सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - साकार दर्शनाचे विश्लेषण

 साकार दर्शनाचे योगी मनोहरांनी केलेले विश्लेषण

योगी मनोहर स्वतः विज्ञानाचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना येणाऱ्या प्रत्येक आध्यात्मिक अनुभूतींचा ते वैज्ञानिकदृष्ट्या विचार करत असत. साकार दर्शनाचे त्यांनी केलेले वैज्ञानिक विश्लेषण अनेक साधकांना मार्गदर्शक ठरेल. योगी मनोहर सांगत की, प्रत्येक आध्यात्मिक अनुभूती ही मूळ निराकारच असते, नंतर मनावर झालेल्या संस्कारांनुसार ती अनुभूती साकार रूपाने प्रचितीस येते. मानवी शरीरात विश्वातील चैतन्य बंदिस्त झाल्यास 'चित्त' निर्मिती होते आणि या चित्तावर मानवी शरीराचे संस्कार झाले की त्याच चित्ताला 'मनाची' अवस्था प्राप्त होते. 'मन' अवस्था निर्माण झाल्यानंतर विचार निर्माण होतात, संस्कार निर्माण होतात. मानवाची उत्पत्ती झाल्यापासून त्याच्या मनावर जे संस्कार झाले असतात ते अनादी काळापासून घट्ट रुजले जातात. हे संस्कार कसे असतात याबद्दल योगी मनोहर नेहमी एक उदाहरण सांगत. एखाद्या भारतीय व्यक्तीला लाडू किंवा लाडूचे स्पष्टीकरण विचारल्यास ती व्यक्ती सांगेल की लाडू गोल आकाराचा असतो, तो गोड असतो वगैरे. परंतु पाश्चात्त्य व्यक्तीला लाडू म्हणजे काय हे विचारल्यावर सांगता येणार नाही. कारण त्या व्यक्तीला लाडू माहीत नसतो, त्याचा आकार माहीत नसतो, चब माहीत नसते. त्यामुळे लाडू म्हटल्यावर त्या पाश्चात्त्य व्यक्तीच्या नजरेसमोर कुठल्याच आकाराची कुठलीच वस्तू येणार नाही. भारतीय व्यक्तीच्या मनावर मात्र अनेक वर्षांचे संस्कार झाले आहेत की लाडू आकाराने गोल असतो. त्यामुळे लाडू म्हटल्यावर भारतीय व्यक्तीच्या डोळ्यासमोर गोल आकाराचा लाडू तरळू लागेल.

साकार निराकार दर्शनाचेही असेच आहे. निळ्या आकाशतत्त्वाचे मानवी मनावर अनादी काळापासून जे संस्कार झाले आहेत ते निळ्या मानवी आकाराच्या कृष्णाचे, रामाचे व विष्णूचे. कृष्ण म्हणजे मेघश्याम निळा, पितांबर नेसलेला, त्रिभुवन सुंदर, हातात बेणू वगैरे असे सुंदर वर्णनाचे संस्कार आपले मनावर हजारो वर्षांपासून झाले असतात. त्यामुळे आपण आकाशतत्त्वाची साधना करता-करता समजा आकाशतत्त्वाच्या निळाईचे दर्शन जर आपल्याला झाले तर ते साकार रूपात कृष्णाच्या रूपात होऊ शकेल. अग्नितत्त्व म्हटले तर गणेशाच्या आकारात अनुभवास येईल. संस्कार तेजस (अग्नी) तत्त्वासाठी झाले असतात. वायुतत्त्व म्हटल्यास धूम्र हनुमानाचे साकार दर्शन होईल आणि आपतत्त्व (जलतत्त्व) म्हटल्यास शुभ्र महादेवाच्या रुपात आकाशतत्त्वाची शुभ्रता साकारू शकेल. कारण त्या-त्या देवतेचे संस्कार आपले मनावर झालेले आहेत. अनादी काळापासून या देवतांच्या रूपाचे संस्कार आपले मनावर झाले नसते तर मात्र तत्त्व दर्शनाचे वेळी आपतत्त्वाची केवळ शुभ्रता ब्रह्मांडात भरलेली दिसली असती, तेजसाचा अग्नी वर्ण फक्त दिसला असता, वायूचा धूम्र वर्ण ब्रह्मांडात व्यापणारा दिसला असता, तर आकाशतत्त्वाची निळाई संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेली दिसली असती. परंतु या सर्व अनुभूती सजीवपणे आल्या असत्या. म्हणजे त्या अनुभूतींना रंग, स्पर्श, चव आणि गंध हे चारही गुण असते. यालाच निराकार दर्शन असे म्हणतात. निराकार दर्शन ही अतिशय उच्च अनुभूती असल्यामुळे ती फक्त उच्च कोटीच्या योग्यांनाच येऊ शकते. योगी मनोहरांना निराकार व साकार असे दोन्ही प्रकारचे अनुभव आले होते. ते उत्तम चित्रकार असल्यामुळे त्यांना आपतत्त्वाचे दर्शन महादेवाच्या रूपात कसे झाले आणि तेजतत्त्वाचे दर्शन गणेशाच्या रूपात कसे झाले याची त्यांनी रंगीत चित्रे काढली होती. या आधी ती दाखविली आहेत. त्यांनी काढलेली ही चित्रे अतिशय दुर्मीळ होत. त्यांनीच काढलेले ज्ञानेश्वर माउलींचे चित्र (त्यांना दर्शन झाल्याप्रमाणे) तेसुध्दा सोबत दाखविले आहे. योगी मनोहरांनी काढलेल्या या चित्रांचा साधनेसाठी प्रत्येक योगसाधकाला उपयोग होऊ शकेल. या चित्रांवर ध्यान केल्यास तत्त्व दर्शन त्या-त्या रूपात होण्यास मदत होऊ शकेल. योगी मनोहरांचे साकार निराकाराचे विश्लेषण संपूर्ण आध्यात्मिक जगतातील एकमेव वैज्ञानिक विश्लेषण आहे.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी