वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - आत्म्याचे अस्तित्व

प्रश्न क्र. 18 :- आत्म्याचे अस्तित्व खरंच आहे का ?

आत्म्याचे अस्तित्व असा प्रश्न म्हणजे आपल्या अस्तित्वाची शंका घेण्या-सारखे आहे. आपले अस्तित्व म्हणजे सजीव देहाचे चलन-वलन होय. ह्या देहात जीव असतो म्हणून तो सजीव ! देहातून जीव निघून गेल्यानंतर तो मृतदेह होतो. जीव म्हणजे आत्मा. त्या आत्म्याचे अस्तित्व आपणास शरीर धारणेतून दिसते. अखिल मानवाचे प्रेरणा स्रोत महाभारतील श्रीमत् भगवत् गीतेत जे आहे ते जगभरात मान्य आहे. त्यातील पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकात महाभारतकार महर्षी व्यास काय सांगतात ते बघून याची अधिक स्पष्टता होईल.

अथ प्रथमोऽध्यायः

धृतराष्ट्र उवाच

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।

मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१॥

युध्दभूमीवरील प्रसंग अंध राजा धृतराष्ट्र पाहू शकत नव्हता. म्हणून ते दिव्यदृष्टी प्राप्त संजयला युध्दाविषयी त्यांच्या व पंडू पुत्राचे कथन करण्यास सांगतात. या सर्व वर्णनात्मक कथेचा योगाशय पाहिल्यानंतरच आपल्यास शरीरस्थित आत्मा समजण्यास सोपे जाईल.

 या श्लोकाचा योग्य आशय ध्यानात आणण्यासाठी ज्ञान देवता श्रीगणेशाला अतिशय गहन चिंतन करावे लागले. आता प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एका युद्ध क्षेत्रासाठी वेदव्यासांनी धर्मक्षेत्र व कुरुक्षेत्र असे दोन विशेष नामे का ठेवली असावी. एक क्षेत्र किंवा गावासाठी दोन नावे ठेवली तर व्यवहारात बराच गोंधळ निर्माण होईल. जर मुंबईचे नाव नागपूर ठेवले तर प्रवास अथवा पत्रव्यवहारात बराच गोंधळ उडेल. व्यासांसारख्या प्रखर बुद्धिमान व्यक्तीने अशा तऱ्हेने एकाच युद्धभूमी साठी दोन नामे देतांना वेगळाच आशय त्यांना अभिप्रेत असला पाहिजे.

आपले अस्तित्व दोन उप अस्तित्वांनी बद्ध झालेले असते. एकतर आपला जीवात्मा आणि दुसरे शरीर होय. जीवात्मा जड अस्तित्व नसून एक संस्काराची अतिशय सूक्ष्मातिसूक्ष्म मूस असते. प्रत्येक जन्मातील बरे वाईट संस्कार जीवात्म्यावर संचयित होत असतात. तसले पूर्व संस्कार घेऊनच प्रत्येक जीवात्मा नवीन शरीर धारण करीत असतो. जीवात्म्याचे हे स्थिर संस्कार म्हणजेच जीवात्म्याची धारणाशक्ती होय. ते धर्मक्षेत्र होय. तर शरीराच्या असल्या ग्राह्य संस्काराच्या क्षेत्राला व्यास कुरूक्षेत्र असे म्हणतात. कुरु म्हणजे कर्म करणे. ज्या ज्या देहांचे कर्म त्याचे ग्रहित संस्कारांना धरूनच असणार. म्हणजेच जीवात्म्याचे क्षेत्र धर्मक्षेत्र तर शरीराचे क्षेत्र कुरुक्षेत्र होय. दोन्ही क्षेत्र एकाच पिंडाला धरून असतात. त्यामुळे वृतिरुपसंघर्ष क्षेत्राला व्यास धर्मक्षेत्र, कुरूक्षेत्र अशी नावे देतात. पिंडस्थित आत्मा व त्याचे अस्तित्व अशा स्वरूपात आहे. हे शरीर दृश्य रूपात दिसते त्यात आत्मा अस्तित्वात आहे म्हणूनच !  जोपर्यंत हा पिंड आहे तोपर्यंत हे वृत्तीयुध्द होणार ! या गीतेतील वरील विवरणातून जीवात्म्याचे अस्तित्व सिद्ध होते.

संदर्भ :- श्रीमत भगवत गीतायोगीराज मनोहर हरकरे                            

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी