वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १९
वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १९
वैदिक म्हणजे ज्ञानमय या अर्थाने आपल्या सणांची रचना व साजरे करण्याच्या पद्धती शास्त्रीय आणि साधकांच्या योगानुभवांना अनुसरुन आहेत. वरवर पाहता वैदिक सण व ते साजरे करण्याच्या पद्धती आजच्या काळात असंभव म्हणून अस्वीकार्य वाटतात. म्हणूनच हे सण साजरे करायची औपचारिकताच आज शिल्लक राहिली आहे. पिढ्यानपिढ्या साधनापद्धती लोप पावल्याने सणांमधील शास्त्रीयता तसेच देवताशास्त्र याबद्दल आजच्या पिढीला समजेल वा त्यांच्या बुद्धीला ग्राह्य होईल अशा पद्धतीने आपण त्यांना समजावून दिलेले नाही.
'विश्वात्मक वैदिकता’
संपूर्ण जग एकेकाळी वैदिक परंपराभिमानी कसे होते याची प्रचिती आजही देशांच्या नावावरुन इतिहासावरुन, आचार आणि परंपरा यांमधून पाहणे माहितीपूर्ण व मनोरंजक होईल. रशियातील भाषाकोविद श्री. लेब सिलेन्को भारतात आले होते. त्यांचा भाषाशास्त्र, इतिहास व आचार परंपरांच्या अभ्यासाचा निष्कर्ष हा होता की, इसवीसनापूर्वी रशियात व युरोपात वैदिक परंपरेचे अवलंबन केले जात होते; आजही रशियन, युरोपियन भाषांमध्ये पन्नास टक्के शब्द संस्कृतोद्भव आहेत. काही शब्द संस्कृत शब्दांचे भ्रष्ट उच्चार आहेत. जसे नाविक-नेव्हीक, पथ - पाथ, सम- सेम, इत्यादी. श्रीयुत लेब सिलेन्को यांनी वैदिक जीवनप्रणालीच्या अभ्यास व प्रचारासाठी जगात काही शाखाही स्थापन केल्या आहेत. अफगानिस्थानातील एका विद्वानांचे म्हणणे असे आहे की, रामायण हा इतिहास असेल तर तो त्यांच्याच देशात घडलेला आहे, कारण रामायणात उल्लेखिलेल्या अयोध्या, शरयू इतर देश व नद्या त्यांच्या देशात आहेत. एक मुस्लिम देश असूनही हिन्देशिया (इंडोनेशिया) स्वत:ला ‘रामायण देश' म्हणवुन घेण्यात धन्यता मानतो. सिलोन, मलाया, सिंगापूर, ब्रह्मदेश इत्यादी दक्षिणपूर्व देशांची हीच निष्ठा आहे. काही दिवसांपूर्वी इराक या मुस्लीम देशात उत्खनन करण्यात आले तेव्हा स्वस्तिक चिन्ह असलेला दगड व त्या वेळच्या इराकी स्त्रीची मूर्ती सापडली की जी भारतीय पद्धतीची साडी नेसलेली होती. हे अवशेष इ. स. पूर्व ३००० सालातील असल्याचे मानले जाते. स्वस्तिक चिन्ह व भारतीय साडी हे वैदिक परंपरेतील अध्यात्मिक व भौतिक जीवनाचे चिन्ह आहे.
यावरुन इराकमध्ये वैदिक जीवन पाच हजार वर्षापूर्वी प्रचलित होते हेच सिद्ध होते. रशियाचे खरे नाव 'ऋष्या' आहे, जे संस्कृत शब्द 'ऋष्येय' वरुन आलेले आहे. आजही रशियन लोक स्वतःला 'ऑव्ह' हे संस्कृत विशेषण लावून स्वतःला धन्य मानतात. उदा: कृश्चोव्ह , मोलोतोव्ह, गोर्बाचोव्ह इ. रशियाच्या दक्षिणेला असलेल्या मंगोलिया देशात अनेक संस्कृत ग्रंथ सापडले आहेत. पूर्वेला जपान, कोरिया इ. बुद्धमतवादी अर्थात वैदिक परंपरावादी देश आहेत. संस्कृत 'कुर्यात' शब्दावरुन कोरिया शब्द बनला तर मंगलालय शब्दापासून मंगोलिया शब्द बनला. जपानचे खरे नाव 'निप्पान' आहे. संस्कृत 'पानिय' शब्दाचे उच्चारण व सुलभ नामांतर निप्पान होय. 'चीन' या शब्दाला ' प्रा ' विशेषण लावले असता 'प्राचीन शब्द बनतो. त्यावरुन चीन हेही प्राचीन काळी वैदिक होते है सिद्ध होते. दक्षिणेकडील आणखी एक देश म्हणजे 'ऑस्त्रेलिया' जो असुरालय' शब्दाचा अपभ्रंश उच्चार आहे. आजही तेथील आदिवासी 'मावरीजन’ वसंत ऋतूमध्ये स्वस्तिक चिन्हाचे पूजन करतात. स्वस्तिक चिन्ह वैदिक परंपरेचे द्योतक आहे. आफ्रिका खंड कालपरवापर्यंत जंगली व मागासलेला समजला जात होता. परंतु उत्तर आफ्रिकेतील पुष्कळ देशांची नावे संस्कृतोद्भव आहेत. जसे इजिप्त - अगुप्त, सहारा- आश्रय , न्युबा- नव. २५०० वर्षांपूर्वी सहारा प्रदेश निबिड अरण्य होते. जे सहस्त्रावधी जीवांचे व मानवांचे आश्रय अर्थात सहारा होते. दुर्दैवाने आज तेथे वाळवंट आहे. 'अरबस्थान' इस्लाम धर्माचे मुख्य प्रेरणास्थान आहे, जे आजही काही प्रमाणात वैदिक आहे. 'स्लाम या संस्कृत शब्दाला 'अ' हे विशेषण लावून 'अस्लाम शब्द होतो. स्लाम म्हणजे शांतता आणि 'अस्लाम' म्हणजे विशेष शांतता. या अस्लाम शब्दाचा अपभ्रंश उच्चार 'इस्लाम' होय. अरबस्थान हा शब्दही संस्कृत अऋभुस्थान ह्या शब्दाचे सुलभ उच्चारण होय. ऋग्वेदामध्ये ऋभु ऋषींच्या पराक्रमाचे व पुरुषार्थाचे वर्णन आलेले आहे. एकदा त्यांनी अश्वमेध यज्ञ करण्याचे आयोजिले. परंतु यज्ञासाठी सुयोग्य अश्व मिळाला नाही. तेव्हा या ऋषीनी स्वत:च्या मनःसामर्थ्याने योग्य अश्व निर्माण केला. ऋग्वेदात त्याचे वर्णन आहे, 'तेन हरि मनसा निरतक्षत' या वैदिक ऋभूऋषींचे स्थान कोणते राहील? तर ऋभुस्थान. वैदिक परंपरेमध्ये मूर्तीपूजा नाही. ती निराकाराची पुरस्कर्ती आहे. आजही अरिभुस्थानातील इस्लाम धर्म निराकाराचा पूजक आहे. याप्रमाणे अरिभूस्थान, 'अरबस्थान' या नावाने वैदिक परंपरेचा आदर्श ठेवून आजही धन्य आहे. इराक, असिरिया, इजराइल आणि बलुचिस्थान ही देशनामे संस्कृत आर्यक, असुरालय, आर्यन आणि म्लेंच्छस्थान या शब्दांपासून क्रमश: झालेली आहेत. भगवान श्रीकृष्णाचा मित्र अर्जुन याचे एक नाव फाल्गुन होते. या पासून अफलगुनस्थान - अफगानीस्थान शब्द बनतो. आजही अफगानी लोक आपल्या नावापुढे 'खान' म्हणजे 'कान्हा' विशेषण लावून त्यांची वैदिक परंपरा सिद्ध करतात. हिन्देशियन आपल्या नावाच्या आगोदर 'सु' हे विशेषण लावतात. जसे, सुकानों (सुकर्ण) सुहार्तो (सुहृद), सुबांद्रियो (सुबानरीय) इ.
पाकिस्तान आज जरी भारतापासून अलग झाला असला तरी त्याचे नाव संस्कृतच आहे. पक्कस्थान म्हणजे शुद्ध स्थान, आज ते स्वतःला इस्लामी समजत असले तरी पूर्वी ते वैदिकच होते.युरोप खंडातील अधिकांश देशनामेही संस्कृतोद्भव आहेत. 'इंग्लंद' हा शब्द 'अग्निदल' शब्दापासून झाला आहे. इंग्लंडमध्ये पूर्वी अग्नीची पूजा होत असे, असा इतिहास आहे. आयरलंद हा शब्द तर पूर्ण संस्कृत शब्द आहे. 'दल' शब्दाचे उलटीकरण करुन 'लँद' हा शब्द बनतो. तसा तो इंग्लंद शब्दामध्ये बनला आहे. आयरीश लोक स्वत:ला सेरोस्तेत आयर' (सारस्वत आर्य) म्हणवतात. तर इंग्रज लोक स्वत:चे पूर्वज 'द्रुवाईदू' (द्रविड) होते असे मानतात. द्रु म्हणजे शीघ्र. विद् म्हणजे जाणणे, ज्ञान संपादन करणे होय. म्हणून जे लोक शीघ्रपणे ज्ञानी होतात त्यांना अर्थातच द्रुविद् म्हटले जाईल. द्रुविद् शब्दाचा अपभ्रंश उच्चार द्रविड आहे.
याप्रमाणे एके काळी संपूर्ण संसार आर्य होता, द्रविड होता, वैदिक होता व आजही आहे. परंतु दुर्दैवाने सर्वांना याचे विस्मरण झालेले आहे. आज मानव कोणत्याही धर्म, पंथ अथवा संप्रदायाचा असो, तो प्रथमतः वैदिक आहे. ज्ञानी आहे.
क्रमशः-
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
शब्दांकन – राजेश कोल्हापुरे – संपर्क ९७०२९३७३५७ / ९५९४७३७३५७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा