वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - वैदिक प्रार्थना

 प्रश्न क्र. 36 :- वैदिक प्रार्थना कोणत्या व त्यांचा अर्थ काय ?

प्रत्येक धर्मसंप्रदायामध्ये प्रार्थना केल्या जातात. काही ठिकाणी त्यांच्या गुरुचं स्तवन असतं, काही ठिकाणी संप्रदायाचं स्तवन, जेणेकरुन मनाला समाधान आणि अध्यात्माकरता उत्तेजन मिळेल. त्याकरता ते प्रार्थना म्हणत असतात. वैदिक परंपरेमध्ये मात्र हा उपयोग वा उद्देश नसून पूर्ण अध्यात्मिक उद्देश आहे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा त्यात संकेत आहे. नावच आहे प्रार्थना. प्र-अर्थना मानवाच्या जीवनाला एक अर्थ आहे. आत्मज्ञान हा त्या मानवी जीवनाचा अर्थ आहे, आत्मज्ञानाकरता जसा व्यवहार करायचा, संकल्प करायचा आणि निर्धार करायचा, त्या निर्धाराचं प्रकटीकरण म्हणजे प्रार्थना. असा त्याचा आशय आहे. वैदिक परंपरेमधे ज्ञानप्राप्ती हे उद्देश असल्यामुळे कोणत्याही व्यक्ती वा कल्पनेच्या आहारी न जाता केवळ तत्वज्ञानाच्या अभिसारण आणि व्यवहाराकरता प्रार्थना केल्या जातात. आपण त्यापैकी तीन श्लोक पाहू. पहिला श्लोक आहे,

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण मेवावशिष्यते॥

गणिताचा सिद्धांत अध्यात्माकरता घेतला आहे. पूर्ण म्हणजे ज्याला शून्य म्हणतात. इंग्लिश मधे ज्याला Zero म्हणतात. परंतु शून्य आणि Zero मधे तो आशय नाही आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण, Complete, परिपूर्ण. हे पूर्ण गणिताच्या सिद्धांताप्रमाणे दूसऱ्या पूर्णात मिळवले तर बेरीज पूर्णच येईल. पूर्णातून पूर्ण वजा केले तर वजाबाकी पूर्ण येईल. गुणाकार, भागाकार करा, पूर्णच येईल. याचा अर्थ असा, हे विश्व केव्हा उत्पन्न झालं कोणालाच माहीत नाही. ते होतं, तेवढंच आज आहे आणि तेवढचं राहील, पूर्ण. त्या पूर्णातून मी उत्पन्न झालो आहे म्हणून मीही पूर्ण आहे. असा महान सिद्धांत वैदिक परंपरेने सांगितला आहे. इतर परंपरे मध्ये मानवाला अपूर्ण मानलं आहे, पापी मानलं आहे. हे चूक आहे. मानव पूर्ण आहे, मानवाने प्रयत्न केल्यास मानव पूर्ण परमात्मा होऊ शकतो. म्हणून पहिल्या प्रार्थनेत हा श्लोक आहे. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण मेवावशिष्यते।।

स्वतःला पूर्णत्वाला जोडल्यानंतर आता त्या पूर्णत्वाचा आविष्कार ज्या समाजातून आपण वर आलो त्या समाजाकरता कसा करायचा हे पुढल्या श्लोकात विशद केला आहे. तो श्लोक आहे :

ॐ सहनाववतु सहनौभुनक्तु सहवीर्यंकरवावहै।

तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ll

ॐ शांतिः शांति: शांति : ॥

 त्याचा आशय असा आहे. 'सहनाववतु' - सारे मिळून आपण कर्म करु या. 'सहनौभुनक्तु' - सर्व मिळून आपण भोग भोगू या. 'सहवीर्यंकरवावहै' - आपण वीर्यवान होऊ, वीर्यशाली बनू - सर्व मिळून कार्य करू, काहींनीच सैनिक व्हायचं आणि बाकीच्यांनी आरामात बसायचं असं नाही. देश रक्षणाकरता सगळ्यांनीच सैनिक व्हायला पाहिजे. वीर्यवान व्हायला पाहीजे. 'तेजस्वीनावधीतमस्तु' - तेजस्वी आम्ही बनू - अपमान सहन करणार नाही, अपमान कोणाचा करणार नाही. तेजस्वी बनू, परंतु त्या तेजस्वीपणाचा, पराक्रमाचा उपसर्ग दुसऱ्याला आम्ही होवू देणार नाही. म्हणून म्हटलयं 'मा विद्वीषावहै'. मा म्हणजे नाही, विद्विषा - म्हणजे कोणाचा द्वेष करणार नाही. इतर परंपरा, ज्या भारतात आक्रमक होत्या, पराक्रमी होत्या पण लोकांना त्यांनी त्रास दिला, द्वेष केला. वैदिक परंपरेत असा द्वेष आणि त्रास देणे नाही. म्हणून शेवटच्या ओवीत सांगीतले आहे, 'मा विद्विषावहै'. पराक्रमी व्हा, वीर्यवान व्हा, बुद्धीमान व्हा, सशक्त व्हा, पण लोकांना त्रास द्यायचा नाही, द्वेष करायचा नाही. हे झाल्यानंतर, मग पलीकडे काय ? त्यानंतर शेवटचं पूर्णत्व, शेवटच टोक, स्वतःची जाणीव, मी जड शरीर नाही. जड शरीर माझे उपकरण आहे. मी तो निष्कल आत्मा आहे. त्याचं ज्ञान झाल्यानंतर व्यवहारातून माणूस पुन्हा पूर्णत्वाकडे जातो. शेवटचा श्लोक आहे -

प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्म तत्वम् ।

सच्चित्सुखं परमहंस गतिम् तुरीयम्॥

यत्स्वप्न जागर सुषुप्तिमवैक नित्यम् ।

तत् ब्रह्म निष्कलमहं नच भूत संघः ।।

 'प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्म तत्वम्' - सकाळी उठल्यावर माझ्या हृदयात स्फुरीत होणा-या आत्मतत्वाच मी स्मरण करतो. ते कसं आहे ? 'सत्चित् सुखम्' - नेहमी राहणारं आहे, ते खरं आहे. सुखमय आहे. 'परमहंस गतीम् तुरीयम्' - साधकाला परमगतीला नेणारे आहे. साधकाला तुरीय म्हणजे अत्यंत उच्च, गतीमान अशी जी अवस्था आहे, त्या अवस्थेला ते घेऊन जाते. ते केव्हा केव्हा अनुभवायला मिळते. “यत् स्वप्न जागर सुषुप्ति मवैक नित्यम्” - त्याची अनुभूति स्वप्नातसुद्घा होऊ शकते, जागृतीत तर होतेच. सुषुप्त-सुप्त, उत्तम अवस्थेमधे आणि ध्यानावस्थेतही होते. ते नित्य असं जे तत्व आहे, ते नित्य ब्रम्ह तत्व मी आहे. इथे महानता आहे वैदिक परंपरेची ! 'तत् ब्रम्ह निष्कलम् अहं' - ते निष्कल ब्रम्ह मी आहे. 'नच भूतसंगः ' - मी जड शरीर नाही. विश्वात जेवढे सिद्धांत किंवा अध्यात्माचे प्रकार आणि संप्रदाय आहेत त्यामध्ये मानवाला गुलाम मानलं आहे, पापी मानलं आहे. परंतु मानव हा परमोच्चपदाचा अंश असल्याने तो परमअवस्था प्राप्त करु शकतो. तो स्वतःच परमेश्वर होऊ शकतो. असं या शेवटच्या श्लोकात सांगितलं आहे. एकदा आपण हे तिन्ही श्लोक एका मागे एक म्हणून आपली प्रार्थना पूर्ण करु.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।

 

ॐ सहनाववतु सहनौभुनक्तु सहवीर्यं करवावहै।

तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ।

ॐ शांति: शांतिः शांति :॥

 

प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्म तत्वम् ।

सच्चित्सुखं परमहंस गतिम् तुरीयम्॥

यत्स्वप्न जागर सुषुप्तिमवैक नित्यम् ।

तत् ब्रह्म निष्कलमहं नच भूत संघः ।।

हरि ॐ तत्सत् l

 

*संदर्भ :- हिंदुत्वाचे वैश्विक स्वरूप - योगीराज मनोहरजी हरकरे*

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी