वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - साधनामार्गात प्रगती

प्रश्न क्र. 46 :- साधनामार्गात आपण योग्य दिशेने जात आहोत. व आपली प्रगती होत आहे, हे साधकाने कसे समजावे ?

मानवाचा स्वाभाविक गुणधर्म असतो की आज मी साधना सुरू केली तर लगेच मला साधनेतील अनुभूती यायला पाहिजे. थोडी साधना केली की प्रगती दिसायला पाहिजे. हे शक्य तेव्हाच होते. जेव्हा आपले जीवात्म्याचे अनंत जन्माचे कर्मबंध, मन संस्कार, सोबत पंच ज्ञानेंद्रियांची ज्ञान क्षमता उन्नत असेल तरच ! अन्यथा नाही. सुरवातीला प्रत्यक्ष जीवनातील नियम अनेक साधक आपल्या साधनेशी जोडू पाहतात. कारण इह जन्मात मनावर संस्कार होत असतात. त्यामुळे जडाशी आध्यात्मिक प्रगती जोडली जाते. पण ते चुकीचे आहे. जड व्यवहारांचे नियम अध्यात्म साधनेत लागू पडतीलच असे नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव ।

देव अशानं भेटायचा नाही रे !

देव बाजारचा भाजीपाला नाही रे ! ।।

 देव बाजारचा भाजीपाला नाही. एवढया स्पष्ट शब्दात सांगणारे संत आणि आजचे सेमिनार, वर्कशॉप घेणारे, अध्यात्माचे नावे चालवणारे कोर्सेस, भरमसाठ फी घेऊन साधनेत प्रगती दाखवणारे आधुनिक पठडीबाज,  आकर्षक जाहिरात देऊन जनतेला भुलवणारी मंडळी किती काळ टिकतील ? त्यांनी मांडलेला बाजार कोण उठविल ? कोणत्याही संतांनी कोठेही जाहिरात देऊन जनसमुदाय जमवला नव्हता. म्हणून आज त्यांची शिकवण टिकून आहे. कुणी म्हणेल हल्लीचा काळ जाहिरातीचा आहे ! मान्य आहे ! पण ते फक्त भौतिकते पर्यंत मर्यादित आहे. जेथे भौतिक जडत्व संपते त्यापुढे आध्यत्मिक विश्व सुरू होते.

साधनेत आपली प्रगती होत आहे. हे गुरुकृपा व गुरुश्रद्धा यावर आपणास समजत असते. भक्तिमार्गात अधिक निष्ठा वाढत गेली की साधक काहीही विचार करीत नाही. खऱ्या मनाने भक्ती करीत राहणे व आपले स्थान हे गुरूंच्या, परमेश्वराच्या पायाशीच आहे, अशी त्याची भावना असते. याची जाणीव होत असते. रामायणामध्ये रावणाचा वध करून परत अयोध्येत आल्यावर रामाने युद्धात ज्यांनी-ज्यांनी मदत केली त्या सर्वांना काही ना काही तरी दिले, परंतु हनुमानाला काहीच दिले नाही. सीतामाईंनां याचे आश्चर्य वाटले आणि त्यांनी आपल्या गळ्यातील पृथ्वीमोलाचा हार हनुमाला भेट दिला. परंतु या नवरत्न हारातील प्रत्येक मणी दातांनी फोडून त्यात राम नाही म्हणून हनुमानाने फेकून दिला. हनुमंत सर्वश्रेष्ठ भक्त, त्यांना रामाशिवाय लाख मोलाची वस्तु देखील मातीमोल वाटते. असा भाव आपल्या गुरुबद्दल निर्माण झाला पाहिजे. म्हणजेच साधकाची प्रगति झाली असे म्हणता येईल. हा भाव आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज देवाला दान मागतात.

हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥


संदर्भ :- योगीराज मनोहरजी हरकरे यांच्या व्याखानातील सारांश.

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी