वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - षट्चक्रभेदन (Chakra Meditation)

प्रश्न क्र. 39 :- मला षट्चक्रभेदन ध्यानप्रकिया काय आहे ? ती कशी करावी ? याचे मार्गदर्शन हवे आहे.

 प्रशिक्षणाला खूप महत्व आहे. अगदी घरापासून मोठ-मोठ्या कार्यालयापर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम ( development program) घेतले जातात. विकसित केले जातात. प्रशिक्षण ही विशेष प्रकारच्या ज्ञान संपादनाची कार्यप्रणाली आहे. प्र म्हणजे पुढे जाणे आणि शिक्षण म्हणजे ज्ञान संपादन करणे होय. अर्थात प्रशिक्षण (Training) म्हणजे विशेष प्रकारचे ज्ञान संपादन करणे होय. ते संपादन करण्याच्या प्रक्रियेला प्रशिक्षण म्हणतात. सततचे संस्कार करून विशेष कार्यात ध्यान लावले जाते. वैदिक परंपरेत ध्यानाला अतिशय महत्व आहे. ध्यानाने सर्व साध्य करता येते. पण कसे करावे. संत तुकारामांना सुद्धा प्रश्न पडला. ते आपल्या आराध्य दैवतालाच विचारतात. - "कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥"

ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. भक्तिमार्गी नामस्मरण, जपमाळ करून तर कर्ममार्गी आपल्या कर्मात एकाग्रता साधतो. योगी आंतरिक ध्यानाने ज्ञान प्राप्त करतो. "ठाईच बैसोनी करा एक चित्त ।"  पूज्य काकाजींनी ॐ कार षट्चक्रभेदन ध्यान प्रक्रिया सर्वांसाठी विकसित केली आहे. हा एक प्रशिक्षणाचा भाग आहे. अंगीकृत करावयाचा सराव आहे. ती ध्यानप्रक्रिया पाहू.

ॐकार षट्चक्रभेदन ही एक अत्यंत उपयुक्त साधना आहे. यामुळे कुंडलिनी जागृत तर होतेच, पण ही साधना नेहमी केल्याने साधक योगी बनून आपल्या सहस्रार चक्रात स्थानबद्ध होऊन समाधीचा निर्विषय आनंद उपभोगू शकतो. पहिल्याच दिवसापासून याचा साधकांवर फार चांगला परिणाम होतो. साधकाचा शरीरभाव लुप्त होऊन तो एका अवर्णनीय शांत अवस्थेप्रत पोहोचतो. आपल्या शरीरात सात योगचक्रे आहेत. ती क्रमशा अशी - गुदस्थानाच्या थोडे वर जे चक्र आहे त्याला मूलाधार म्हणतात. दुसरे चक्र नाभी, तिसरे हृदय, चवथे कंठ, पाचवे तालुस्थान, सहावे भ्रूमध्य व सातवे सहस्रार म्हणजे नवजात बालकाच्या मस्तकावर मध्यभागी जेथे हाड नसते ते स्थान.

 प्रथम सहजासन किंवा पद्मासन घालून बसावे. डाव्या तळहाता वर उजवा तळहात ठेऊन तसे मांडीवर ठेवावेत. खांदे वर ओढून घ्यावेत. डोके थोडे पुढे झुकवावे. डोळे मिटून घेऊन थोड्या क्षणात भरपूर श्वास आत ओढून घ्यावा. फुप्फुसे हवेने पुरेपूर भरल्यावर मुखातून ॐकार ध्वनी काढावा. हा ॐ कार ध्वनी जमेल तितका दीर्घ व शांततेने काढावा. मुख फार उघडू नये. ॐ कार ध्वनीच्या अनुसंधानाच्यावेळी मन मुलाधाराचक्रावर केंद्रित करावे. उच्चाराची सुरुवात "ओ" ने करून शेवट "म" ने करावा. ध्वनी अनुसंधाच्या बरोबरच श्वास सोडून समाप्त करावा. पुन्हा दीर्घ श्वास ओढून ॐ कार नादानुसंधानासोबत मन मुलाधारावर केंद्रित करून लगेच नाभिचक्रावर स्थिर करावे. श्वास संपल्यावर पुन्हा दीर्घ श्वास ओढून, तिसऱ्यांदा ॐ कार नादासह मनाने मूलाधार व नाभिला स्पर्श करून, त्याला हृदयावर स्थिर करावे. चौथ्यांदा पुन्हा दीर्घ श्वास घेऊन ॐ कार नादानुसंधानासह मनाने मूलाधार, नाभी व हृदयाला स्पर्श करून त्याला कंठावर स्थिर करावे. पाचव्यांदा, सहाव्यांदा व सातव्यांदा याचप्रकारे श्वास ओढून व मनाने नादानुसंधानासह खालील चक्रांना शीघ्र गतीने स्पर्श करून त्याला अनुक्रमाने तालुस्थान भ्रूमध्य व शेवटी सहस्रारावर स्थिर करावे.

मन सहस्रारामध्ये स्थिर करण्याच्या वेळी अशी कल्पना करावी की, आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होत आहे. पिंड-ब्रह्मांड एक होत आहे. व एवढेच नव्हे तर आपण स्वतः सर्व ब्रह्मांड (जे अतिदूर, अतिनिकट व सर्वत्र आहे) आहोत. दररोज सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी ही षट्चक्रभेदन साधना केल्यास साधक एखादेवेळी समाधिसुख सुद्धा अनुभवू शकेल. अर्थात कुंडलिनीच्या जागृती शिवाय समाधी लागू शकत नाही. पण यामुळे कुंडलिनी जागृती आपोआप व दुःख रहित अवस्थेमध्ये होईल. कुंडलिनी जागृती हे ध्येय नसून समाधी करता एक आवश्यक साधना अवस्था आहे. कुंडलिनी जागृती ही काही सर्वोच्च अवस्था नाही. तो साधनेचा प्रारंभ असून समाधि हे त्याचे लक्ष्य आहे.

 याप्रमाणे एक-एक चक्राचे भेदन करीत साधकाने सहस्रार चक्रावर ध्यानमग्न होऊन स्थिर व्हावे. सहस्रार चक्रामध्ये स्थिर होताना मंत्रपुष्पांजलिचे मनातल्या मनात सुरात स्मरण केल्याने ध्यानामध्ये अधिक लाभ होतो.

 मंत्रपुष्पांजली ॥

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।। तेहनाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे ।।

स मे कामान् कामकामाय मह्यं ॥ कामेश्वरो वैश्रवणो ददातु ॥

कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः

ॐ स्वस्ति साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ठयं राज्यं ।।

महाराजमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात ॥

सार्वभौम: सार्वायुषः आंतादापरार्धात् ।।

पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति ॥

तद्प्येष श्लोकोऽ भिगितो मरुतः परिवेष्टारो मरूतस्याऽवसन् गृहे ।।

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद् इतिः ।

हरी ॐ तत्सत्

संदर्भ :-  साधना साधक आणि दिव्यानुभूती - योगीराज मनोहर                    

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी