सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - कुंडलिनी जागृती
----------------------------------------------
कुंडलिनी जागृतीचा दिव्य अनुभव
----------------------------------------------
आमची आई शालिनीताई सावलीसारखी मनोहररावांच्या संपूर्ण जीवनात, सुख- दुःखाच्या काळात सोबत राहिली. शालिनीताईंनी मनोहररावांची जी ही आठवण सांगितली त्यावरून मनोहररावांचा हा कालावधी कुंडलिनी जागृतीचा असावा असा अंदाज येतो. शालिनीताईंनी सांगितले की मनोहररावांची साधना जोरात सुरू होती. तासन-तास ध्यानसाधना, सिध्दासनसाधना, त्राटकसाधना व असे अनेक योगांचे प्रकार मनोहरराव करू लागले होते.
अशातच एक दिवस अचानक त्यांना शरीराचा दाह होऊ लागला. जीव घाबरू लागला. सारखे मळमळून उलटीसारखे वाटू लागले. हळूहळू हा सर्व त्रास वाढतच गेला. वैद्यांना दाखविले, डॉक्टरांना दाखविले. त्यांना या सगळ्याचे कारण समजेना. कारण वरवर मनोहररावांची तब्येत ठीक वाटत होती. कशामुळे हा त्रास आहे हे समजत नव्हते. त्रास वाढतच होता. शेवटी हा त्रास इतका वाढला की सहन करणे कठीण झाले. शरीराचा अतिशय दाह होऊ लागला. त्यांना अन्न, पाणी, खाणे, पिणे काही चांगले वाटेनासे झाले. शालिनीताईंना काळजी वाटू लागली. मनोहररावांचा जीव इतका घाबरु लागला की जीव जातो की काय असे त्यांना वाटू लागले. शालिनीताईंनी पूजा, व्रतवैकल्ये सुरू केली. शेवटी एक दिवस थोड़ा त्रास कमी झाल्यासारखा वाटू लागला. हळूहळू त्रास कमी होत गेला आणि एक दिवस प्रकृती शांत झाली. आमची आई शालिनीताई सांगत असे की आमच्या बाबांची ही साक्षात अग्निपरीक्षाच होती. आईने या काळात बाबांना प्रत्येक क्षणी सांभाळले होते. हो, ही बाबांची अग्निपरीक्षाच होती! कुंडलिनी जागृतीची अग्निपरीक्षा!
नंतर काही दिवसांनी बाबांना कळले की हा सर्व अनुभव म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या जागृतीचा दाहक, जटिल अनुभव होता. नंतर सर्व शांत झाले. आई (शालिनीताई) सांगते की आमचे बाबा पहिलेपेक्षा जास्त सुंदर दिसू लागले. त्यांची कांती तेजःपुंज दिसू लागली. चेहरा प्रसन्न व तेजस्वी दिसू लागला. ते उत्तम गायक असल्याने त्यांचे गाणेही आता स्वर्गीय वाटू लागले. त्यांचे बोलणे लडिवाळ, लाघवी वाटू लागले. बराच वेळ ते एका दिव्य तंद्रावस्थेत असल्यासारखे वाटू लागले. त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच सुंदर, लोभस आणि दिव्य वाटू लागले. ते गाण्यामध्ये नवनवीन प्रयोग करू लागले. गाता-गाता भावसमाधीत जाऊ लागले. घरच्या वृक्षवेलींना गाणे ऐकवू लागले. त्यांच्या गाण्यातून विधायक परिणाम दिसू लागले. त्यांना अनेक प्रकारच्या सिध्दी प्राप्त झाल्या. त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच एक तेजःपुंज व्यक्तिमत्त्व, योग्याचे व्यक्तिमत्त्व वाटू लागले.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा