरुषाचे दर्शन घेऊन याच विचार चिंतनात मनोहरराव घरी पोहचले. योगीपुरुषाच्या या गूढ संदेशाचे उत्तर मनोहररावांना त्यांच्या पुढील आयुष्यात योगसाधनेच्या परिपक्व अवस्थेत आपणहून मिळाले. पुढे त्यांचे लक्षात आले की रामायण समजण्यास मेरुदंडावरील साधनाच आवश्यक आहे. याच साधनेने मनोहररावांनी पुढे रामायणाचा खरा आणि गूढ आध्यात्मिक आशय 'रामायण रहस्य' हा दिव्य ग्रंथ लिहून समाजाला समजावून दिला. परंतु रामायणाला अशा अर्थाने समजण्याचे बिजारोपण योगीजींनी मनोहररावांमध्ये वरील गूढ प्रसंगातून आधीच केले होते.

पुढे मनोहररावांनी लिहिलेला 'रामायण रहस्य-वाल्मिकी आशय' हा ग्रंथ अखिल मानव समाजासाठी ज्ञानपथदर्शक म्हणून सिध्द झाला.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी