वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १५

वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १५

प्रभू श्रीरामभक्त हनुमान
               श्रीरामांचा जन्म झाला पण भगवंताची भक्ती करणारा त्यांचा निस्सीम भक्त हवा ना? भक्ताशिवाय भगवंताला किंमत नाही. पौर्णिमेला वायुसुत हनुमान जन्म घेतात. जन्म घेतल्याबरोबर आकाशात सूर्याला पाहून ते खाण्यायोग्य फळ समजून त्याच्याकडे ते उड्डाण करतात. इंद्राने आणखी कोणी समजून त्याला मारण्याकरीता आपले वज्र फेकले. वज्रामुळे हनुमंत ठार मरायचाच पण तो वार त्याच्या हनुवटीला लागून तो जायबंदी झाला. तेव्हापासूनच हनुमंताची हनुवटी वानरासारखी दिसायला लागली. हनुमंत नसते तर रामायण घडून रावण मारला गेला नसता. अशा  चैत्र पौर्णिमेला हनुमंताचा जन्म झाला. वायुसुत हनुमान वायुतत्वाची देवता होय. वायुतत्वाला ओलांडल्याशिवाय आकाशतत्वाचा साक्षात्कार घडत नाही. म्हणून वायुतत्वातील देवता गरूड, हनुमान आणि नारद आकाशतत्वातील देवतांच्या वाहन मानल्या जातात. वायुतत्वाचा आवेग अती भयानक असतो, एकाच काळात सर्वस्थित सर्वगामी ! या वेगाची कल्पना प्रत्यक्ष तत्वदर्शन करणाऱ्या साधकाशिवाय कोणालाच येणे शक्य नाही. वायुतत्वाचे दर्शन झाल्यावर साधकाचे जडशरीर टिकत नाही. ते नष्ट व्हायला पाहते. हेच ते इंद्राचे वज्र होय. वायुतत्वाचा भयानक आवेग दाखविण्याकरिता मारूतीला शेपूट, गरूडाला पंख तर नारदाला शेंडी दाखविली आहे. मारूती शिवाचा अंश अवतार म्हणून आपतत्वाला पोषक अशा पौर्णिमेला हनुमानाचा जन्म दाखविला आहे. आपतत्वातून हनुमंताला त्याचे मूळ अशा वायुतत्वाकडे आणि रामाची सेवा करण्याकरीता आकाशतत्वाकडे धाव घ्यायची असते. या दोन तत्वांखाली तेजस तत्व लागते. तेजस तत्त्वावर मात करून त्या तत्वाला पूर्ण गिळल्याशिवाय वायुतत्वाची प्राप्ती होणार नाही. म्हणून जन्मत:च मारूतीने सूर्याचा (तेजस् तत्वाचे दृश्य रूप) ग्रास घेण्यास आकाशात उड्डाण केले.
              साधकाच्या तत्वदर्शनातील अनुभव सिद्धांत वाल्मिकींनी इतक्या कौशल्याने कथन केले आहेत की रामायणात साधकाच्या अनुभवकक्षांचा साद्यंत असा कथानुवाद आहे हे कोणाच्या लक्षातसुध्दा येत नाही. महाभारतातही असेच साधनानुभवांचे कथारूप वर्णन आहे. त्या कथांना इतर सर्व जटिल शास्त्रांच्या सिध्दांताचे अती कौशल्याने आवरण चढविले आहे. योगशास्त्र, अध्यात्मशास्त्र, कालमापनशास्त्र, गर्भसंभवशास्त्र, भूविज्ञानशास्त्र, खगोलशास्त्र जगदुत्पत्तिशास्त्र, ग्रामरचना शास्त्र, युद्धशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, ओतप्रोत, सापेक्षशास्त्र इत्यादी बहुविध शास्त्रांचा त्या कथात मोठ्या कौशल्याने अंतर्भाव केला आहे. विशालबुद्धी व्यास आणि ऋषी वाल्मिकी भारतीयच नव्हे तर अखिल मानवजातीकरीता आदरणीय स्थान प्राप्त करून बसले आहेत. रामायण महाभारताचा या दृष्टीने सखोल अभ्यास झाल्यास पृथ्वीच्या पाठीवर मानवजात असेपर्यंत त्यांचे ग्रंथ अत्यंत अभ्यासनीय आणि आदरणीय राहतील यांत शंका नाही.त्यातील रहस्ये माहित झाल्यास आमचा समाज पुन्हा एका आदर्शाला धरून चालेल असे वाटते.
नृसिंह आणि कूर्म जयंती
               त्रयोदशीला नृसिंह जयंती येते. हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकश्यपु एक बलाढ्य दैत्य होता. पण त्याच्या पोटी प्रल्हादाप्रमाणे एक निस्सीम विष्णुभक्त निघाला. हिरण्यकश्यपू म्हणजे सूर्याचे शरीर असलेला. यावरून हिरण्यकश्यपू तेजस् तत्वाचा साधक होता हे स्पष्ट आहे. साधक जोपर्यंत आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहतो तोपर्यंतच त्याची त्या तत्वात प्रगती होते हे खरे. परंतु पलीकडे जायचे असल्यास त्या तत्वाचा अभिनिवेशच त्याच्या मार्गाआड येतो. लहानशा रोपट्याला इतरांपासून उपसर्ग होऊ नये म्हणून त्याचे भोवती एक कुंपण करतात. पण रोपट्याचे वाढून झाड झाले म्हणजे हेच कुंपण त्याला बाधक ठरते. तद्वत विशिष्ठ तत्वातील अभिनिवेश ते तत्व पूर्ण हस्तगत होईपर्यंत बरा असतो परंतु पलीकडील तत्वात जायचे असल्यास त्या तत्वाचे कुंपण साधकाला तोडायचे असते. हिरण्यकश्यपुचा मुलगा प्रल्हाद भगवान श्रीविष्णूचा म्हणजे आकाशतत्वीय देवतेचा भक्तसाधक होता. हिरण्यकश्यपपू त्याला आकाश तत्वाची साधना करू देईना. म्हणजे प्रल्हादाला भगवान श्रीविष्णुची पूजासाधना करण्यास तो मना करीत असे.
               ‘ल्हाद' म्हणजे आनन्द आणि 'प्रल्हाद' म्हणजे उत्तरोतर तत्वातील आनन्द अगोदर मिळविणारी साधक वृत्ती होय. असल्या प्रल्हाद वृत्तीचा पिता हिरण्यकश्यपु तेजस तत्वीय वृत्ती होय. हिरण्यकश्यपु वृत्ती तेजस तत्वाची अभिनिवेशी असल्याने पुत्र प्रल्हादास ती पुढील आकाश तत्वातील देवतारूप श्रीविष्णूची उपासना करू देईना परंतु 'प्र' म्हणजे समोरील उच्च तत्वांचा ल्हाद' म्हणजे आनन्द घेऊ इच्छिणारा साधक ते कसे मानणार? कथेचा आशय असा आहे.
               प्रल्हादाचा छळ झाला. त्याला तेलात टाकले. म्हणजे त्याच्या अंगाचा प्रखर दाह झाला परंतु प्रल्हादरूपी साधकाने आपली आकाश तत्वीय साधना सोडली नाही. तेजस् तत्वातून वर जातांना प्रत्येक साधकाच्या अंगाचा असाच तप्त तेलात टाकल्याप्रमाणे दाह होतो. साधकाला तो सहन करावा लागतो. तेव्हा कोठे त्याची बुद्धी स्थिर होऊन त्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी देव दिसू लागतो. हिरण्यकश्यपुने विचारल्यास त्याला स्तंभातसुध्दा भगवंत दाखविता येतो. परंतु तेजस् तत्वाभिनिवेशी हिरण्यकश्यपु साधक आपल्या तत्वरूपी घराच्या मर्यादा सोडायला तयार नसतो. भगवंताला सर्वांचीच प्रगती करायची असते. ते हिरण्यकश्यपुला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्याच तत्वघराच्या उंबरठ्यावर त्याच्या पोटातील काळकूटरूपी अज्ञान काढण्याकरिता त्याच्या पोटातील आतडी बाहेर काढतो परंतु प्रल्हादाला त्याबद्दल वैषम्य वाटत नाही. उलट तो अधिक धन्य होतो आणि वैकुंठाला जातो. याच प्रल्हादाचा नातू म्हणजे भक्त बळीराजा होय. असुर वंशातील भक्त प्रभावळ साधकाला तत्वसीमोल्लंघनाचे वेळी पदोपदी साहाय्य करते.
               काही संशोधक युरोपमधील कास्पियन समुद्राचा सभोवताल या हिरण्यकश्यपुचे राज्य होते असे सांगतात. शक्यही असेल कारण एकेकाळी महाभारत आणि रामायणाच्या कथेनुरूप आर्य जगातील देशनामें व्यक्तिनामे, आणि समुद्रनामे पडली होती याचे भरपूर दाखले देता येतील. नरवरीय (नॉर्वे), स्वदेन (स्विडन), ऋष्यशेय (रशिया), मंगलालय (मंगोलिया ), प्राचीन (चीन), जपान (निप्पान), सर्बरिय (सायबेरिया), बर्हिन (बेहरिन), ऋतुकस्थान (तुर्कस्थान); ऋभुस्थान (अरबस्थान); असुरालय (इजराइल, असिरीया इत्यादी) अलक्षा (अलास्का); अमर्त्यका-अमरिका(अमेरिका); अदि = पर्वत (अँड्रीज); ब्रूहि = बोलणे (उलट होऊन हिब्रू भाषा); असक्रतुस (सॉक्रेटिस); प्लुत (प्लेतो); अगुप्त (इजिप्त); त्रजन (ट्रोजन); अस्त्रालय (आस्ट्रेलिया); अग्निदल- इंग्लंड (आंग्ल लोक अग्निपूजक होते हे आता सिद्ध झाले आहे); द्वीदल- दुईशलँड- रम (रोम); व्रज (ब्राजिल); कृष्ण क्रिष्ण ( ख्राइस्त); पित्तर (पीटर) इत्यादी नावांची यादी हेच दर्शविते की एकेकाळी सर्व जगात वैदिक संस्कृतीचा पगडा असून महाभारत रामायणातील व्यक्तिनामे, देशनामे आणि जलनामे सर्वत्र थोड्याफार अपभ्रंशाने आजही दिसून येतात. प्राचीन काळी तर ती अधिक संस्कृतसदृश असावीत.
क्रमशः-
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
शब्दांकन – राजेश कोल्हापुरे – संपर्क  ९७०२९३७३५७ / ९५९४७३७३५७ 
youtube channel - vaidikvishwa

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी