वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - शिवधनुष्य

प्रश्न क्र. 13 :- सीता स्वयंवरात प्रभू श्रीराम यांनी धनुष्यावर प्रत्यंचा चढविताच त्या धनुष्याचे तुकडे झाले हे कसे काय? ते धनुष्य तर प्रत्येक्षात श्री शंकरांनी जनक राजास दिले होते असे वाचनात आहे ,मग ते धनुष्य इतके तकलादू होते का ? त्या मागील आशय काही वेगळाच आहे का ? त्यामागील अध्यात्म काय आहे ?

 साधनेतील अनुभवावर आधारित या प्रश्नाचे उत्तर आपण वाचणे म्हणजे ही फक्त माहिती होणे आहे, ज्ञान होणे नाही. कारण ज्ञान होण्याकरता तसल्या अनुभूतीची आवश्यकता असते. आणि अनुभूती येण्यासाठी साधना साध्य झाली पाहिजे. साधना साध्य होण्यासाठी उच्च तत्वातील महान गुरु मिळणे आवश्यक असते. सुदैवाने परमपूज्य काकाजींच्या दिव्यानुभवाने लाभलेले हे दिव्यज्ञान आपणास मिळणे हे सुद्धा आपले भाग्यच आहे. 

 रामायण-महाभारतातील कथा समजण्याकरता आवश्यक अशी साधनाप्राप्त बुद्धी व ज्ञान असणे आवश्यक असते. सार्वजनिक कामानिमित्त पूज्य काकाजी बिहार, बंगाल, आसाम, ओरिसा येथे बरेच वर्षे राहिलेत. बिहार मधील एक प्रसंग काकाजी नेहमी आपल्या साधकांना सांगत असत. एके दिवशी एका महान योग्याकडे नित्याप्रमाणे भेटी करता गेले असतांना बोलता-बोलता त्या योग्यांनी काकाजींना प्रश्न केला. " भैय्या भगवान रामने शिवधनुष्य के कितने टुकडे बनाये ?" एवढा साधा प्रश्न एवढा महान योगी कसं काय विचारणार हा तर्क लावण्याआधीच योगीजी म्हणाले. " अच्छा मेरे पीछे आ जाये और मेरे शरीर के मेरुदण्डपर ऊपर से नीचे तक अपनी उंगलिया घुसेडने की चेष्टा कीजिए ! " मेरूपुष्ट मजबूत हाडांचा असतो. त्यात बोटे कसे जाणार असा विचार करत असतांना काकाजींनी त्या योग्याच्या मेरुदंडावरून बोटे सरकवली. आणि आश्चर्य असे की बोटे त्या हाडांच्या दुर्गांत दोन स्थानी आरपार गेलीत. हा भ्रम नव्हता तर प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला होता. योग्याने पुन्हा प्रश्न केला. "भैय्या कितने टुकडे हुए ?" आता दोन स्थानी बोटे गेल्यामुळे मेरूदंडाचे तीन तुकडे पडणारच ! काकाजींनी उत्तर दिले. *"तीन"*. योगी त्यावर म्हणाले "बस इतने ही तुकडे भगवान रामने शिवधनुष्य के बनाये थे !" काकाजी त्या योग्याकडे सुयोग्य ज्ञाना अभावी आश्चर्यचकित व प्रश्नार्थक मुद्रेने बघतच राहिले. कारण त्यावेळेस त्यांचे वय फक्त २४-२५ वर्षे होते. व एवढे महान ज्ञान समजणे बुद्धी पलीकडे होते. कालांतराने काकाजींना कठोर साधनेद्वारे ह्या मेरुदण्डरूपी शिवधनुष्याची प्रचिती आली. अनुभूती झाली. खरे ज्ञान प्राप्त झाले.

 वरील या अनुभूती द्वारें, सीता स्वयंवरात प्रभू श्रीराम यांनी धनुष्यावर प्रत्यंचा चढविताच त्या धनुष्याचे तुकडे झाले म्हणजेच शिव अर्थात कल्याणकारी अवस्था प्राप्त होण्यासाठी मेरुदण्डरूपी धनुष्यावर साधनेचा शक्तीरुप प्रत्यंचा चढवणे होय. या द्वारे रामरुपी उच्च साधकाला त्याच्या योग्य सुयोग्य संस्कारी सीता रुपी काया प्राप्त होणार असते, जी पुढील साधनेला उपयुक्त ठरते. प्राणायामापासून ध्यान व समाधिपर्यंतचा सर्व योगाभ्यास हा मेरूदंडावरच असतो. या मेरूदंडावर विजय मिळवून अर्थात् शिवधनुष्य उचलून त्यावर प्रयत्नरूपी प्रत्यंचा लावतांना त्याचे तीन तुकडे होणे अर्थात् सर्व शरीराचे नियंत्रण मेरुदंड असल्यामुळे शरीररूपी सीतेने तिला अनुकूल अशा राम साधकाला आपण होऊन माळ घातली. परस्पर अनुकूलतेमुळे साधकश्रेष्ठ रामाचे कायारूप सीते बरोबर स्वयंवर होणारच! यावरून लक्षात आलेच असेल की ते शिवधनुष्य एवढे तकलादू नव्हते. ते उचलण्यासाठी आपणास फक्त राम होणे आवश्यक आहे. कठोर साधना करणे गरजेचे आहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे। ये-या गबाळ्याचे काम नोहे।। असा हा आध्यत्मिक आशय आहे.

संदर्भ :- रामायण रहस्य - योगी मनोहर

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी