सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - शालिनीताईंची समाजसेवा

-----------------------------------------------------------

पवनी वास्तव्यात शालिनीताईंची समाजसेवा

-----------------------------------------------------------

शालिनीताई हरकरे या थोर समाजसेविका होत्या. त्या पांडुरंग भक्त होत्या. त्या भक्तीतूनच त्यांच्यात एक दिव्य शक्ती उतरली होती. त्या जे काही बोलत ते अक्षरन्अक्षर खरे होई. अनेकांना याचा अनुभव आला होता. त्यामुळे शालिनीताईंबद्दल सगळ्यांनाच प्रेम, आपलेपणा, श्रध्दा आणि मातृभाव वाटत असे. शालिनीताईंनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्यातील दिव्य शक्तीचा उपयोग लोकांच्या भल्यासाठीच केला. शालिनीताईंच्या आशीर्वादाने अनेकांचे भले झाले. अनेक वर्षे अपत्य न झालेल्यांना अपत्ये झाली, अनेकांचे विवाह जमले, अनेकांना धनसंपत्ती मिळाली अनेकांची मांडणे मिटली, अनेकांच्या जीवनात आनंद आला. म्हणून शालिनीताईंना सर्व जण आईप्रमाणे मानत असत व सर्व त्यांना प्रेमाने 'काकू' म्हणत असत.

समाजसेवेचे बाळकडू शालिनीताईंना लहानपणीच मिळाले होते. लहानपणीच त्यांनी स्त्रियांच्या समितीत जाऊन लाठी शिक्षण, स्वसंरक्षण कसे करावे याचे शिक्षण, समाजसेवेचे घड़े अशा अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. सोबतच विणकाम, शिवणकाम, स्वयंपाक, लोकशिक्षण या गोष्टींतही रुची होतीच. म्हणूनच पुढे योगी मनोहरांसोबत त्यांची धर्मपत्नी म्हणून जीवनयापन करताना त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला आईची माया त्यांच्याकडून आपणहूनच मिळाली.

पवनीच्या वास्तव्यात शालिनीताईंनी लहान मुलांसाठी स्वखर्चाने बालकमंदिर चालविले. सर्व गरीब मुलांना त्या निःशुल्क शिकवत असत. शिवाय गावातील अनेक बायकांचे अडले नडले त्या स्वतः जातीने पाहात असत. त्यांनी पवनी गावातील बायकांनाही शिक्षणाचे महत्त्व पटवून त्यांना शिक्षण देणे सुरू केले होते. तीन मुलांना सांभाळून घरची सर्व कामे आटोपून, वैनगंगेवरून पाणी भरून बाकी वेळात त्यांची वरीलप्रमाणे समाजसेवा सुरू असे.

योगी मनोहरांच्या पुढील जीवनातील त्यांच्या विश्वोध्दारक आध्यात्मिक कार्यात त्यांना शालिनीताईंच्या या समाजसेवी वृत्तीची पदोपदी साथ मिळाली. म्हणून योगी मनोहर सर्व साधकांना नेहमी शालिनीताईंचे मोठेपण सांगत असत. ते नेहमी म्हणत 'काकू' (शालिनीताई) नसत्या तर माझे आध्यात्मिक कार्य करणे मला अशक्य झाले असते. ते शालिनीताईंना नेहमी आदराने 'अहोजाहो' म्हणत असत. त्यांनी शालिनीताईंसाठी कधी 'अगं, तुगं' असा एकेरी शब्द वापरला नाही. शालिनीताई खरोखरच एक महान विभूती होत्या. शालिनीताईंना 'अहोजाहो' म्हणणे यातून मनोहररावांनी संपूर्ण स्त्रीजातीला आदरसन्मान कसा द्यावा याचे उदाहरण सर्वांपुढे ठेवले होते.


-डाॅ. दत्ताजी हरकरे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी