वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - मरणानंतर मुक्ती

प्रश्न क्र. 42 :- मुक्ती मरणानंतर प्राप्त होते काय ॽ

प्रश्नात दोन भाग आहेत. ते दोन्ही महत्वपूर्ण आहेत. एक मरण अर्थात मृत्यू व दुसरा मुक्ती म्हणजे त्या परम तत्वात विलीन होणे, जीवाला जन्म- मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणे होय. मृत्यु आणि मुक्ती ह्या दोन्हीकडे स्वतंत्रपणे बघणे आवश्यक आहे. तेव्हाच मुक्तता मिळते.

मृत्यु म्हणताच आपल्यासमोर एक भयावह कल्पना उभी राहते आणि त्यामुळेच आपले मन मृत्युचे कल्पनेने घाबरते. असल्या भययुक्त घाबरण्यामुळेच मृत्य एक रहस्य बनले आहे. मृत्युचा संबंध शरीराशी आहे आणि शरीर म्हटले की आपल्या समोर या जड शरीराचेच चित्र उभे राहते. परंतु शास्त्रांनी आपली चार शरीरे सांगितली आहेत, (१) जडदेह, (२) लिंगदेह, (३) कारण देह आणि (४) महाकारण देह. आपले जड शरीर मरणसमयी जरी नष्ट झाले तरी त्यात आत वसत असलेला जीवात्मा उर्वरित तीन देह एवं मन बुध्दि पंच ज्ञानेन्द्रिय घेऊन बाहेर निघून जातो. आमच्यापैकी काहींना असे अनुभव येत असतात की आमच्या जड शरीराहून वेगळे असे आमच्या जीवात्म्याचे अस्तित्व आहे. परंतु आम्ही म्हणजे जड शरीरच ही भावना आमचे हाडी मांसी इतकी खिळली आहे की आम्ही म्हणजे हे जडशरीर या कल्पने पलीकडे आपण जाऊच शकत नाही. मग लिंग देह, कारण देह आणि महाकारण देह अशा उत्तरोत्तर सूक्ष्म आणि अनुभव दुर्लभ अवस्थांची आम्हाला कशी कल्पना येणार ? आमच्या कल्पना व अनुभूति या जडदेहापुरत्याच मर्यादित राहतात. या जडशरीराद्वारे आपण सारे संस्कार प्राप्त करतो, त्यामुळे त्या जडशरीरावर आघात होण्याची पाळी आली तर आपल्याला भय प्राप्त होते. आपला जीव म्हणजेच जीवात्मा सततच्या संस्कारामुळे घाबरतो. मृत्यूचे भय अथवा मृत्युचे रहस्य ते हेच होय !

आता मुक्ती बद्दल बघू -

 यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील अभंगांचा आशय पाहू. "देवाचिया द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥" म्हणजे मंदिराचे द्वारात उभे राहणे हा त्याचा केवळ अर्थ नसून देव म्हणजे आत्मा आणि त्या आत्म्याचे मंदिर म्हणजे आपले शरीर आणि त्या शरीराचे हृदयस्थानी सदा विलसत असणा-या परमेश्वराशी क्षणभर जरी एकरूप होऊ शकलो, तरी त्या भक्ताला चारी मुक्ती सहजसाध्य होतील. असे विश्वासाने ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. मुक्ती सुद्धा चार प्रकारच्या मानल्या आहेत, (१) सलोकता, (२) समीपता, (३) सरुपता आणि (४) सायुज्यता. प्रथम मुक्ती सलोकता म्हणजे गुरुच्या सान्निध्यात राहणे आणि गुरु जे सांगतील व वागतील त्याप्रमाणे आपले आचरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा. समीपता म्हणजे गुरुच्या सान्निध्यात तर रहायचेच पण त्याबरोबर गुरुचे आचरण व बोलणे-चालणे तसे का आहे, याचे चिंतन करुन अनुभव घेण्याचा प्रयत्न करणे होय. सरुपता म्हणजे गुरुचे पावलावर पाऊल टाकून नम्र भावाने गुरुंच्या आध्यात्मिक स्थितीचे अहंकार रहीत भावनेने प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सतत प्रयत्न करणे होय. या अवस्थेत शिष्य गुरु अवस्थेशी जवळजवळ एकरूपच असतो. परंतु त्याचा गुरुबद्दलचा भक्तीभाव अजून कायम असतो. गुरु आणि शिष्य या अवस्थेतही आध्यात्मिक अधिकाराने भिन्न असतात. सायुज्यता म्हणजे गुरु आणि शिष्य भिन्न असूनही अभिन्न असतात. हा अनुभव असामान्य आहे. त्यावर केवळ शब्दांनी स्पष्टीकरण देऊन समजविण्याचा प्रयत्न करणे अशक्य आहे. नदीचे पाणी सागरात समर्पित होवून आपले अस्तित्व सागरमय करेल, तद्वत सायुज्जतेचा गुरु-शिष्य भाव असतो. नदीचे पाणी सागरात असतेच पण ते आता सागरमय झालेले असते. म्हणून सायुज्जता मुक्ती सर्वश्रेष्ठ मानली आहे.

प्रत्येक जन्मात देहाला संभाळून जीवनयात्रा चालविणारा जीवात्मा असतो. देहाला मरण आहे, जीवात्म्याला नाही. जीवात्म्याची अवस्था त्या परम अवस्थेशी एकरूप होणे म्हणजेच मुक्त होणे, हीच मुक्ती होय. माऊली हरिपाठात पुढे सांगतात. "ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागलिया जन्मा मुक्त झालो ।।

संदर्भ :- जन्म-मृत्यू रहस्य व हरिपाठ - योगी मनोहर हरकरे

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी