वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - वेगवेगळ्या साधना
प्रश्न क्र. 30 :- मी साधने बद्दल बरंच ऐकलं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या साधना सांगितल्या आहेत. दैनंदिन जीवनात साधनाक्रम योग कसा असावा ? अशी एखादी सुलभ साधना आहे का जी सर्वमान्य होऊ शकते ? ती साधना कोणती व ती कशी करावी ?
मानवाचा स्वभावधर्मच आहे की सतत शोध घेणे. शोधा म्हणजे सापडेल म्हणून सतत धडपडत असणारा जीव मुक्तीचा मार्ग शोधत असतो. प्रत्येक पंथात साधना सांगितल्या आहेत. त्या व्यक्ती धर्मसापेक्ष असतात. ती त्या धर्मसंप्रदायातील सर्वाना लागू पडेलच हे सांगता येत नाही. येथे धर्म म्हणजे पिंडधर्म, त्यानुसार साधना केल्यास लवकर प्रगती होते. मग तुम्ही कोणत्याही धर्मपंथाचे असू द्या. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने पूज्य काकाजींनी अनेक साधनांचा स्वतः अनुभव घेतल्या नंतर ज्या एका परिणामकारक साधने द्वारा ते या अवस्थेप्रत आले आहेत, ती एक सरळ साधना त्यांनी सर्वांकरिता प्रगट केली आहे. या साधनेत भक्तियोग, कर्मयोग, राजयोग आणि या सर्वांमुळे ज्ञानयोग सुद्धा आहे. साधना अतिशय सरळ आणि सुलभ असून आबालवृद्ध स्त्रीपुरूष तिचा अवलंब करू शकतात.
रात्री झोपण्याच्या वेळी योगनिद्रा करून झोपावे. योगनिद्रेमुळे झोप फारच कमी होते. थोड्याशा झोपेने शरीराला पूर्ण आराम मिळून सर्व शरीर स्वस्थ आणि रोगविरहित बनते. साधने करिता शरीर प्रकृतिस्थ म्हणजे निरोगी पाहिजे आणि ते आवश्यक आहे. शरीर निरोगी आणि प्रकृतिस्थ राहण्याकरिता काही योगासने करणे आवश्यक आहे. परंतु सर्व वेळ योगासनात खर्च करून स्वत:ला एक मोठा योगी मानणे सुद्धा उचित नाही. आजकाल सर्वत्र योगासनांचा प्रचार होत आहे ही चांगली गोष्ट आहे, पण योगासनेच योगशास्त्राचे सर्वस्व नाहीत, अष्टांग योगापैकी तो केवळ एक योग आहे एवढेच. साधना करण्याकरिता शरीरात पूर्ण शक्तीचा संचय होणे आवश्यक आहे. याकरिता साधकाने साधना केल्यानंतर योगासने करावीत. दररोज पश्चिमोत्तानासन, वज्रासन, अर्ध वा पूर्ण मच्छिंद्रासन, गोमुखासन, शलभासन, सर्वांगासन आणि मत्स्यासन अशी काही योगासने करावी. योगासने साधनेच्या अगोदर केल्यास शरीराला थकवा येण्याची शक्यता आहे आणि थकलेल्या शरीराने साधनेत मनाची लय आणि ध्यान लागणे कठीण आहे. म्हणून योगासने साधनेनंतर करावीत.
साधनेच्या अगोदर काही खाणेपिणे योग्य नाही. प्रातःकाळी पाणी पिऊन अमृतपान करतात, हे सुद्धा साधनेसाठी योग्य नाही. साधनासमयी मुखापासून गुदापर्यंत शरीरात काहीच असू नये. ज्यांना जलपानाची किंवा चहाची सवय आहे त्यांनी काही दिवस चालू ठेवण्यास हरकत नाही, परंतु हळूहळू त्यांनी त्या संवयीपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे. याकरिता भल्यापहाटे चार वाजता उठून शौच्यमुखमार्जन आटोपून आसन मांडून साधकाने स्थानापन्न व्हावे. स्नान केल्यास चांगलेच आहे पण काही कारणाने ते शक्य झाले नाही तरी चालेल, परंतु साधनेला बसण्यापूर्वी शौच्य- मुखमार्जन करणे अत्यावश्यक आहे. काही जणांना सकाळी मलविसर्जन होत नाही. पण अशांनीही शौच्यास मुद्दाम जाऊन हळू हळू मलविसर्जनाची प्रातः कालची सवय लावून घ्यावी कारण साधनेच्या दृष्टीते ते लाभदायक आहे. अन्यथा साधकाची प्रगति लवकर होणार नाही.
आसन कसे करावे? खाली दर्भासन, वर मृगचर्म किंवा स्वच्छ कांबळे आणि त्या सर्वावर स्वच्छ शुभ्र सुती वस्त्र अंथरावे. त्या आसनावर पद्मासन घालून किंवा न जमल्यास सहजासन लावून बसावे. एकदा आसन लावल्यावर बैठक मोडू नये. आसन विजयाचा अभ्यास हळू हळू साधनाकालाबरोबर वाढत राहिला पाहिजे. तोंड पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला करावे. निराकारपिंडी साधकाने केवळ आसन लावून आपल्या निराकार साधनेचा म्हणजे ध्यान, धारणा आणि समाधीचा अभ्यास करावा. साकारपिंडी साधकाने आपल्यासमोर आपल्या इष्टदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवावी. प्रतिमेला कुंकू वाहून, जे बोटाला लागलेले राहील तेच उर्वरीत कुंकू आपल्या भ्रूमध्यामध्ये लावावे. हाच भक्ताला त्याच्या देवतेचा प्रसाद आहे. ज्यांना प्रतिमेला फूल वाहावयाचे असेल, त्यांनी तसे करण्यास हरकत नाही. परंतु खऱ्या साधकाने या वर वरच्या दंभाचारामध्ये गुरफटून राहू नये.
*दीपक त्राटक ध्यान साधना*
एखादा दीप किंवा उदबत्ती लावावी आणि त्याच्या ज्योतीच्या किंवा उदबत्तीच्या जळत्या टोकाकडे एकटक नेत्र लावून त्राटक करावे. डोळे एकाग्र करून ज्योतीकडे एकटक पाहण्याला त्राटक म्हणतात. अशाप्रकारे त्राटक करण्याने सुरूवातीला डोळ्यात पाणी येईल. तरीपण प्रयत्न चालू ठेवल्यास पाणी आपोआप बंद होईल. त्यानंतर इष्टदेवतेचे एखादे संस्कृत स्तोत्र फार जोरात नाही आणि अगदी मनातही नाही अशाप्रकारे म्हणावे. स्तोत्र गायनात आपले मन लावावे म्हणजे आपले स्तोत्र गायन आपल्यालाच ऐकू येईल. याला लययोग म्हणतात. स्तोत्र एकदा संपल्यानंतर पुन्हा त्याची जमेल तेवढी आवर्तने करावीत. स्तोत्र पाठ न झाल्यास, इष्ट देवतेचा एखादा मंत्र म्हणावा. सर्वात उत्तम म्हणजे गीतेचा एखादा अध्याय पाठ करून म्हणावा. स्तोत्र गायनाने मनाची लय लागून मन शिथिल होऊन चित्त नामक अवस्था सजीव होऊन उठते. मनाची लय लागल्यावर चित्त उदित होते. अशाप्रकारे मन एकाग्र होऊन चित्तामधून संस्कारांचा लोप होण्यास सुरूवात होते. चित्ताची मलिनता किंवा संस्कार अशाप्रकारे हळू हळू क्षीण होत जातात. भगवान पतंजलि या ध्यानयोगाचे वर्णन *तत: क्षीयते प्रकाशावरणम्'।* असे करतात. ध्यानात ही शक्ति आहे की ते चित्तातील मलिनता आणि संस्कार हटवू शकते.
ही दीपक त्राटक साधना सर्वांसाठी सर्वमान्य आहे. असा अनुभव आहे. करून बघायला काही हरकत नाही. सर्व धर्म- संप्रदायी ते कोणत्याही पिंडधर्माचे असू देत, त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार साधनेत यथावकाश प्रगती होईलच. यात काही संदेह नाही. परंतु साधनेत मात्र प्रामाणिकता तसेच श्रद्धा असावी लागते. तरच साधना निश्चित फलदायी ठरते.
ओम् शांती ! शांती !! शांती: !!!
*दीपक त्राटक ध्यान साधना लिंक*
https://youtu.be/d7UNANUbrSw
*संदर्भ :- साधना साधक - योगीराज मनोहर हरकरे*
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा