वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - ज्ञान आणि विज्ञान

  प्रश्न क्र. 44 :- ज्ञान आणि विज्ञान काय आहे ? त्याची मानवी जीवनात सांगड घालणे शक्य आहे का ?

  ज्ञान आणि विज्ञान याची मानवी जीवनात सांगड घालणे शक्य आहे. आजचे मानवी जीवनमान ह्याच आधारावर जगले जात आहे. आपण हल्ली मोबाईल किंवा दूरदर्शन वापरतो. आधुनिक विज्ञानाचे ते आविष्कार आहेत. उत्तम संदेश वाहक आहेत. त्यांचा वापर आजच्या जीवनप्रणालीत आवश्यक आहे. प्राचीनकाळी अध्यामिक साधनेतून दुरश्रवन वा दूरदृश्यदृष्टी प्राप्त व्हायची पण ती स्वतःपुरती मर्यादित असायची. वैदिक काळात मंत्रोपचार व यज्ञ त्या परमतत्वाशी जोडण्याचे साधन होते. कठोर परिश्रमातून ज्ञानप्राप्ती होत असे. यावरूनच मानवी जीवनाची रचना शास्त्रीय आधारावर करून संपूर्ण मानवजीवन ज्ञानमय करणे याला 'वैदिक जीवन' अर्थात् 'वैदिकता' असे म्हणतं. 'विद्' म्हणजे ज्ञान प्राप्त करणे व 'वैदिक' म्हणजे प्राप्त ज्ञानानुसार जीवन यापन करणे. केवळ पुस्तके वाचून, प्रवचने किंवा व्याख्याने ऐकून आणि आचाराशिवाय केवळ विचार ठेवून नव्हे, तर सुयोग्य साधना करून व तद्नुसार आचरणामुळे ज्ञान प्राप्त होत असते.

 भौतिक अथवा जड जगताबद्दलच्या ज्ञानाला विज्ञान म्हणतात तर सुयोग्य चिंतन आणि आध्यात्मिक साधनांद्वारे जी अनुभूती प्राप्त होते त्याला ज्ञान म्हणतात. सुखी मानवी जीवनासाठी ज्ञान आणि विज्ञान दोन्ही आवश्यक आहेत.

 जीवनामध्ये ज्ञान आणि विज्ञान यांचे संतुलन रहावे म्हणून वेळोवेळी धर्म, पंथ, संप्रदायांची स्थापना केली गेली. जुन्या अशास्त्रीय म्हणून अनावश्यक संस्कार व श्रद्धा यांना हटवून मानवी जीवन पुन्हा शास्त्रीय व उन्नत व्हावे म्हणून धर्मपंथांचा प्रचार केला गेला परंतु कालौघात हे नवीन धर्म संप्रदायही जुन्या धर्म संप्रदायांप्रमाणे अंधश्रद्धा व अशास्त्रीय कल्पनांच्या आहारी गेले. केवळ कर्मकांडात आणि रूढीमध्ये अडकून पडलेल्या जुन्या संप्रदायांविरुद्ध नवीन संप्रदाय होते, पूर्वीच्या धर्माविरुद्ध अथवा सत्याविरुद्ध ते नव्हते. प्रत्येक धर्मसंप्रदायाचा मूळ इतिहास हेच सांगतो. धर्म-प्रवर्तकांनी नवीन काही सांगितले नाही परंतु शास्त्रीय व सत्य परंपरा सोडून भरकटलेल्या तत्कालीन मानवी जीवनाला पूर्व पदावर आणणे हा त्यांच्या प्रयत्नामागील उद्देश होता.

 याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, प्रत्येक धर्म-प्रवर्तकासमोर असे एक शास्त्रीय जीवन होते की, जे त्यांना आदर्श व अनुकरणीय वाटत होते. हे प्राचीन आदर्श जीवन कोणते होते ? तर ते वैदिक जीवन होते व आजही आहे. एक काळ असा होता की, संपूर्ण जगत वैदिक तत्त्वज्ञानाने ओतप्रोत भरलेले होते. वैदिक म्हणजे ज्ञानमय हे आपण बघितलेच आहे. असल्या शास्त्रीय वैदिक जीवनाची ओढ आज विद्वानांना लागून राहिलेली आहे. भौतिक विज्ञानाने जीवन समृद्ध अवश्य होईल, परंतु त्यापासून मानसिक समाधान आणि शांती प्राप्त होणार नाही, हे सत्य संपूर्ण जगाने आज मान्य केलेले आहे, नव्हे ते मान्य करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. या वैदिक जीवनाचे सूत्र योगशास्त्र अर्थात अध्यात्मशास्त्र आहे, ज्याचा प्रचार व अवलंबन जगातल्या सर्व देशांत केला जात आहे. भौतिक आणि वैज्ञानिक सुखोपभोगांनी मानसिक समाधान व शांतता येत नाही असे बघून देश-विदेशांतील तरुण-तरुणी या प्राचीन वैदिक जीवनाची अभिलाषा बाळगून भारताकडे आकर्षित होत आहेत. शास्त्रीय जीवनप्राप्तीचे दृष्टीने हे शुभलक्षण मानता येईल. मानवांचे यातच कल्याणकारी जीवनमान सामावलेले आहे. ज्ञान विज्ञान हातात हात घेऊन जगता येईल त्यासाठी सामाईक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. प्रयत्न होणे गरजेचे आहे. वेद अपौरुषीय स्वयंभू आहेत त्यातील ज्ञान विज्ञान रहस्ये कळण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही. आणि आधुनिक विज्ञानात प्रयत्नाशिवाय यश नाही. मानवाने अवकाशात सोडलेले यान किंवा उपग्रह इच्छित स्थळी पोहचण्यात अपयशी झाल्यास तो पुन्हा प्रयत्न करून यशस्वी होतो. वैदकीय शास्त्रज्ञ रोग चिकित्सा आधुनिक पध्दतीने करून योग्य उपचार करतात. अवघड अशा शस्रक्रिया दुर्बिणीतून किरणोत्सव सोडून केल्या जातात. हे सर्व प्रयत्नांतूनच साध्य झाले आहे. तर वैदिक ज्ञानविज्ञान व त्यातील रहस्ये साधनेद्वारे दिव्य ज्ञानातून प्राप्त होणारच ! साधनेसाठी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते. त्या योग्यतेचा गुरूलाभ झाला पाहिजे. म्हणजे जीवनाची सांगड साधता येते.

संदर्भ :- वैदिक विश्व परिकल्पना - योगीराज मनोहर हरकरे

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी