सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - संगीत ते समाधी
-----------------------------------------------------------
'संगीत ते समाधी' या पहिल्या ग्रंथाची निर्मिती
-----------------------------------------------------------
आमचे घर मोठे होते. आता तर त्यावर दुसरा मजलाही बांधला होता. इथे एक मोठा हॉल बाबांनी बांधला आणि इथे नंतर त्यांचे गायक मित्रांसह अनेक गाण्याच्या मैफिली होऊ लागल्या. याच काळात मनोहररावांनी आध्यात्मिक अनुभव आणि संगीताची सांगड घालून संगीतावरील एका अद्भुत ग्रंथाचे लेखन केले. या ग्रंथाचे नाव 'संगीत ते समाधी' असे ठेवले. 'संगीत ते समाधी' हा त्यांनी लिहिलेला सगळ्यात पहिला ग्रंथ होता. पुढे अनेक वर्षांनंतर या ग्रंथाला पुस्तकरूपात छापण्यात आले. (योगी मनोहरांनी प्रत्यक्ष सांगितल्याप्रमाणे त्यांनी लिहिलेला त्यांच्या जीवनातील पहिला ग्रंथ म्हणजे 'संगीत ते समाधी' हाच होता.)
संगीत ते समाधी हा ग्रंथ लिहिण्याआधी मनोहररावांनी अनेक वर्षे संगीताची साधना केली होती. स्वरोदय शास्त्र ते स्वतः शिकले होते. स्वरोदय शास्त्र म्हणजे इडा, पिंगळा, सुषुम्ना या योगनाड्यांचा अभ्यास. जो साधक या योगनाड्यांवर संयम साधतो त्याला सर्व विद्या आपणहून प्राप्त होतात. शरीरात अमोघ शक्ती निर्माण होतात. प्राप्त होणाऱ्या अनेक विद्यापैकी एक महान विद्या म्हणजे ज्योतिषविद्या, स्वरोदय शास्त्र अवगत झाल्यानंतर मनोहररावांना ज्योतिषविद्या आपणहून अवगत झाली होती. परंतु ते कधी या विद्येच्या आहारी गेले नाहीत. योगी अथवा साधक स्वतःच्या चांगल्या आचरणाने स्वतःचे भविष्य स्वतः घडवत असतो हा त्यांचा सिध्दान्त होता. याच सिध्दान्तानुसार ते आपले पुढील संपूर्ण जीवन जगले. त्यांनी कधी स्वतःचेही भविष्य बघितले नाही आणि ज्योतिषीपणाचा आवसुध्दा कधी आणला नाही. मात्र त्यांचेकडे येणाऱ्या अनेक लोकांमध्ये एखादा कोणी भविष्य सांगण्याविषयी त्यांना गयावया करू लागला की ते त्याचा हात बघण्याचा उसना आव आणत आणि नंतर त्याचे चेहऱ्याकडे बघून जे काही बोलत ते अक्षर न् अक्षर खरे निघत असे. या अर्थाने ते द्रष्टा होते. संपूर्ण भविष्य पाहाणारा, जाणून घेणारा तो द्रष्टा असतो. परंतु असा द्रष्टा होण्यासाठी अनेक वर्षांची तपस्या हवी असते. मनोहररावांनी ज्योतिषशास्त्राची अशी वेगळी साधना केली नव्हती. संगीतसाधना आणि स्वरोदयसाधना करता-करता त्यांना आपणहून ज्योतिषविद्या प्राप्त झाली होती.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा