सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - महालक्ष्मीचा दृष्टान्त

 

------------------------------

महालक्ष्मीचा दृष्टान्त

------------------------------

शालिनीताई सर्व सणवार श्रध्देने करत. त्या वेळेस आजचेप्रमाणे कुकिंग गॅसची सोय नव्हती की वीजेची शेगडीही नव्हती. साधी लोखंडी शेगडी असे व त्यात लाकडी कोळसा जाळून त्यावर स्वयंपाक केला जात असे. शालिनीताई संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक, शिवाय आल्यागेल्याचे खाणेपिणे सर्व या शेगडीवर करत असत. सर्व सणावारांचा स्वयंपाक याच शेगडीवर होत असे. शालिनीताई सुगरण होत्या. त्यांच्या हातच्या स्वयंपाकाची गोडी अवीट होती. आवळी भोजनाला त्या आम्हा मुलांना आवळीच्या झाडाखाली स्वयंपाक करून जेवू घालत असत. त्या पूर्ण सणवार श्रध्देने आणि नियमितपणे करत असत.

आमच्या हरकरे घराण्याचा महालक्ष्मीचा सण, आमचे मोठे काकांकडे होत असे. असाच एके वर्षी महालक्ष्मीचा सण आला असता बाबांना (मनोहररावांना) महालक्ष्मीचा दृष्टान्त झाला. महालक्ष्मी बसते तो दिवस होता. आम्हा सगळ्यांना पूजेला काकांकडे जायचे होते. परंतु सकाळ आटोपली तरी काकांकडचा काहीच निरोप आला नाही. आईबाबांना काळजी लागली. बाबा चिंताग्रस्त मनस्थितीत असता त्यांना प्रत्यक्षपणे महालक्ष्मीचे दर्शन झाले. ते दिव्य अद्भुत दर्शन होते. त्यांना दिसले की साक्षात महालक्ष्मी देवता लखलख करत समोरच्या दाराने आमच्या घरात आली आणि लखलख प्रकाशात मागच्या दाराने निघून गेली. बाबा काही क्षण त्याच अवस्थेत स्तब्ध होते. थोड्या वेळाने देहभान आल्यावर घडलेला महालक्ष्मी दृष्टान्ताचा प्रकार आमच्या आईला सांगितला. आईलाही ते आश्चर्यकारक 'वाटले. थोड्याच वेळात आमच्या काकांकडून निरोप आला की त्या दिवशी काही कारणाने त्यांचेकडे महालक्ष्म्या मांडल्याही नाहीत आणि पूजाही झाली नाही. बाबांना झालेल्या दृष्टान्ताचा संबंध या घटनेशी आहे हे आमच्या आईबाबांनी तत्काळ ओळखले. आईला सुचेना की आता काय करावे. आमची आजी (आईची आई) आमच्या बंगल्यात राहात असे. तिला आईने ताबडतोब झालेला प्रकार सांगितला. आजीने आईला सांगितले, “झाले ते झाले. आता तू ताबडतोब विड्याच्या पानावर अष्टगंधाने महालक्ष्मीच्या प्रतिमा ज्येष्ठा- कनिष्ठा काढ आणि त्यांची रितसर पूजा करून प्रसाद दाखव." आईने ताबडतोब आजीने सांगितल्याप्रमाणे विड्याच्या पानावर चंदन व अष्टगंधाने ज्येष्ठा-कनिष्ठांची प्रतिमा काढून त्यांची पूजा केली आणि स्वयंपाक करून नैवेद्य महालक्ष्मीला दाखविला. या प्रकारानंतर त्या वर्षीपासून आमचेकडे महालक्ष्मीची पूजा त्याच प्रतिमापूजनाच्या रूपाने दर वर्षी होत राहिली. आमचे बाबांना (मनोहरराव) झालेला महालक्ष्मीचा दृष्टान्त आणि त्याला पोषक असा आमच्या आईचा (शालिनीताई) भाविक स्वभाव या सुंदर संयोगाने महालक्ष्मीचे दरवर्षी पूजन करण्याचे आम्हाला भाग्य मिळाले. धन्य आमचे आईबाबा, शालिनीताई आणि मनोहरराव ! त्यांच्या आठवणीने आजही जीव व्याकूळ होतो.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी