वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - साधक अबोल आणि अलिप्त

प्रश्न क्र. 49 :- साधक जितकी अधिक साधना करत असतो, तितका तो अधीर अबोल आणि अलिप्त होत जातो. असे कां ?

साधनेची ही मधली अवस्था आहे. साधकाला साधनेत काही टप्पे पार करावे लागतात. प्रवासात निघतांना मधे-मधे काही गावं, खेडी, शहरे, लागतात. आपण ते ओलांडून पुढील प्रवासाला निघतो आणि अंतिम स्थळी पोहचतो. तद्वत साधनेतील काही टप्पे पार करावे लागतात. तेव्हा अंतिम साध्य मिळते. मुळात योग्य गुरूंकडून आपल्या योग्यतेची साधना मिळणं हेच अहंभाग्य होय. प्रथमतः साधना करतांना कशात लक्ष लागत नाही, साधना करण्याची धडपड सुरू होते. प्रयत्न करीत-करीत कुठेतरी धागा सापडतो. ही सुरुवातीची अवस्था होय. साधनेत साधकाच्या मनाची एकाग्रता हा साधनेचा पहिला टप्पा. हळूहळू साधना वाढवतं असता बाहेर लक्ष जात नाही. नंतर रंग, आवाज, नाद यांच्या अनुभूति येतात. दिव्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो. पण टॉर्च स्वतः अंधारात राहून सर्व प्रकाश एकत्रित करतो. त्याप्रमाणे साधनेने सारी शक्ती ध्यानात एकवटली जाते. इच्छा असली तरी अन्य काही करण्यास शक्ती उरत नाही. कुणाशी बोलावसं वाटत नाही. अगदी एकांत व अलिप्तपणे राहावेसे वाटते. ही मधली अवस्था साधक अनुभवत असतो. याचा किती काळ असतो ते सांगता येत नाही. साधकांच्या पिंडधर्मानुसार तो काळ असतो. साधकाने धीर धरून गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवून, हळूहळू पलीकडे प्रगती करीत जावे. प्रवासातील खेडी, गांव, शहरें माहीत नसतात. कुणी नीट सांगत सुद्धा नाही. कारण या खऱ्या वाटेवरती प्रवाशी खूप कमी असतात. जे असतात ते आपल्यासम आपणच. जर का साधक यात चुकला गुरुश्रद्धा ढळली, तर मात्र चुकीच्या वाटेने मार्गक्रमण होते. मोह, माया, अहंकार यासारखी गांव त्या वाटेत लागतात. तेथेच तो रंगतो. त्याच नादात तो राहतो. त्यात गुरफटून जातो. साधनेतील प्रगती खुंटते. त्यासाठी सावधगिरीने वागावे लागते. गुरुचरणाशी रहावे. गुरूने दिलेली साधना शांतपणे करणे. गुरुशिवाय कोण मार्ग दाखविणार ? अबोल होऊन खोल चिंतनात असावे. याची कल्पना कुटुंबाला द्यावी. म्हणजे *‘योग: कर्मसु कौशलम्’* !

महापुरुषांप्रमाणे अजून वरच्या अवस्थेला गेल्यावर साधक पूर्ववत समाजाभिमुख होतो. अलिप्तता जाऊन सर्व व्यवहार पूर्वीसारखे होतात. जीवनात एक नवीन पालवी उमलते. समाजासाठी काही मार्गदर्शक तत्वे उदयाला येतात. ती त्या काळाच्या समाजासाठी उपयुक्त ठरतात. आणि पुढे पथदर्शक होतात. त्यातील काही घटकांना त्याचा लाभ घेता येतो. बाकीचे विरोधक आपली बौद्धिक गुणवत्ता दाखवतात ते त्या साधकाच्या पथात काटे पसरवतात. साधकाला काट्यांऐवजी फुलेच वाटतात. याची जाणीव फक्त त्या उच्च साधकालाच असते. साधक त्यावर पुढील अजून उच्चावस्था गाठत जातो. आपल्या आराध्यासाठी अधीर होतो. प्याला पूर्ण भरला त्यात आता जास्त मावत नाही अशी सर्वाभिमुख अवस्था ! व अखेरीस ती शेवटची अवस्था साध्य होते. ज्ञानेश्वर माऊली बाराव्या अध्यायात या अवस्थेचे वर्णन करताना सांगतात.

हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपणचि जाहला ॥

संदर्भ :- विश्वयोगी मनोहर हरकरे यांच्या प्रश्नोत्तर भागांमधील शंका-समाधान विवेचन

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी