वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - देव दर्शन

प्रश्न क्र. 16 :- देव अजन्मा आहेत, म्हणजे काय? मग त्यांची दर्शने कशी होतात?

 शरीरात आत्मा आहे. शरीर जन्म घेते तसेच शरीराला  मरणही येते. पंचतत्वातून झालेले शरीर पुन्हा पंचतत्वात विलीन होणार. त्यातील आत्मा अमर आहे. ज्याला मरण नाही म्हणजे त्यास जन्म नाही. तो अजन्मा आहे. परमत्त्वातून वियोग झालेला आत्मा परमत्त्वात संयोग होणार आहे. हे केवळ स्थित्यंतर आहे.

देव शब्द '' या धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ देणारा. जो देतो तो उच्च असतो. यावरून देव म्हणजे साधकांतील देणारी अशी उच्चावस्था आत्मवृत्ती होय. आणि अजन्मा अर्थात '' म्हणजे नाही व 'जन्मा' म्हणजे जन्म किंवा उत्पत्ती. याचा अर्थ देव जन्मरहित आहे. म्हणजे देव अजन्मा आहे

 आत्ता असा प्रश्न उपस्थित होतो. जर देवाचा जन्मच नाही तर आपण देवांचे जन्मोत्सव साजरे का करतो? आपल्या आजूबाजूला असंख्य देवालये आहेत. मग त्यात देव कोठे ? पण ज्ञानेश्वर माऊली तर हरिपाठाच्या सुरवातीलाच सांगतात. 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या।। ज्ञानाचे देव ज्ञानदेवांनी मंदिराचे द्वारात उभे राहणे, हा त्याचा अर्थ नसून देव म्हणजे आत्मा आणि त्या आत्माचे मंदिर म्हणजे आपले शरीर होय. त्या शरीराचे हृदयस्थानी सदा विलसत परमेश्वराशी क्षणभर जरी एकरूप होऊ शकलो, तरी त्या भक्ताला चारी मुक्ती सहजसाध्य होतील.

 शरीरात मनाची रचना आहे. मन म्हणजे अनेक संस्कारांचा ठेवा होय. म्हणून मन आपल्या पूर्वसंस्कारानुसार दृश्यमान किंवा अनुभूत अशा अवस्थेला काहीतरी आकार देते. मन काहीतरी आकाराशिवाय  कल्पनाच करत नाही. यातूनच पुढे साकार-निराकार आले. शरीराला मन, बुद्धी, आत्मा मिळून पिंड म्हणतात. हेच ते साकार पिंडी अथवा निराकार पिंडी होय. साधारण ९९.९० % लोक साकार पिंडी असतात. म्हणून ते आकार मूर्तीत आणतात. मूर्ती म्हणजे प्रतिमा, प्रति+आत्मा प्रतिमा ! आपल्या आत्म्याचे प्रतिबिंब समोरच्या वस्तूत कल्पिले जाते म्हणजे आत्म्याची प्रतिष्ठापना समोरील वस्तूत केली जाते. म्हणून वैदिक परंपरेत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. या परंपरेच्या अखेरच्या काळात हा मूर्तिपूजनाचा प्रकार सुरू झाला. संस्कारानुरुप साक्षात्कार होऊन देवी-देवता मूर्तीरूप आकारात साकारले. यावर संत तुकाराम महाराज यांचे अभंग दाखले घेऊन स्पष्टता बघू.

"रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग"! तुकाराम महाराज देहू सारख्या खेडेगावांत राहणारे, मग त्यांच्या वर रात्रं- दिवस युद्धाचा प्रसंग कसा ओढवणार? त्यावेळी प्रापंचिक संकटांनी आणि दुष्काळाने गांजलेले तुकाराम, एक दिवस कोणालाही न सांगता, घराबाहेर पडले, मनाच्या निराश अवस्थेत त्यांनी भंडारा डोंगराच्या गुहेत बसून विठोबाचं ध्यान करायचं ठरवलं, पंधरा दिवस ते अन्नपाण्यावाचून ध्यान करीत बसले, त्यानंतर त्यांचा जीवनाचा दृष्टिकोन बदलून गेला. "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" असं विठोबाचं वर्णन करणाऱ्या तुकारामांना, विठोबा केवळ मूर्तीत नसून, आपल्यातच आहे, याची अनुभूती आली. कष्टमय साधनेतून, दिवसरात्र भगवंताच्या दर्शनाची आस लागलेल्या मनाच्या युद्धजन्य परिस्थितीत आलेली ही अनुभूती द्वैतभाव नष्ट करणारी आहे.

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर

जशी उसात हो साखर,तसा देहात हो ईश्वर।

जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणि

देव देहात देहात, का हो जाता देवळात ।

तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना

देह हे देवाचे मंदिर आहे. त्यातील आत्मा परमेश्वर आहे. उसात साखर व दुधात लोणी असते. ऊसा पासून साखर व दुधापासून लोणी मिळवण्यासाठी ऊस आणि दुधावर क्रिया-प्रक्रिया कराव्या लागतात. तेव्हां साखर व लोणी तयार होते. त्याच प्रकारे देहावर साधनारूपी प्रक्रिये द्वारे शरीर स्थित सप्तचक्रे उजाळून देहाची देवत्वाकडे ते मिळवण्यासाठी वाटचाल सुरू होते. असे असतांना त्यांचे मुखातून सहजतेने उद्गार बाहेर पडतात, ''देव पाहावयासी गेलो तेथे देवची होउनी ठेलो'' अशा देहाचे देऊळ होऊन संत जन मनात वसतात. पण देहदेवळातील देवाचे दर्शन होण्यासाठी गुरुकृपा-दृष्टी मात्र आवश्यक असते. मग कष्टमय जीवनात अखंड आनंद वाहतो. आनंदाचे डोही आनंद तरंग साधनेतील शारीरिक व वैचारिक अंतर्बाह्य बदलाचे हे बोल होय. मनातील नाम व ध्यान शक्तीरूप दार्शनिक आनंद होय. हाच देव दर्शन साक्षात्कार होय.

 दर्शन साक्षात्कार ही मनाची एक अच्युत आणि प्रबळ अवस्था आहे म्हणून देवतांचे दर्शन होते. हा एक सत्य आणि सजीव अनुभव आहे. मन आहे म्हणून संस्कार आहे. जोपर्यंत मन नावाची अवस्था आहे तोपर्यंत दर्शन साक्षात्कार होईल. चांगली अनुभूती म्हणजे आत्मसाक्षात्काराची अनुभूती होय. मन उन्मनी झाल्यास किंवा लोप झाल्यास दर्शन अशक्य आहे. म्हणून वैदिक परंपरेत निराकार निर्गुण यांना अधिक महत्त्व आहे. आपण वेद, उपनिषद आध्यत्मिक प्रमाण ग्रंथ मानतो. त्यात तर स्पष्टच सांगितले आहे. "अहं ब्रह्मास्मि" मी ब्रह्म आहे.

संदर्भ :- साधना साधक आणि दिव्यानुभूती - योगीराज मनोहर हरकरे

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी