वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा- मातेच्या गर्भात प्रवेश

प्रश्न क्र. 21 :- मातेच्या गर्भात तो सूक्ष्म जीव कसा प्रवेश करतो ?

या बाबतींत खूपच गैरसमज दिसून येतात. ते दूर करण्यासाठी शास्र पुराण व आजचे विज्ञान यांचा आधार घ्यावा लागेल. तेव्हा ते जन्मरहस्य समजायला सोपे होईल. आपला जन्म होण्याआधी नऊ महिने आपण मातेच्या उदरात गर्भ अवस्थेत असतो. त्या गर्भात गर्भसंस्कार होत असतात. भागवतातील स्कंद ३ अध्याय ३१ मधील श्लोक १० ते ३१ पर्यंत कपिल महामुनी आपली माता देवहुतीला जन्माचे ज्ञान रहस्य सांगतात.

तं जीवकर्म पदवीम् अनुवर्तमानाः तापत्रयोपशमनाय वयं भजेत् ।

आरभ्य सप्तमात् मासात् लब्धबोधोऽपि वेपितः ।

नैकत्रास्तेसूतिवातैः ष्ठि भूरिव सोदरः ॥

अर्थात सातव्या मासानंतर जीवात्मा जीवकर्म करण्याच्या म्हणजे शरीराद्वारे कर्म करण्याच्या पदवी म्हणजे योग्यतेला प्राप्त होतो. म्हणजे आपला जन्म गर्भधारणेच्या पहिल्या दिवशी न होता सातव्या महिन्याच्या शेवटी होतो.

आजचे विज्ञान सुद्धा असेच सांगते. सातव्या महिन्या अगोदर बाळंतपण झाल्यास त्याला गर्भपात म्हणतात. त्यावेळेस झालेले मूल वाचत नाही. सातव्या मासानंतर झालेले मूल वाचते. ते गर्भ शरीर पूर्ण सातव्या महिन्याचे झाले म्हणजे त्या शरीराच्या स्पंदन कर्षणाद्वारे त्या शरीराच्या शत-प्रतिशत योग्य अशा गुणांचा आसमंतातील जीवात्मा त्या गर्भात कर्षिला जातो. आणि जीवाचा त्या शरीरात प्रवेश झाल्यावर मग आपला जन्म झाला असे मानले जाते. आपला जन्म म्हणजे जीवात्मा गर्भशरीरात सातव्या महिन्यात कर्षिला जातो. गर्भात असलेले शरीर आपल्या गुणाणूंच्या रचनेनुसार सतत स्पन्दन करीत असते आणि तसल्याच गुणांचा जीवात्मा आसमंतात असल्यास तो त्या शरीर स्पंदन कर्षणामुळे त्या गर्भशरीरात कर्षिला जातो. सुयोग्य गुणांच्या शरीराद्वारे सुयोग्य जीवात्म्याचे कर्षण केले जाईल अन्यथा नाही.

 शरीरात स्थानापन्न झाल्यावर जीवात्मा मग आपल्या शरीरातील सर्व इंद्रिये व मन कर्षित करतो असे म्हटल्याचा आभास उत्पन्न होतो, परंतु ती इंद्रिये आणि मन जीवात्म्यासह पूर्वीचे मृत्युसमयी केलेल्या शरीर त्यागासहच असतात. म्हणून जन्म झाल्यावर पुनः त्या जीवात्म्याला ते मन व पंच इंद्रियांचे कर्षण करण्याची आवश्यकता नसते. म्हणून जन्माचे वेळी म्हणजे सातव्या महिन्याच्या शेवटी ते मातृ उदरातील गर्भशरीरच आपल्या गुणकणानुसार स्पंदन करून त्या योग्य जीवात्म्याला कर्षण करते असे मानणे भाग आहे. जवळ जवळ असाच दिव्य अनुभव योगीजनांना जिवंतपणी आपल्या नियत शरीराबाहेर जाऊ शकणाऱ्या जीवात्म्याला येत असतो. जीवात्मा शरीराबाहेर जास्त काळ राहूच शकत नाही. नियत शरीर जीवात्म्याला आपल्या गुणाणू रचनेद्वारा कर्षण करून शरीरात बळेच ओढते आणि नकळत साधकरूप जीवात्मा आपल्या नियत शरीरात कर्षित केला जातो. त्याचेच द्वितीय पुरुषी वर्णन श्रीमद् भगवद् गीता अध्याय १५ श्लोक ७ आणि ८ मध्ये आले आहे. 'प्रकृतिस्थानि कर्षति' याचा अर्थ मातृगर्भातील गर्भस्थ शरीर त्या योग्य जीवात्म्यास मन, बुद्धी, पंच ज्ञानेंद्रियांना कर्षण करते

यातून असा एक सिद्धांत निघतो की जन्म होण्यासाठी कोणत्याही शरीरात कोणताही जीवात्मा प्रवेश करू शकत नाही. अथवा कर्षिला जाऊ शकत नाही. गर्भशरीर व जीवात्म्यावर तात्काळपर्यंत झालेले गुण जर शतप्रतिशत एकाच गुणधर्माचे असतील तरच तो जीवात्मा अथवा लिंगशरीर तसल्याच गुणांच्या शरीरात कर्षिला जाऊ शकतो. अन्यथा नाही. म्हणून जन्मताच जीवात्मे आणि त्यांची नियत शरीरे बऱ्यावाईट गुणांची असतात. या अस्तित्वाद्वारे नवजीवन तयार होते. त्याला शास्र पिंड असे संबोधतात. जीवशरीर संयोगामुळे प्रत्येक पिंडाचा गुणधर्म विभिन्न असतो. म्हणून जगात कोट्यावधी माणसे आहेत. परंतु त्यापैकी एकाचा चेहरा व गुण दुसऱ्यांशी तंतोतंत जुळत नाहीत. म्हणूनच शास्र सांगते 'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना'

संदर्भ :- श्रीमत् भगवत् गीता - योगीराज मनोहर हरकरे                                          

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी