वैदिक सणांचे योग रहस्य-भाग ११
वैदिक सणांचे योग रहस्य-भाग ११
कार्तिक वद्य ६ ला गुरूवारी पुण्यनक्षत्र येत असल्याने गुरू पुष्यामृतयोग येतो. असला योग वर्षातून थोड्याच वेळा येतो. या दुर्मिळ योगाला अमृतयोग म्हणतात. अष्टमीला काळभैरव जयंती येते. कृष्ण आणि काळ यांना अष्टमीच आवडते असे दिसते. हा काळ मात्र साधा नाही, तो आपली भेरी वाजवून साधकाला जागृत करतो. जागृत करताना जो राग आळवितो तो भैरव राग, भैरवाचा अर्थ आहे भेरी वाजवून जागे करणे. अष्टमीला काळभैरव कालयवनाची राख करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला उठवतो आणि भैरवी रागातील पद आळवितो, 'जागो मोहन प्यारे, सांवरी सुरत मोरे मन भावे सुंदर लाल हमारें, जागो मोहन प्यारे' !
संत ज्ञानेश्वर पुण्यतिथी
त्रयोदशीला प्रदोष येतो आणि त्याच दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी आपला देह आळंदीला समाधीत ठेवला. ते तिथे कल्पसमाधी लावून कल्पांतापर्यंत बसले आहेत ! सध्याच्या काळात हिंदू समाजात अशी कल्पना रूढ झालेली दिसते की सूर्य भौगोलिक दक्षिणायनात असल्यावर शरीर त्याग करू नये कारण दक्षिणायनात मरण आल्यास साधक नरकात जातो. भावुक लोकांच्या या कल्पनेकरिता गीतेतील आठव्या अध्यायातील २४ ते २६ पर्यंतच्या श्लोकांचा दाखला देण्यात येतो. सूर्य-पृथ्विच्या कलत्या स्वांगपरिभ्रमणामुळे उत्पन्न झाल्यासारखा वाटणारा भ्रामक दक्षिणायन अथवा उत्तरायण मार्ग असा त्या श्लोकांचा अर्थ नसून साधकाच्या दक्षिण म्हणजे साधना कालातील पूर्व म्हणजेच अपरिपक्व काल मार्ग व उत्तर म्हणजे साधक जीवनकालातील नंतरचा परिपक्व कालावधी हा त्या श्लोकांचा अर्थ होय.भीष्म म्हणजे साधकाची निर्धार वृत्ती, आपल्या कु म्हणजे कौरवी वृत्तीचा त्याग करून, साधकाचे साधना कालात दक्षिणायन संपल्यावर आणि साधकाच्या साधना कालातील परिपक्व असा उत्तरायण सुरू झाल्यावर, आपला वृत्तिरूप देहत्याग करते. भीष्मांनी उत्तरायणाची वाट पाहून देहत्याग करण्याच्या कथेतील योगरहस्य असे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, बाह्यतः विचार केल्यास, देहत्याग भर दक्षिणायनात समाधिस्थ केले. ज्ञानेश्वर महाराज तर मागील जन्मातच मुक्त झाले होते. मग ते केवळ कथित दक्षिणायनात देहत्याग करतात म्हणून नरकाला गेले असे मानायचे काय ? हरिपाठाचे अभंगात माऊली म्हणतात, मागिलिया जन्मी मुक्त झालो । तेव्हा उत्तरायण व दक्षिणायनाचा खरा आशय ज्ञानेश्वर माऊली त्यांचे स्वतःचेच समाधी घेण्याचे उदाहरणावरून स्पष्ट करतात, ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ या व इतर अभंगात तर माऊलींनी प्रत्यक्ष कुंडलिनी जागृती व पांडुरंग दर्शनाचा अनुभव लिहिला आहे.तो आम्ही ध्यानात घेणे आवश्यक आहे. “चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का” ही सर्व भाषा एखाद्या स्त्रीलाच शोभेशी आहे. यातील रहस्य सांगणे आवश्यक आहे. साधनेत परमेश्वराशी भक्त ज्यावेळी एकरूप पावतो त्यावेळी भाषा एखाद्या स्त्रीला साजेशीच राहते. त्याला स्त्री आवेश त्या अवस्थेत येतोच. मग तो साधक भक्तिमार्गातील असो कि योगमार्गातील असो, त्या परम एकरूप अवस्थेत साधक स्वत:ला परमेश्वराला अर्पण करतो. साधकाच्या अंगी परम प्रामाणिकपणा बाणल्यावर साधकाला त्या परम प्रामाणिक अवस्थेतील प्राणी योनी म्हणजे कुत्रा दिसतो, तद्वत् परमेश्वराला सर्वस्व अर्पण केल्यानंतर त्या परम समर्पण अवस्थेला धरून सृष्टीत जी स्त्री अवस्था आहे, ती साधकाचे अंगी त्या कालापर्यंत आपणहून बाणते. स्त्रीया आपल्या प्रिय पतीला सर्वस्व अर्पण करतात. साधकाची भाषा, पोषाख, वागण्याचा व्यवहार एखाद्या स्त्री सारखाच असतो. म्हणून माऊली म्हणतात ‘क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसावला जीव राहो.’ जे जे श्रेष्ठ साधक या परम समर्पण अवस्थेत असतात त्यांचे वागणे व भाषा स्त्रीला साजेशीच असते असा सर्वांचा त्या अवस्थेतील अनुभव आहे. संत कबीर, रामकृष्ण परमहंस, वर्ध्याचे गुलाबराव महाराज, ग्वाल्हेरकडील महिपतिनाथ आदी महापुरुषांच्या बाबतीत असाच अनुभव आहे. परमेश्वर दर्शनाचे अनुभव ज्ञानेश्वर माऊलींनी यथा योग्य पद्धतीने केले आहे आणि शब्दापलीकडील अनुभव शब्दात ग्रंथित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. माऊली मूळचे निराकार पिंडी असल्याने त्यांच्या साकार दर्शन निराकारात लोप पावते आणि परत निराकार साकाराला आलिंगन देऊ पाहते. साकार, निराकार दोहोंचा सुंदर समन्वय माऊलींनी साधला म्हणून त्यांचे जीवन सर्वगुण संपन्न व असाधारण आहे. स्त्री रुपाचे हे महत्व वैदिक परंपरेनेच जाणले म्हणून वैदिक परंपरेने स्त्रीला मातेचे, मातृभाषेचे आणि देशालाही मातेचेच स्थान दिले. कारण माता परमेश्वरच आहे. या युगात माऊलींचे तेच स्थान आहे.
मल्हारी मार्तंड
आता मार्गशीर्ष मास लागला. भगवंताचे मार्गशीर्षावर प्रेम फार, भगवंत ‘विभूतियोग' या दहाव्या अध्यायातील पस्तीसाव्या श्लोकात म्हणतात, 'मासानां मार्ग-शीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकरः॥ श्लोक ३५ अ.१०॥ सर्व नक्षत्रांतील शीर्ष म्हणजे श्रेष्ठ नक्षत्र असे मार्गशीर्ष नक्षत्र या मासाच्या पौर्णिमेला असते म्हणून या मासाला मार्गशीर्ष म्हणतात. मार्गशीर्ष का? तर वर्षभरातील सर्व साधना मार्गातील शीर्ष अवस्था दाखविणारा हा मास आहे. प्रतिपदेला मल्हारी मार्तंडाच्या षडरात्रीची सुरुवात होते, मार्तंड म्हणजे सूर्य, आणि मल्हारी म्हणजे मल–हारी, मल हरण करणारा ! अशा मल्हारी मार्तंडाच्या षडरात्रीची सुरूवात आज असते. इतर देवतांना नवरात्री असते पण या मल्हारीमार्तंडाकरिता षडरात्रीच का ? षड्विकारांवर विजय मिळवून म्हणजे षड्विकारांचा मळ नष्ट करून षड्गुणी असा हा षडानन आज स्थानापन्न होत असतो. महाराष्ट्रातील अनेक कुटुबांच्या घरी मल्हारी आपले ज्ञान खड्ग उचलून स्वर्गात जातात, अज्ञानाचा मल हरण करून ज्ञान सूर्य उगविणारा मल्हारी मार्तंड !
नागदीपावली
पंचमीला नागदिपावली येते. कुंडलिनी जागृत झाल्यावर साधकाला नागसर्पाची जी जिवंत अनुभूती येते त्याचे स्मरण म्हणजे नागदीपावली होय. ही नेहमी पंचमीलाच येते कारण तिच्यामुळे पंचतत्वाचे दीप उजळले जातात.जनतेला साधनानुभव घटनेचे स्मरण असावे म्हणून पंचतत्वाच्या पंचमीलाच उत्सव साजरा करावा लागतो. पावसाळ्यात येणारी नागपंचमी सुध्दा पंचमीलाच येते. भगवान श्रीकृष्ण ज्या कालियाच्या फणांवर नाचले त्या कालियाला सुध्दा पाचच फण होते. पंचतत्वातील प्रत्येक देवतेला, शिवापासून तो विष्णूपर्यंत, नागशेषांचाच आधार आहे. जगदंब कुंडलिनी मूलाधारात आपले साडे तीन वळसे सोडून जेव्हा मोकळी होते आणि मेरूदण्डातील सुषुम्नेतून सप्तचक्रांचा भेद करीत जसजशी वर ब्रह्मरंध्रापर्यंत प्रवास करते तसा पंचतत्वांचा साक्षात्कार घडून त्या तत्वांचा अनुभव साधकाला प्राप्त होतो; म्हणून नागपंचमी किंवा नागदीपावली पंचमीला साजरी करतात.
क्रमशः-
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
शब्दांकन – राजेश कोल्हापुरे – संपर्क ९५९४७३७३५७ / ९७०२९३७३५७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा