वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - पुनरजन्म कधी होतो

प्रश्न क्र. 31:- पुनरजन्म कधी होतो ?

प्रश्न लहान पण रहस्य महान. अशा या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात देणं आणि समजून घेणं दोन्ही अवघड आहे. एखाद्या खाणीतून मौल्यवान वस्तू शोधण्यासारखं आहे. अथवा अथांग सागरातून मोती मिळणे होय.

जीवात्मा शरीरात प्रवेश करताना आणि शरीर त्याग करताना आपल्यासह मन आणि पंचज्ञानेंद्रिय घेऊन येतो व घेऊन जातो. जीवावर झालेल्या कर्मसंस्कारामुळे जीवाला पुनः पुनः जन्म घ्यावा लागतो. यालाच आपण पुनर्जन्म म्हणतो. जीवात्म्याच्या प्रकृतिस्थ कर्षण अवतरणाला 'जन्म' असे म्हणतात. जन्मघटनेकरता दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक जीवात्मा तर दुसरे त्या जीवात्म्याचे योग्य असे पृथ्वितलावरील गर्भशरीर ! त्या जीवात्म्याचे योग्य असे मातृगर्भस्थ शरीर उत्पन्न होई पर्यंत जीवात्मा जन्म घेऊ शकत नाही. असले सुयोग्य शरीर अगोदरच असेल तर जीवात्मा येथून निघून त्या अन्य गर्भात कर्षिल्या जाईन. असे नसेल तर तसले सुयोग्य शरीर मातृगर्भात उत्पन्न होईपर्यंत त्या जीवात्म्याला तितका काळ अवकाशस्थ पितृलोकांत राहावे लागेल. त्याला त्या अगोदर जन्म नाही. म्हणून जीवाला मृत्युनंतर जन्म घेण्याचा अवधि एका क्षणापासून युगापर्यंतसुध्दा राहू शकेल. हाच तो पुनर्जन्माचा अवधी होय.

अवैदिक परंपरेत तर पुनर्जन्मावर विश्वासच नाही. खावो पियो मौज करो हाच त्यांच्या जीवनाचा अर्थ असतो. मग ह्या चौऱ्याशी लक्ष योनीत ते फिरत राहतात. मुंगी पासून ते हत्तीपर्यंत सर्वच जीव मरणाला घाबरतात. याचा अर्थ जीवात्म्याने आधी मृत्यू अनुभव आलेला आहे. म्हणून प्रत्येक प्राणिमात्रास मृत्यूभय वाटते. यावरून पुनर्जन्म आहे हे सिद्ध होते. वैदिक परंपरेने उत्क्रांती सह अनुत्क्रांतिसुद्धा मांडली आहे. उत्क्रांती द्वारे जसे क्रमागतरित्या अमीबापासून बेडूक, माकड, माणूस उत्पन्न होतो, तद्वत उच्च जीवदशेच्या अनुत्क्रांत वागण्यामुळे क्रमागतरित्या मानवापासून माकड बेडूक, अमीबापर्यंत अपक्रांत योनीची वाटचाल होत असावी. अन्यथा आपल्याला आज अमीबासारखा अति प्राचीन जीव दिसलाच नसता. उत्क्रांतीसह अनुत्क्रांतीसुद्धा हातात हात घालून चालत असते. म्हणून वैदिक परंपरेत असे मानले आहे की वाईट कर्म केल्यास मानवाला सुद्धा उलट गतीने जावे लागते. उत्तम संस्कार व सत्कर्म केल्यास उत्तम गती मिळते. ही कल्पना केवळ वैदिक परंपरेतील मानली आहे. म्हणून या विज्ञान युगातील समंजस व्यक्तीने धर्मआचरणाचे विज्ञान जाणून स्वतःचे जीवन उन्नत, उत्क्रांत बनवण्याकरता वैदिक परंपरेची कास धरल्या विना गत्यंतर नाही.

श्रीमद भगवत् गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात.

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।

त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन || ९|अ.४।

 अर्थात माझा जन्म आणि माझे कर्म असे दिव्य आहे. हे दिव्य जो जाणेल त्याला पुनर्जन्म नाही कारण तो मलाच येऊन मिळेल.

एक घागर भरलेले पाणी आपण जर सागरात सोडले आणि थोड्या वेळाने तेच पाणी परत आणतो म्हटले तर आणता येईल काय ? ते पाणी तर केव्हाच त्या अफाट अथांग सागरात मिळाले. आता तेच पाणी परत मिळविणे शक्य नाही. तद्वत् ज्याने आपले अस्तित्व त्या परम अवस्थेशी एकरूप केले आहे त्याला पुनःजन्म नाही. तो या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त आहे. सर्वांचे लक्ष मुक्ती असली पाहिजे. परंतु हे लक्ष साध्य करण्याकरिता अनंत जन्मांचे कर्मरुपी बाण आवश्यक आहे. जे अर्जुनासारखे शरसंधान नेहमी ब्रह्मरूप लक्ष्यावर करतो. म्हणून अर्जुनाचा बाण कधीच वाया जात नव्हता. त्याप्रमाणे आपला प्रत्येक जन्म साधनेच्या कर्मशरांनी भरला पाहिजे. म्हणजेच जन्म-पुनर्जन्म वाया जात नाही.

 ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात सांगतात  "ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालो ।।  नामसाधनेच्या नित्यनेमाने चित्ताला त्या हरी अवस्थेचे चिंतन करायला लावल्यास अशा साधकांच्या चित्तात सदा हरी म्हणजे मायातित अवस्था विलसत राहील. असला साधक या जन्मात नव्हे तर मागच्या जन्मात मुक्त झाला असे निश्चित समजावे. जो सर्व मायेतून मुक्त असतो. असे ज्ञानेश्वर माऊली येथे सांगतात.

 पूज्य काकाजींच्या जन्म-मृत्यू रहस्य व श्रीमत् भगवत् गीता या ग्रंथात हे गुह्य ज्ञान-विज्ञान परिपूर्ण विस्तारलेले आहे. जिज्ञासूंनी अधिक माहिती साठी हा ग्रंथ पाहिजे असल्यास संपर्क करावा.

संदर्भ :- जन्म-मृत्यू रहस्य व भगवत् गीता - योगी मनोहर                         

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी