वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १३
वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १३
माघातील तपोमास
माघमासालाच तपोमास म्हटले आहे. धनधान्याने पुष्ट झालेल्या साधकाला आता तपाकरिता सिद्ध असायला पाहिजे. तपाशिवाय सामर्थ्य नाही आणि सामर्थ्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. ‘ऋतंच सत्यचाभिध्दातपसोऽध्य जायत' असे वेद सांगतात. अमावस्येला मौन पाळायचे असते. मौनालाही वैदिक परंपरेत महत्वाचे स्थान आहे. उत्तरेत हा पर्वकाळ समजला जातो. या दिवशी तीर्थे, नद्या, संगम आणि समुद्र अशा जलस्थानी स्नान करणे पुण्यफळ समजले जाते. पंचमीला वसंत पंचमी येते.
रथसप्तमी आणि भीष्म द्वादशी
साधक आता वृत्तीने देव बनून कुंडलिनी जागृत शरीररूप रथावर आरूढ होऊन स्वर्गाकडे वाटचाल करू लागतो. सप्तमीला रथसप्तमी येते. तपोमासात अनेक तपे करून साधक आता स्वतः देवत्वाने परिपूर्ण झाला आहे. या साताचे वैदिक परंपरेत महत्वाचे स्थान आहे. अभिमन्यू ज्या चक्रव्यूहात घुसला त्या चक्रव्यूहाला सात द्वारे होती. ऐरावत ज्याला सात सोंडी होत्या त्या साधकाच्या शरीरातील सप्तचक्रेच होत. तव्दत आता साधक देव बनून विमानाने स्वर्गात जातो पण त्या सप्तचक्रांचा भेद करूनच ! म्हणून देवाची रथयात्रा सप्तमीलाच सुरू होते. या दिवशी सूर्यनारायणाची प्रतिमा काढून त्याची पूजा करायची आणि त्याजवळच मातीच्या नवीन गाडग्यात दूध व तांदूळ घालून ते गाडगे सूर्याच्या उन्हात ठेवायचे अशी प्रथा आहे. अशी भावना असते की तो भात सूर्यकिरणांनी तापून आपोआप त्या गाडग्यात तयार होतो. एकवेळ अशी होती की साधकात हे सामर्थ्य राहत असे की सूर्यकिरणांतून आवश्यक तेवढी उष्णता घेऊन त्या गाडग्यातील तांदुळ शिजून त्याचा आपोआप भात होत असे. साधकाने तपोमासात काय सामर्थ्य कमविले हे पाहण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस होय, रथसप्तमीला मात्र स्त्रिया अजूनही एक बोळके घेवून त्यात दूध व तांदूळ घालून नारायणाच्या उन्हात शिजवायला ठेवतात आणि तो भात शिजला अशी भावना करतात. त्या परिपाठीमुळे रथसप्तमी म्हणजे साधकाच्या पुण्य पराक्रमाच्या परीक्षेचा दिवस होता हे स्मरण ठेवणे त्यामुळे शक्य होते. ज्यामुळे साधक देव बनून मोक्षप्राप्ती करतो.
भीष्म द्वादशी
या दिवशी पितामह भीष्मांनी आपला शरपंजरी पहुडलेला देह सोडून प्राणत्याग केला म्हणून आजचे दिवशी भीष्मांना तर्पण करायचे असते. महाभारतातील भीष्मांचे जीवन मात्र लोक विलक्षण ! त्यांनी आजन्म ब्रम्हचारी राहून सर्वांचा सांभाळ केला. आपले मरण स्वतःच सांगितले आणि शरपंजरी देह पडला असताना सुध्दा उत्तरायण लागेपर्यंत कुडीत प्राण ठेवला आणि ज्या दिवशी उत्तरायण लागले त्यादिवशी कुडीचा त्याग केला. तिकडे भगवान श्रीकृष्णांची लीला काही औरच! त्यांनी फक्त एक बाण लागल्याचे निमित्त करून देहत्याग केला आणि त्यांचे परमभक्त भीष्म मात्र शेकडो बाण लागून सुध्दा प्राण काढायला तयार नाही. महाभारतातील दोन महापुरूष भीष्म आणि भगवान श्रीकृष्ण ! दोघेही आयुष्यभर खेळ खेळले. आपल्या समक्ष सर्वांचा संहार केला, करविला आणि पाहिला, अगदी स्वजनांचा सुध्दा! आणि एखाद्या धीरगंभीर पुरूषाप्रमाणे दोघेही हसत खेळत चालते झाले.एकाच नाण्याच्या दोन बाजू-भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमभक्त पितामह भीष्म ! त्यांची परम पावन, परम पराक्रमी आणि परमधन्य अशा स्मृती निमित्त आजची भीष्म द्वादशी सर्वजण साजरी करतात. साधकातील भीष्मरूप निर्धार शक्ती आता ब्रम्हशरांनी विध्द होऊन परमनिर्वाण गतीला प्राप्त झाली आहे. आज आता निर्वाणाची उत्तरायणगती सुरू झाली. त्रयोदशीला महाशिवरात्री करतात. याच दिवशी माघमास आपली माया आटोपतो.
महाशिवरात्री
त्रयोदशीला महाशिवरात्री येते. शिवोपासकांचा हा अत्यंत महत्वाचा दिवस ! आजचे दिवशी साधकाला शिवासन्निध राहून उपवास करायचा असतो. उपवास याचा अर्थ भगवंतासन्निध राहणे. त्याची गैरसमजूत करून आम्ही लोक दिवसभर खात सुटतो ही गोष्टी वेगळी. महाशिवरात्रीला काहीच भक्षण करायचे नसते, पाणी सुद्धा ! रात्री पूर्ण जागरण करून भगवंताजवळ राहून उपवास करायचा असतो. इतके तप केल्यावर भगवान शिव प्रसन्न होणार नाहीत काय ? अवश्य होतील. पण भावना हवी. दुसऱ्या दिवशी चतुर्दशीला ब्राह्मणभोजन घालून मग स्वतः अन्न भक्षण करावे. 'शिवो भूत्वा शिवं यजेत्' शिवासन्निध राहून शिवासमान होणे यालाच शिवरात्री म्हणतात. वैदिक पराक्रम यातच आहे. शिशिर ऋतूचा शीतव्याप आता संपला. कृष्णाप्रमाणेच चोरून वसंताने ऋतूंच्या प्रांगणात प्रवेश केला आहे.
खेळे रंग श्रीरंग
वसंतपंचमी पासून आपल्या मकरंद चालीने सर्वजनांना उल्हसित करणाऱ्या या ऋतूराजात फाल्गुन मासाची भर पडते. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. वसंताच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण आणि फाल्गुनाचे रूपाने वीर अर्जुनाची सांगड या ऋतूत घडते. भगवंताला फाल्गुन फार प्रिय. म्हणून भगवंतच या ऋतूत शिष्टाचाराचे व्यर्थ आरोप झुगारून स्वतः मनमोकळेपणाने खेळतात. फाल्गुनाची आठवण झाली की लहानथोर सर्वजण फाल्गुनी पौर्णिमेची मोठ्या उत्साहाने वाट पाहतात. वर्षभर संयमात कोंडलेले मन आता भगवंताशी रंग खेळायला पाहते. भगवान श्रीकृष्णाची ती रंगीत होलिका ! गोपगोपींशी मुक्त आनंदाने खेळणाऱ्या भगवंताची आठवण येऊन विरागी योगीसुध्दा तो अमृत सोहळा पाहण्यास आतूर झालेले असतात. देवगंधर्व सुध्दा तो सोहळा पाहण्यास विमानात गर्दी करतात. मग मानवांनी भान विसरून खेळात रंगल्यास काय आश्चर्य ?
वर्ष प्रतिपदा आणि रामजन्मोत्सव
फाल्गुनाच्या आनंद सोहळ्यात फाल्गुन केव्हा संपतो याचा थांगपत्ता लागत नाही आणि नवीन वर्षाच्या द्वारावर चैत्र येऊन ठेपतो. चैत्रमास आणि नववर्षारंभानिमित्त गुढ्या तोरणे उभारली जातात. वर्षाची सुरूवात मंगल प्रतिकांनी केली जाते. कारण आता आनंद देणारा रामच मुळी नवरात्रीनंतर जन्म घेणार आहे. आज त्या आनंद देणाऱ्या आत्मारामाची घटस्थापना आहे. म्हणून आजचा दिवस वर्षभरातील साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो. साडेतीन वेटोळ्याची कुंडलिनी, साडेतीन हाताचा देह आणि मुहूर्तही साडेतीनच. साडेतीनाचा काय साडेतीन मिलाप आहे पहा ! देवीभक्त देवीच्या नवरात्राची सुरूवात आजच करतात. प्रत्येक तत्वचिंतक साधकाच्या तत्व चिंतनाचा हा प्रथम दिवस असतो. यालाच वासंतिक नवरात्र म्हणतात. 'जे पिंडी ते ब्रह्मांडी' या न्यायाने वैदिक उत्सवाचा भर ब्रह्मांडातील शक्ती व्यक्तीरूपी पिंडात ओतण्याचा असतो. यासाठी आज रामजन्माच्या तयारीकरीता घटस्थापना करतात. आज अभ्यंग स्नान करून घटाघटातील राम पाहण्याकरीता स्वतःला शुचिर्भूत केले जाते.
क्रमशः-
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
शब्दांकन – राजेश कोल्हापुरे – संपर्क ९७०२९३७३५७ / ९५९४७३७३५७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा