वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - साधना / विकृत भावना
प्रश्न क्र. 37 :- जितकी साधना करावी तितक्याच विकृत भावना अधिक प्रबल होतात. याचा सामना साधकाने कसा करावा ?
मनाचे दोन प्रकार आहेत. पहिले बाह्य मन आणि दुसरे अंतर्मन. सागरात ज्याप्रमाणे वर वर अनेक उलाढाली होतात. पण तळाशी तो शांत असतो. परंतु ॲटमबाँब तोच समुद्र तळापासून ढवळून काढतो. बाह्य मनाचे कुसंस्कार सहज दूर होतात. फरशीवर अंथरलेल्या संतरंजी वरील धूळ सहज झाडता येते. पण संतरजी खाली पण खूप धूळ असते, ती दूर करण्यास खूप मेहनत लागते.
अंतर्मनात ध्यान लागल्यावर त्यातील मळ निघून जाण्यासाठी गुरुवर अढळ श्रद्धा असणे आवश्यक असते. मनांत गुरूबद्दल अनेक विकल्प निर्माण होतात. अंतर्मनाचे प्रवाह प्रचंड शक्तीचे असतात. त्यात ठामपणे उभे रहावे लागते. साधनेत अनुभव येतात ते गुरुकृपेने. पण सरदार वल्लभभाई पटेलांनी सांगितलेल्या खालील गोष्टीप्रमाणे साधकाची अवस्था होते. एकदा एक बैलगाडीवाला कुत्रा बरोबर घेऊन निघतो. वाटेत आजूबाजूची कुत्री गाडीवानाच्या कुत्र्याला त्रास देऊ लागतात. तेव्हा तो त्या बैलगाडीच्या दोन चाकांच्या मध्ये चतुरपणाने जागा पटकावतो, त्या बैलांमुळे बाजूच्या कुत्र्यांचा नाइलाज झाला. गाडीवानाच्या कुत्र्याला तो आपलाच पराक्रम वाटला. त्याचा पुढे पुढे एवढा अहंकार वाढला की गाडी पण तोच चालवतो असे समजू लागला. तसाच साधकांत अहंकार निर्माण होतो, परंतु साधनेच्या ताकदीने हवे ते बदल होऊ शकतात. मात्र गुरूवर निष्ठा अढळ ठेवावी लागते. गुरू स्वसामर्थ्याने साधकाला योग्य दिशा दाखवतो. साधना स्थगित झाली की साधक योगभ्रष्ट होतो.
थोरांचे अधःपतन जास्त होते. आपण दगड वर फेकला की तो जेवढा वर जातो. त्यापेक्षा जास्त खड्डा खणून खाली जातो. "अत्युच्च पदी बिघडतो हा बोल खरा." गुरूची साथ कायम पाहिजे. अंहकार निर्माण झाला की काही चेले गुणगान करतात परंतु संयम ठेवावा लागतो. श्रद्धा ठेवावी लागते. नाहीतर तो कोठेच रहात नाही आणि साधनेवर प्रीती असेल तर अखेर आत्महत्या देखील केल्याचे आपण पाहतो. म्हणून गुरूंवर प्रेम करावे. सत्संग धरावा. थोर कवी मोरोपंत म्हणतात त्याप्रमाणे सुसंगति सदा घडो । सूजन वाक्य कानी पडो ।।
भक्ती मार्ग हा प्रशस्त मार्ग ! स्वतःचा विवेक राखावा, सत्कर्म, संस्कार कायम ठेवावे लागतात. साधकांना देखील कामिनी कांचन यांचा मोह ठेवणे योग्य नाही हे माहिती असते, पण मनाला आवरता येत नाही. यासाठी गुरूवर श्रद्धा ठेवावी. रामकृष्ण परमहंसांनी आपल्या गर्भश्रीमंत शिष्याला सर्व दुर्गुण असून पण जवळ केले व जेवणातील एक चमचा दारूचा एक थेंब गुरुचरणी अर्पण करण्यास सांगितले. पण गुरूचरणी दारू कशी ठेवायची या श्रद्धेने दारू सुटली. वेश्यागमन करताना त्यांची आठवण करण्यास सांगितले, वेश्यागमनाच्या वेळी दारात रामकृष्ण दूर असून पण दिसले. मनातून साकार झाले. यामुळे तो मागच्या मागे तडक फिरला. अशा तऱ्हेने गुरुवर पूर्ण निष्ठा ठेवली तर मनाचा संयम, विवेक कायम रहातो. नाहीतर अध:पतन निश्चित होते. म्हणून संत तुकाराम म्हणतात,
न लगे मुक्ति धन संपदा l संत संग देई सदा ' ll
संदर्भ :- विश्वयोगी गुरू-शिष्यांच्या गोष्टीतून समाधान
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://vaidik-vishwa.blogspot.com/
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा