वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा-रामनवमी / रामाने सीतेचा त्याग
प्रश्न क्र. १२ :- रामायणाचे पाडवा ते रामनवमी असे नऊ दिवस का? आणि रामाने सीतेचा त्याग का केला?
चैत्र मास सुरू होतो तो, प्रतिपदेपासून! नवीन महिन्याचा व वर्षाचा पण पहिला दिवस! या दिवशी गुढ्या-तोरणे उभारून, वर्षाची सुरुवात मंगल प्रतिकांनी होते. चैत्र गौरीची नवरात्रीची सुरवात आज होते. यालाच वासंतिक नवरात्री असेही म्हणतात. रामजन्माच्या तयारी करता आजच घटस्थापना होते. वैदिक संस्कृतीत व संत वाङमयात मानव शरीराला घट म्हटले आहे. या घटाला जन्म घेण्यासाठी गर्भधारणेपासून नऊ मास व नऊ दिवस लागतात. म्हणून घटस्थापनेपासून म्हणजेच प्रतिपदेपासून नवव्या तिथीला, नवमीला रामजन्म होतो.
रामजन्म किती वाजता होतो? तर ऐन मध्यान्ही, ज्या वेळी सूर्य आपल्या पूर्ण तेजाने, आकाशात तळपत असतो. ज्ञानाला सूर्याची उपमा दिली आहे, जसे ज्ञानसूर्य! पूर्ण तेजाने ज्ञान प्राप्त झाल्यावर आत्मतत्त्ववाची अनुभूती येते, दर्शन होते. म्हणून रामजन्म मध्यान्ही, दुपारी १२ वाजता साजरा करतात.
आता आपण दुसर्या प्रश्नाचे उत्तर पाहू! रामाने सीतेचा त्याग का केला?
ऐतिहासिक दृष्ट्या ही घटना म्हणजे, एका पतीने आपल्या पत्नीला, जिने अग्निपरीक्षा देऊन आपले चारित्र्य निष्कलंक व शुध्द असल्याचे सिद्ध केल्यानंतर सुध्दा, केवळ लोकांचे शंकेखातर, गर्भवती असताना तिला वनवासात सोडून देणं, म्हणजे निव्वळ क्रूरपणा होय! परंतु वाल्मिकींचा रामायण लिहीण्याचा उद्देशच मुळी रूपकात्मक पध्दतीने, वेदाशय सांगण्याचा असल्यामुळे, साधनेच्या अंगाने या कथेचे योगरहस्य पाहू!
राम म्हणजे आत्मा किंवा आत्मतत्त्व! रमन्ते योगिनः यस्मीन राम योगी जेथे रमतो, ते स्थान म्हणजे राम! साधक, योगी, साधना करतात, कशासाठी? तर त्या अंतिम आत्मतत्त्वात, आत्मारामात म्हणजेच रामात रममाण होऊन राहावे म्हणून! या रामाची शरीररुप पत्नी म्हणजे सीता!
शरीरमं आद्यं, खलु धर्मसाधनम् म्हणजे साधनेसाठी शरीराची आवश्यकता आहे. साधना करताना, शरीर आणि जीवात्मा एकाच वेळी सुसंस्कारित होत असतात. पण एकदा का आत्मतत्त्ववाची अनुभूती आली, समाधीचा अनुभव आला की, शरीराची आवश्यकता नगण्य होते. श्रेष्ठ योगी प्राप्त ज्ञान समाजाला देण्यासाठी पुनर् समाजात मिसळतात. या वेळी ते महान अवतरण शरीराने वावरत नसते, तर ते तत्त्वरुपाने जिवंत असते. हे शरीर त्यागाचे रहस्य, सीतात्यागाने उत्तरकांडात दाखवले आहे.
सीतेचे रावणाकडून हरण, द्रौपदीचे वस्त्रहरण या कथांमध्येही, अशीच योगरहस्ये दडलेली आहेत.
संदर्भ :- रामायण रहस्य व वैदिक सणांचे योगरहस्य
लेखक :- योगीराज मनोहर हरकरे
शब्दांकन :- श्री विष्णु एरंडे
मो. क्र. :- 8446329489
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा.
साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा