वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - साधकाचा पिंड धर्म व अनुवंशिकता
प्रश्न क्र. 35 :- साधकाचा पिंड धर्म व अनुवंशिकता, की जो पूर्वजांच्या जीनस् मधून प्राप्त होतो याचा काही संबंध आहे काय ? एकाच वंशवेलीतील वेगवेगळ्या पिंडधर्मीयांच्या व्यक्ती असू शकतील काय ?
असू शकतात ! वंशवेलीचा विचार केला तर सर्रासपणे ऐकायला येणारे वाक्य 'कुळाच नाव काढलं किंवा कुळाला बट्टा लावला.' यावरून कुलाभिमान दिसतो. वंशपरंपरेने चालत आलेला कुळाचार सर्व कुळात पाळतात. कुळाचार करणे हा एक संस्कारांचा भाग आहे. ते पाळले तर संस्कार मनावर रुजले जातात नाहीतर 'येरे माझ्या मागल्या.' प्रयत्नांवर जीवात्म्याचे ऊर्ध्व व अधोगमन (Up and down) ठरते. आणि एकच वंशवेल वेगवेगळ्या पिंडधर्माने बहरलेली असते. म्हणून "माझा मुलगा माझ्यापेक्षा निराळ्या पिंडधर्माचा आहे असे म्हणतात."
जीवात्मा गर्भाशी शत-प्रतिशत गुण जुळल्याची खात्री पटल्यावरच गर्भात प्रवेश करतो. मग त्याप्रमाणे गुण प्राप्त होणारच. पण प्रयत्नांनी त्यांत उत्क्रांति होऊ शकते. उत्क्रांतीनेच अमीबाचा मानव झालाय ना ! पण तसा प्रयत्न केला पाहिजे. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.' प्रयत्न न करता उत्क्रांती शक्य नाही.
'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे
तृषार्थाची तृषा मृगजळ पिऊनी विसरे
पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिजे. हे वैदिक परंपरेला अपेक्षित आहे. मानव प्रयत्नांच्या पराक्रमाने प्रकृतीचे सर्व नियम धाब्यावर बसवून हवेतून हवेच्या पलिकडे दुसऱ्या ग्रहावर गेलाच नां !
अनुवंशिकतेप्रमाणे काळ्या आईबापांचा मुलगा काळाच असतो. आता गर्भसंस्कार व शरीर विज्ञान यांच्या मदतीने अशक्य ते शक्य होऊ पाहत आहे. वंशातीत मुलगा-मुलगी हा भेदभाव समांतर होत आहे. अनुवंशिकतेने एखाद्या कलाकाराचे अपत्ये कलाकार होईलच हे सांगता येत नाही. पण उत्तम संस्काराने ते शक्य होऊ शकते. असं वाचनात आहे की तुकाराम महाराजांच्या आधीच्या आठ पिढ्या पांडुरंग भक्तीत राहिल्यात. तेव्हा कुठे तुकारामासारखे महान भक्त योगी जन्माला आलेत. याचा अर्थ वाड-वडिलांनी कमावलेले नाव लौकिक, कुळाचार व आध्यात्मिक पात्रता पुढे पुत्राने त्या सामर्थ्याने पेलले पाहिजे. नाहीतर अनुवंशिकतेला खंड पडतो. जीवाचे उत्क्रांत होण्याचे चार मार्ग- भक्ती, योग, कर्म, व यातून ज्ञानमार्ग आहे. आपल्या ध्येयाशी निरंकारी वृत्तीने समर्पित असणे हे त्यातील खरे रहस्य आहे. थोडी साधना व भक्ती केल्यावर त्याचा अहंकार येणे आणि स्वतःला इतरांपेक्षा उच्च समजणे यासारखी आत्मवंचना कोणतीही नाही. पण आज याच गोष्टीला उत आला आहे. बरेच महाराज, भगवान, योगी असल्या अहंकाराने ग्रस्त झालेले दिसून येतात. सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात.
नाही संतपण मिळत ते हाटीं । हिंडता कपाटीं रानीवनी ।।
नये मोल देता धनाचिये राशी । नाही ते आकाशीं पाताळी ते ।।
तुका म्हणे मिळे जीवाचिये साठी । नाही तरी गोष्टी बोलो न ये ।।
मनुष्याला 'संतपण' हे बाजारात मिळत नाही. त्यासाठी साधनेत स्वतःला कठोर परिश्रम घ्यावे लागतात. पूर्वजांच्या कर्म-संस्कारावर नाही जगता येत. जो कोणी जीवाचे ममत्व सोडून देऊन हरीला सर्वभावे शरण जातो, आणि एवढेच नव्हे तर जीवावर उदार होण्यास देखील मग जो मागेपुढे पाहत नाही त्यालाच ते 'संतपद' लाभते. हरीला शरण जाण्यासाठी हरी म्हणजे सर्वस्वाचे हरण करणारा. सुखविलासी जीवन जगत समाजात नावलौकिक मिळवणं म्हणजे पाखंडीपणा होय. असे काकाजी निक्षून सांगायचे.
यावरून असे सांगता येऊ शकते की साधकाचा पिंडधर्म अनुवंशिकतेनुसार बनतो. तसेच सततचे प्रयत्न करुन उच्च संस्कार करीत गेल्याने पिंडधर्म सुद्धा बदलू शकतो.
संदर्भ :- विश्वयोगी गुरू-शिष्यांच्या गोष्टीतून समाधान
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://vaidik-vishwa.blogspot.com/
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा