वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १७

वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १७

व्यास पौर्णिमा
                आषाढ पौर्णिमेच्या दिवशी व्यास पौर्णिमा येते. आज व्यासांना का पूजायचे ? गणिताच्या भाषेत व्यासाची व्याख्या आहे वर्तुळामधील सर्वात मोठी रेषा. ही एक अतिशय प्राचीन अशी वैदिक परंपरा आहे. वैदिक परंपरेमध्ये व्यक्तिपूजन नाही आणि ग्रंथपूजन सुद्धा नाही परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की, गुरुपूजन मात्र आहे. गुरु म्हणजे श्रेष्ठ अवस्था प्राप्त केलेले शक्तीकेंद्र होय. असल्या शक्तीरुप केंद्राशी साधनेव्दारे एकरुप होणे म्हणजे गुरुपूजन करणे होय. अर्थात् गुरुपूजन म्हणजे गुणांचे पूजन आहे.  गुण व्यक्तिंच्या आधाराने राहतात. आपला जन्म कशासाठी झाला आहे? याचा आपण कधी विचारच करत नाही आणि या जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो.  जे महापुरुष जीवन चक्राच्या ह्या परिघावर फिरता फिरता एका स्थानी स्थिर होतात आणि नित्य अनित्याचा विचार करून आत्मज्ञान प्राप्तीसाठी परिघाचे एक टोक सोडून मध्यावर वा केंद्रबिंदूवर येतात.  जीवनाच्या  केंद्रबिंदूवर आल्यानंतर ज्ञान प्राप्त करतात की  मी कोण आहे? आम्ही म्हणजे शरीर नाही तर अजर, अमर, अखंड, एकमेवाद्वितीय, सर्वशक्तीमान परमात्म्याचे स्वरूप असे आत्मा आहोत. हे जाणल्यानंतर कसलीच वासना व कसलेच भय राहत नाही. वैदिक परंपरेने शरीर हे आपले उपकरण मानले आहे. याचा उपयोग कसा केला पाहिजे हे जो जाणतो, व ज्ञान प्राप्त करुन जो परिघाच्या दुसऱ्या टोकावर येतो, व अहंकार रहित होऊन जो ते समाजाला देतो तो गुरु ! त्यांना व्यास ही उपाधी दिली गेली आहे.
               भगवान वेदव्यासांचे खरे नाव कुणालाही माहित नाही. व्यास ही त्यांची उपाधी आहे. महान पुरुष नावलौकिकाच्या मागे कधीच धावत नाहीत.ते निरपेक्षतेने समाजासाठी कार्यरत असतात. जसे गुरुजी म्हणताच आपल्याला एकदम गोळवलकर गुरुजींचा हसरा चेहरा आठवतो. तसे व्यासांचे  'व्यास' हे नाव नव्हते. व्यास ही उपाधी त्यांनी याअर्थाने स्वतः प्राप्त केली होती. तो त्यांचा अहंकार नसून, अधिकार आहे. खरे संत स्वत:चे नाव कधीच पुढे करीत नसतात.जे करतात ते संत नसतात.संत तुकाराम महाराज म्हणतात ‘फोडिले भांडार, धन्याचा तो माल । मी तो हमाल । भार वाही ।। आम्ही जे ज्ञान आपल्या समोर ठेवतो ते आमचे नाही. अधिकारी पुरुष, साधुसंत आणि ऋषिमुनी हे याचे खरे मालक आहेत. आम्ही तर फक्त या ज्ञानाची हमाली करत आहोत. अधिकारी पुरुषांनी मिळविलेले ज्ञान मनन, चिंतन आणि ध्यान करुन प्राप्त करावयाचे व समाजाला अहंकाररहित होऊन त्या मागे कुठलीही अपेक्षा न ठेवता वाटून द्यायचे. साधकाची ही अवस्था पूर्ण विकसित असल्यामुळे पौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा करतात.  
               वैदिक प्रार्थनेमध्ये याचे वर्णन आहे. ॐपूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ पूर्ण म्हणजे शून्य नव्हे तर संपूर्ण. बाकी काही नाही. गणिताचा सिद्धांत इथे घेतला आहे. शून्यात शून्य मिळवा,वजा करा,गुणाकार,भागाकार करा उत्तर शून्य म्हणजे पूर्णच येईल. असे हे आत्मतत्व अखंड, अविनाशी, अमर आणि सर्वशक्तीमान आहे. हे सारे विश्व कधी निर्माण झाले हे कुणालाच माहित नाही. हे सतत राहणारे आहे. कधीच नष्ट होणार नाही. हीच वैदिक परंपरेची विशेषता आहे. अन्य परंपरांमध्ये व्यक्तिलाच सर्व काही मानले जाते. त्याशिवाय असे मानले जाते की मानवाचा जन्म पापामुळे झाला आहे. म्हणजेच मानव हा पापी आहे अशी संकल्पना केली जाते. वैदिक परंपरा सांगते, आम्ही अनेक जन्माचं पुण्य केले आहे म्हणून तर मानव जन्माला आलो आहोत. मानवी शरीर कसे आहे की ज्याला खायला खूप कमी लागते. बाकी जनावरे दिवसभर खातच राहतात. मानवी शरीर प्रकृतीने पूर्ण बनविले आहे. ज्या मध्ये आत्मज्ञान प्रकट करण्याचे सामर्थ्य आहे. मग आपण हे शरीर असेच वाया घालवायचे काय? की ज्ञान प्राप्त करायचे?  योग्याचा आहार कधीच जास्त नसतो. अगदी कमी, जेवढे आवश्यक आहे तेवढेच! हत्ती एवढा मोठा प्राणी, त्याचे डोकेही मोठे असते. पण मेंदू मात्र अगदी लहान असतो. मानवी मेंदू खूप मोठा आहे. प्रकृती सांगते की हे मानवा, दिवसभर खाण्याची गरज नाही. मुठभर खाऊन तू चोविस तास राहू शकतोस आणि त्या वेळेचा उपयोग तू स्वतःला जाणण्यासाठी करु शकतोस. मुक्त होऊन परत यायचे नाही. शरीर हे  जिवात्म्याचे उपकरण आहे. संत कबीर म्हणतात "फिर वहा से नहीं आना होगा। करले सिंगार चतुर अलबेली साजन के घर जाना होगा ।  कोण साजन? तर परमेश्वर ! हिंदू समाजाची  सगळी रचना वेदव्यासांच्या वचनांवर चालत आली आहे. त्यांचे खरे नाव या जगाला माहित नाही. या महान पुरुषांच्या गुणांची व तत्वांची पूजा श्रद्धेने करण्याची परंपरा त्या काळापासून आली आहे. हाच तो दिवस आहे. व्यास पूर्णमासी, संपूर्ण असणे होय ! ज्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे, अशा महापुरुषांचे स्मरण करुन आज आपण व्यास पौर्णिमेचा उत्सव साजरा करतो. जिथे जिथे देहाचे पूजन होते ती अवैदिक परंपरा आहे.  ही गुणांची पूजा आहे की हया नश्वर देहाची? आपली वैदिक परंपरा ज्ञानमय परंपरा आहे. विद् म्हणजे जाणणे, ज्ञान प्राप्त करणे. वैदिक म्हणजे ज्ञान प्राप्त करुन तशी जीवन प्रणाली असणे. वैदिक परंपरेची हीच विशेषता आहे की ज्या मध्ये व्यक्तिपूजन नाही.आत्मा अमर आहे. तन, मन, धन, बुद्धी, अहंकार हे जो पूर्णपणे समर्पित करतो त्यालाच म्हणतात गुरु पूजन । गुरुला सगळे समर्पित केले आता माझा जवळ काही नाही ही भावना तरी मग कुठे राहते? जो वयाने मोठा त्याला जरूर नमस्कार करावा. पण गुणांची पूजा करायला हवी.
भारत देश :
'भा' म्हणजे प्रकाश किंवा ज्ञान. जे अज्ञानाचा अधःकार नष्ट करते. 'रत' म्हणजे एकरूप होणे. ज्ञानाशी एकरुप झालेले महापुरुष जिथे राहतात, तो आहे भारत. गीतेमधे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अनेक वेळा ‘भारत’ म्हटले आहे, राजांच्या मागे लागणारे आपले लोक नव्हते. इथे ऋषिमुनींची नावे चालतात. म्हणूनच आपल्या कुळांची नावे ऋषिमुनींच्या नावावरुन पडली आहे.एवढे ऋषिमुनींना व त्यांच्या ज्ञानाला महत्व आहे. हा आहे आपला भारत देश. जिथे ज्ञानाची पूजा होते.
क्रमशः-
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
शब्दांकन – राजेश कोल्हापुरे – संपर्क  ९७०२९३७३५७ / ९५९४७३७३५७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी